Tigress Arrowhead Ranthambore hearth touching viral story: राजस्थान हा राजे-राजवाड्यांचा परिसर… प्रदीर्घ कालखंडासाठी या प्रदेशावर राजसत्तेचा अंमल होता. शिकार करणं हा त्या वेळच्या शासकांचा आवडता छंद. त्यामुळे राज्यातील जंगलांचा काही भाग शिकारीसाठी राखीव ठेवला जात असे. रणथंबोर हा प्रदेशही जयपूर संस्थानातील राजघराण्यांसाठी आरक्षित शिकारीचा प्रदेश होता. हा जंगलाचा भाग जयपूरच्या महाराजांच्या मालकीचा होता, त्यांच्या शिकार विभागाद्वारे या प्रदेशाची देखभाल केली जात असे. सभोवतालच्या प्रदेशात राहणाऱ्या स्थानिकांनी कर भरला की, त्यांनाही जंगलातील उत्पन्न (लाकूड, फळं इत्यादी) घेण्याची परवानगी होती. मुळातच त्या कालखंडात लोकवस्ती कमी असल्याने या परिसरावर मानवी हस्तक्षेपाचा फारसा परिणाम झालेला नव्हता.
- मात्र, २० च्या शतकाच्या मध्यावर चित्र पालटले. जंगलांच्या अतिवापरामुळे आणि विनाशामुळे वनसंवर्धनाच्या धोरणांची अत्यंत गरज भासू लागली.
- १९५३ साली राजस्थान वन कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे राज्यातील जंगलांना काही प्रमाणात का होईना संरक्षण मिळाले.
- १९५५ साली रणथंबोर परिसरातील सर्व जंगल क्षेत्र ‘सवाई माधोपुर अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आलं. या भागात कोणत्याही प्रकारच्या व्यापारी कृतींना बंदी घालण्यात आली.
- तरीसुद्धा, जंगलातील वाघांची संख्या घटतच गेली आणि ते नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आले.
- त्यामुळे भारत सरकारने १९७३ साली ‘प्रोजेक्ट टायगर’ नावाचा व्याघ्र संवर्धन प्रकल्प हाती घेतला. या योजनेअंतर्गत सवाई माधोपुर अभयारण्यातील सुमारे ६० चौरस मैल क्षेत्र ‘व्याघ्र संवर्धन क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आलं.
रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाचं वाढतं क्षेत्रफळ
- १९८० पर्यंत रणथंबोर अभयारण्यातील १२ हून अधिक गावांचं स्थलांतर करण्यात आलं आणि सुमारे २८२.०३ चौ. किमी क्षेत्र ‘राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतर आसपासचं जंगलक्षेत्र सामील करून व्याघ्र अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानाचं क्षेत्र वाढवण्यात आलं.
- १९८३ साली रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या उत्तरेस असलेल्या ६४७ चौ. किमी जंगलाला ‘केला देवी अभयारण्य’ म्हणून घोषित करून व्याघ्र संवर्धन क्षेत्रात समाविष्ट केलं.
- त्याचप्रमाणे, १९८४ साली उद्यानाच्या दक्षिणेकडील १३० चौ.किमी जंगलाला ‘सवाई मानसिंग अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आलं आणि तेही रणथंबोर वाघ अभयारण्यात समाविष्ट करण्यात आलं.
वाघ वाढले
या व्याघ्र संवर्धन प्रयत्नांमुळे १९७३ नंतर रणथंबोरमधील वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. २०१४ साली केलेल्या गणनेनुसार, रणथंबोर अभयारण्यात सुमारे ६४ वाघ नोंदवले गेले होते.
मछली
रणथंबोरच्या जंगलात ज्या वाघांनी आपली सत्ता वाढवत निसर्गाला आणि पर्यायाने संवर्धनाला हातभार लावला त्यातील एक प्रसिद्ध वंश म्हणजे मछलीचा वंश. ही रणथंबोर मधील सर्वात प्रसिद्ध वाघीण होती. तिने १४ फूट लांबीच्या मगरीला ठार मारलं, स्वतःपेक्षा बलाढ्य नर वाघांविरुद्ध लढा देत स्वतःच्या प्रदेशाचं रक्षण केलं. एक डोळा व दात गमावल्यानंतरही आपल्या पिल्लांना वाढवलं. ती पर्यटकांची नेहमीच आवडती होती. तिचाच वंश या जंगलातील सर्वात प्रसिद्ध वंश ठरला आहे. तिच्या मुलींनी, नातींनी आपल्या आजीची परंपरा अखंड सुरू ठेवत या जंगलाची शोभा वाढवली आहे.

मछलीची कृष्णा
प्रसिद्ध वाघीण मछली (T-16) हिची मुलगी T-19, हीला प्रेमाने कृष्णा असे म्हणत, रणथंबोरच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची वाघीण मानली जाते. तिचा जन्म २००६ च्या पावसाळ्यात झाला. आईच्या वारशातून तिने मांडूब पठाराचा ताबा मिळवला होता. हा भागात जलस्त्रोत कमी आणि तुलनेने अल्प शिकार, म्हणूनच नेहमी कठीण समजला जाणारा असा भाग होता. कृष्णा स्वभावाने खूपच लाजरी होती. ती क्वचितच पर्यटकांच्या नजरेस पडत असे.

रणथंबोरची सम्राज्ञी
२०१० च वर्ष संपताना आणि २०११ च वर्ष सुरू होताना त्या प्रदेशातील प्रभावी नर वाघ T-28 (स्टार मेल) याच्या बरोबर तिचा संबंध आला आणि काही काळातच तिने बछड्यांना जन्म दिला. बछड्यांचं संगोपन करताना ती लाहपूर खोऱ्याकडे सरकली आणि तिच्या साम्राज्याचे क्षेत्रफळ लक्षणीयरीत्या वाढले. ती २०११ च्या अखेरीस T-19 रणथंबोरमधील सर्वात मोठ्या भूभागाची सम्राज्ञी ठरली. ती अनेकदा आपल्या पिल्लांना शिकार कशी करावी, याचे प्रशिक्षण देताना दिसत असे.
सौंदर्य, धैर्य आणि मातृत्व
नालघाटी-कमलधार परिसरात सूर्यप्रकाशात उजळलेल्या जंगलातून तिचे आणि तिच्या बछड्यांचा संथ, राजेशाही फेरफटका रणथंबोरच्या पर्यटकांसाठी अविस्मरणीय क्षण ठरले. रणथंबोरच्या इतिहासात T-19 कृष्णा ही मछलीच्या राजेशाही वंशातील एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद दुवा होती. तिच्या सौंदर्य, धैर्य आणि मातृत्वामुळे ती आजही वन्यजीवप्रेमींच्या मनात एक अद्वितीय स्थान राखून आहे.
आईचं दुःख
कृष्णाने चार बछड्यांना जन्म दिला होता. हे बछडे रणथंबोरच्या लाहपूर खोऱ्यात अनेकदा दिसत असतं. त्या काळात रणथंबोरमधील सर्वात जास्त फोटो काढले जाणारे आणि प्रसिद्ध बछडे हेच होते. एकेदिवशी नदी ओलांडताना चारपैकी एका छोट्या बछड्याला मगरीने पकडून नेले. ही घटना कृष्णासाठी अत्यंत वेदनादायी होती. प्रत्यक्ष कॅमेरात एका आईने आपल्या पिल्लाला गमावल्यानंतरच्या वेदना टिपल्या गेल्या होत्या. कृष्णाच्या आईने म्हणजे मछलीने १४ फुटांच्या मगरीला नामोहरम केलं होतं. तर आता मगरीच्या कचाट्यात येऊन तिच्यात वंशातील एका बछड्याचा मृत्यू झाला होता.

अॅरोहेड
उरलेल्या बछड्यांपैकी अॅरोहेड नावाच्या वाघिणीने आपल्या आजी आणि आईचा वारसा अविरत सांभाळला. याच अॅरोहेड वाघिणीचा अलीकडेच मृत्यू झाला. रणथंबोरमधील सर्वात प्रसिद्ध वाघिणींमध्ये गणल्या जाणाऱ्या ‘अॅरोहेड’चं (T-84) १४ व्या वर्षी निधन झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे दिली होती. तिचं निधन तिच्या मुलीचं दुसऱ्या व्याघ्र अभयारण्यात स्थलांतर झाल्यानंतर काही तासांतच झालं. तिने आपली मुलगी RBT 2507 हिला मुकुंदरा अभयारण्यात नेऊन सोडलं आणि त्यानंतरच्या काही तासांतच तिने अखेरचा श्वास घेतला. ती बराच काळ हाडाच्या कर्करोगाशी लढा देत होती.
क्रोकोडाईल किलर आजीचा वारसा
तिच्या निधनाच्या दोनच दिवस आधी, अॅरोहेडने आपले शौर्य दाखवत पदम तलावाजवळ एका मगरीचा पराभव केला होता. हा पराक्रम तिच्या आजी मछलीची आठवण करून देणारा होता, मछली ही ‘क्रोकोडाईल किलर’ म्हणून प्रसिद्ध होती. ही घटना झोन ३ मधील जोगीमहलजवळ, पदम तलावलताब परिसरात घडली. अॅरोहेडने पाण्यातून बाहेर येणाऱ्या एका मगरीवर दबा धरून हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अॅरोहेड पाण्याच्या काठावर शांतपणे पडून होती आणि योग्य क्षण साधताच ती झेपावली. हा हल्ला अवघ्या एका मिनिटाचा होता, पण तो अत्यंत तीव्र होता. शेवटी मगरीला अॅरोहेडच्या जबरदस्त चाव्याने प्राण गमवावे लागले.

अदम्य जिद्दीचं प्रतीक
छायाचित्रांमध्ये या थरारक प्रसंगाचे क्षण टिपले गेले आहेत. अॅरोहेडने पाण्यात झेप घेतली, मगरीच्या मानेवर जोरदार चावा घेत मोठा तुकडा पाडला आणि शेवटी त्या बेशुद्ध झालेल्या सरपटणाऱ्या प्राण्याला जंगलात ओढत नेलं. एका व्हिडिओ क्लिपमध्ये अॅरोहेडची प्रचंड ताकद स्पष्टपणे दिसते आहे. ती तलावाच्या काठावरून मगरीचं शरीर ओढत नेत असल्याचं दृश्य विलक्षण प्रभावी आणि अद्भुत आहे. अॅरोहेडच्या निधनाने रणथंबोरसाठी एका युगाचा अंत झाला आहे. तिचं वंशपरंपरागत अस्तित्व अनेक वर्षांपासून शक्ती, सौंदर्य आणि जगण्यासाठीच्या अदम्य जिद्दीचं प्रतीक मानलं जात होतं.

रणथंबोरच्या जंगलातील प्रत्येक झाड, प्रत्येक तलाव आणि प्रत्येक पाऊलवाट मछली, कृष्णा आणि अॅरोहेड या तीन पिढ्यांच्या वाघिणींच्या संघर्षाची आणि मातृत्वाच्या कथांचे साक्षीदार आहेत. मछलीने जंगलावर राज्य केलं, कृष्णाने ते टिकवलं, आणि अॅरोहेडने आपली शेवटची झुंज देऊन त्या वारशाला अमरत्व दिलं. स्वतःला हाडांचा कर्करोग (Bone Cancer) असतानाही, अॅरोहेडने आपल्या मुलीला सुरक्षित नवीन घर मिळवून दिलं आणि त्यानंतर शांतपणे या जगाचा निरोप घेतला! शेवटी संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो आणि निसर्ग जगायला शिकवतो!
