C-skimming drone गेल्या काही वर्षांत अनेक देशांनी तणावादरम्यान ड्रोनचा वापर केल्याचे पाहायला मिळाले आहे. तणावग्रस्त परिस्थितीत ड्रोनचा वापर वाढल्याने अनेक देश हे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत आहेत. आता तुर्कियेने जगातील पहिल्या सी-स्किमिंग ड्रोनची निर्मिती केली आहे. रशियाच्या किंवा चीनच्या ड्रोनपेक्षा वेगळे असलेले, समुद्राच्या अगदी वर उडणारे, हे लढाऊ ड्रोन अनेक दृष्टीने खास आहे. १९६० च्या दशकात सोव्हिएत युनियनने ‘कॅस्पियन सी मॉन्स्टर’ नावाच्या एका मोठ्या, पंख असलेल्या जहाजाने पाश्चात्त्य गुप्तचर यंत्रणांना चकित केले होते. हे जहाज पाण्याच्या पृष्ठभागाच्या अगदी वरून उडत असे आणि रडारच्या नजरेपासून लपून राहात असे. आता तुर्कियेने ही संकल्पना TALAY नावाच्या जगातील पहिल्या ‘सी-स्किमिंग’ बहुउद्देशीय मानवरहित हवाई वाहनाद्वारे म्हणजेच ड्रोनद्वारे पुन्हा जिवंत केली आहे. काय आहे ड्रोनचा हा प्रकार? सी-स्किमिंग ड्रोन म्हणजे नक्की काय? जाणून घेऊयात.
गेल्या काही वर्षांत ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ड्रोन हे एक प्रकारचे मानवरहित विमानच असते. ते रिमोट कंट्रोलच्या साह्याने उडवले आणि नियंत्रित केले जाते. लहान व सर्वांत स्वस्त एफपीव्ही ड्रोन (फर्स्ट पर्सन व्ह्यू) युक्रेन युद्धातील सर्वांत शक्तिशाली शस्त्रांपैकी एक असल्याचे सिद्ध झाले आहे. एफपीव्ही ड्रोन पायलटद्वारे जमिनीवरून नियंत्रित केले जातात आणि अनेकदा ड्रोनमार्फत स्फोटकांनी भरलेली ठिकाणे लक्ष्य केली जातात.
सी-स्किमिंग ड्रोन म्हणजे काय?
- अंकारा येथील संरक्षण क्षेत्रातील नवीन कंपनी ‘सॉलिड एरो’च्या वेबसाइटनुसार, हे अत्याधुनिक ड्रोन जगातील पहिले अनोख्या स्वरूपाचे ड्रोन आहे.
- ड्रोनची कमी उंचीवर उडण्याची क्षमता आणि ‘विंग-इन-ग्राउंड’ (WIG) इफेक्ट यामुळे सागरी हल्ले आणि टेहळणीसाठी हे ड्रोन महत्त्वाचे ठरणार आहे.
- इतर ड्रोन पाण्याच्या पृष्ठभागाच्या खूप वर उडतात, मात्र TALAY समुद्रापासून ३० सेंटीमीटर ते १०० मीटर उंचीवर उडू शकते, त्यामुळे हे ड्रोन रडारच्या टप्प्याबाहेर राहते.
- या ड्रोनमध्ये कमी उंचीवरून उडण्याची क्षमता असल्याने ते कोणत्याही अडथळ्यांशिवाय धोका असलेल्या भागात प्रवेश करण्यास सक्षम आहे.
- बंदरांवरील हल्ले, टेहळणी आणि सागरी कार्यांसाठी हे ड्रोन आदर्श ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. ड्रोनच्या निर्मात्यांनुसार, त्याचे पंख दुमडता येतात आणि त्यामुळे ते त्वरित तैनात करता येते.
- लो रडार क्रॉस-सेक्शन आणि ड्रोनच्या हलक्या वजनामुळे हे ड्रोन शत्रूच्या दृष्टीतून जास्तीत जास्त काळ अदृश्य राहू शकते.

सी-स्किमिंग ड्रोनची वैशिष्ट्ये
सी-स्किमिंग ड्रोनच्या पंखांची लांबी ९.८४ फूट आहे आणि ड्रोनची लांबी ९.१९ फूट आहे. TALAY ३० किलोग्राम (६६ पौंड) पर्यंतचा पेलोड (उपकरणे किंवा शस्त्रे) वाहून नेण्यास सक्षम आहे. त्यामध्ये प्रगत सेन्सर्स आणि लहान जहाज-विरोधी क्षेपणास्त्रांसारख्या दारुगोळ्याचा समावेश आहे. हे ड्रोन इलेक्ट्रिक इंजिन आणि Li-Po बॅटरीवर चालते. TALAY चा वेग २०० किलोमीटर प्रतितास म्हणजे १२४ मैल प्रतितास आहे. ते तीन तासांपर्यंत हवेत कार्यरत राहू शकते. हल्ला, टॉप अटॅक, बंदर हल्ला, गस्त आणि टेहळणी मोहीम, मालवाहतूक, यासाठी हे ड्रोन महत्त्वाची भूमिका बजावण्यास सक्षम आहे. सागरी हल्ला आणि टेहळणी मोहिमांसाठी हे खास डिझाइन करण्यात आले आहे.
‘कॅस्पियन सी मॉन्स्टर’चा संबंध
TALAY हे ड्रोनसाठी एक क्रांतिकारक तंत्रज्ञान असले तरी ‘विंग-इन-ग्राउंड’ (WIG) इफेक्टचा वापर करणारे हे पहिले विमान नाही. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनचे मोठे ‘एक्रानोप्लान’ (ekranoplan) चर्चेत होते. त्याला ‘कॅस्पियन सी मॉन्स्टर’ असे टोपणनाव देण्यात आले होते. हे शेकडो टन वजनाचे, मानव-चालित वाहन होते आणि त्याला सैन्य व क्षेपणास्त्र वाहतुकीसाठी डिझाइन केले होते. मात्र, TALAY हे ड्रोन अचूक हल्ले आणि टेहळणी करण्यास सक्षम आहे.
मोठ्या नौदल क्षेपणास्त्रांच्या तुलनेत त्याचा पेलोड (वजन वाहून नेण्याची क्षमता) कमी असला तरी त्यात ‘स्वॉर्म टॅक्टिक्स’ वापरण्याची क्षमता आहे, त्यामुळे हे ड्रोन घातक ठरते. एकाच वेळी अनेक ड्रोन जहाजांच्या संरक्षणाला भेदून कोर्बेट्स, किनाऱ्यावरील गस्त घालणारी जहाजे किंवा त्याहून मोठ्या जहाजांना लक्ष्य करू शकतात. इस्तंबूलमधील ‘इंटरनॅशनल डिफेन्स इंडस्ट्री फेअर (IDEF 2025)’ मध्ये या ड्रोनचे मॉडेल्स आधीच दाखवण्यात आले आहे. ‘ग्रीक रिपोर्टर’नुसार, TALAY चे उत्पादन ऑक्टोबर २०२६ मध्ये सुरू होईल आणि पहिले युनिट्स २०२७ च्या सुरुवातीला तुर्किये नौदलाला दिली जातील.
इतर देशांची स्थिती
- अमेरिका : पॅसिफिक प्रदेशात रसद पुरवण्यासाठी ‘लिबर्टी लिफ्टर’ विकसित करत आहे.
- चीन : कमी उंचीच्या सागरी ड्रोनसाठी काही काल्पनिक संकल्पना मांडल्या आहेत.
- रशिया : आधुनिक गस्त आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची घोषणा केली आहे, परंतु कोणतेही मॉडेल अद्याप अस्तित्वात नाही.
- इराण : लहान किनाऱ्यावरील संरक्षणासाठी WIG विमानाची संकल्पना सादर केली आहे.
- युरोप (जर्मनी आणि ब्रिटन) : WIG वाहतूक संकल्पनांवर संशोधन केले आहे.
- ऑस्ट्रेलिया : बेटांमधील लॉजिस्टिक्ससाठी लहान-मोठ्या प्रोटोटाइपची चाचणी केली आहे.
तुर्कियेचे TALAY अमेरिकन, रशियन, चिनी, युरोपियन, ऑस्ट्रेलियन आणि इराणी ड्रोनपेक्षा वेगळे कशामुळे आहे?
- कमाल वेग : २०० किलोमीटर प्रती/तास (१२४ mph)
- कार्यक्षम उंची : समुद्राच्या पृष्ठभागापासून ३० सेंटीमीटर ते १०० मीटर
- पेलोड क्षमता : ३० किलोग्राम (६६ पौंड)
- कमाल टेक-ऑफ वजन : ६० किलोग्राम (१३२ पौंड)
- क्षमता : तीन तास उडण्यास सक्षम
- रेंज : २०० किलोमीटर (१२४ मैल)
- रात्री आणि दिवसाही उड्डाण करण्यास सक्षम