जगभरात विवाहाची व्याख्या ही समाज, धर्म आणि स्थानिक संस्कृतीनुसार बदलत जाते. भारतात किंवा बऱ्याच ठिकाणी लग्न हे फक्त दोन व्यक्तींमध्ये होत नाही, तर दोन कुटुंबांमधील सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक आदान-प्रदान मानले जाते. काही ठिकाणी अजूनही रक्ताच्या नात्यांमध्ये लग्न लावून दिलं जातं. म्हणजे चुलत, मावस किंवा मामाची मुलगी आणि आत्याचा मुलगा अशा नात्यांमध्ये विवाहाच्या गाठी बांधल्या जातात. भारतात ज्या प्रकारे रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह करण्याची पद्धत काही ठिकाणी आहे, त्याचप्रमाणे भारताबाहेरही अशा पद्धती आहेत. ब्रिटनसारख्या विकसित देशातही काही लोक पूर्वीपासून रक्ताच्या नात्यात विवाह करणे योग्य मानतात.

द इकोनॉमिस्टच्या रिपोर्टनुसार, बॉर्न इन ब्रॅडफोर्ड या ब्रिटनमधील एका संशोधनात असे आढळून आले आहे की, पाकिस्तानी मूळ असलेल्या ३७ टक्के विवाहित जोडप्यांमध्ये नवरा-बायको हे पहिले चुलत भाऊ-बहीण होते. या तुलनेत ब्रिटिश नागरिकांमध्ये हे प्रमाण केवळ एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.
या संशोधनातून एक धक्कादायक बाबही समोर आली आहे आणि ती म्हणजे अशा रक्ताच्या नात्यांतील लग्नांमुळे जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये काही आनुवंशिक दोष किंवा जन्मत:च आजार होण्याचा धोका अधिक असतो. या संदर्भातला अभ्यास १३ हजार ५०० कुटुंबांवर करण्यात आला.

भारतात हिंदू विवाह अधिनियम १९५५ नुसार, काही विशिष्ट नात्यांमध्ये विवाह करण्यास बंदी आहे. त्यामध्ये समान गोत्र असलेल्या लोकांमध्ये लग्न करणे हिंदू धर्मानुसार निषिद्ध मानले जाते.

यूकेमध्ये नेमका काय वाद सुरू आहे?

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कंझर्व्हेटिव्ह खासदार रिचर्ड होल्डन यांनी यूके संसदेत कायदा सादर केला. त्यामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला की, ही परंपरा आधुनिक ब्रिटिश समाजासाठी अनुकूल नाही. त्यांनी रक्ताच्या नात्यांमधील जोडप्यांच्या मुलांच्या आरोग्य धोक्याबाबत गंभीर चिंता दर्शवीत अशा विवाहांना बेकायदा ठरविण्याची मागणी केली. मे महिन्यात झालेल्या एका सर्वेक्षणात असे आढळले की, बहुसंख्य ब्रिटनचे नागरिक अशा विवाहांना विरोध करतात.

या विवाहांना विरोध का होत आहे?

१६ व्या शतकापासून यूकेमध्ये चुलत भावंडांमधील विवाह कायदेशीर आहे. क्वीन व्हिक्टोरिया आणि चार्ल्स डार्विन हे त्यांच्या चुलत भावंडांशी लग्न करणाऱ्या ब्रिटनच्या नागरिकांपैकी एक होते. असे असताना कुटुंबं लहान होत गेल्याने आणि अशा जोडप्यांच्या मुलांना आनुवंशिक आजारांबाबत जागरूकता वाढल्याने हळूहळू या विवाहांचे प्रमाण कमी झाले. मात्र, यूकेमधील काही समुदायांमध्ये अजूनही हे विवाह होत आहेत.

‘द वीक’ने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश पाकिस्तानी समुदायातील ४० ते ६० टक्के लोक रक्ताच्या नात्यात लग्न करीत आहेत, असे धार्मिक कायद्याचे तज्ज्ञ व फॅरोस फाउंडेशन सामाजिक विज्ञान संशोधन गटाचे संचालक पॅट्रिक नॅश यांनी सांगितले. दक्षिण आशिया, पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिकेच्या काही भागांत अजूनही अशा प्रकारचे विवाह स्वीकार्य आहेत. ड्यूश वेलेच्या वृत्तानुसार, अंदाजे १० ते १५ टक्के नवजात बालकांचे पालक हे रक्ताच्या नात्यातलेच आहेत. या लग्नामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे संपत्ती आणि मालमत्ता सुरक्षित करण्यासाठी तसेच कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी काही जण करतात. ‘द इकॉनॉमिस्ट’ने सांगितल्याप्रमाणे, अशा विवाहांमुळे सासरच्या लोकांमधील मतभेदांचा धोका कमी होऊ शकतो.

रक्ताच्या नात्यांतील विवाह बेकायदा का ठरवायचे आहेत?

मे महिन्यात झालेल्या YouGov पोलनुसार, सुमारे ७७ टक्के ब्रिटनचे लोक पहिल्या चुलत भावंडाशी लग्न बेकायदा असावे, असे मानतात. त्यात असेही आढळून आले आहे की, ४७ टक्के ब्रिटिश पाकिस्तानी आणि बांगलादेशींना अशा विवाहांवर बंदी घालण्याला संमती आहे; तर ३९ टक्के लोकांनी ते कायदेशीर असावे, असे म्हटले आहे. सुमारे ७७ टक्के भारतीय ब्रिटनवासीयांनी अशा प्रकारच्या विवाहांवर बंदी घालण्यास पाठिंबा दिला; तर ८२ टक्के कृष्णवर्णीय ब्रिटनवासीयांनी अशा प्रकारच्या विवाहाला पाठिंबा दिला आहे.

हा राजकीय चर्चेचा विषय का ठरला?

गेल्या डिसेंबरमध्ये टोरी खासदार रिचर्ड होल्डन यांनी यूकेमध्ये या विवाहांवर बंदी घालण्यासाठी एक विधेयक सादर केले, तेव्हापासून या विवाहांबाबत बोलले जात आहे. गेल्या वर्षी कंझर्व्हेटिव्ह नेतृत्व निवडणुकीत उपविजेते रॉबर्ट जेनरिक यांनी या कायद्याला पाठिंबा दिला. ब्रिटिश पाकिस्तानी समुदाय आणि काही प्रमाणात आयरिश प्रवासी समुदाय स्वत:ला समाजापासून दूर करीत आहेत आणि स्वत:ला बंद करीत आहेत, असा दावा होल्डन यांनी केला. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये या विधेयकाचे सादरीकरण याच महिन्यात होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात YouGovच्या सर्वेक्षणानंतर होल्डन यांनी सांगितले होते की, पाकिस्तानी वंशाच्या लोकांसह बहुसंख्य ब्रिटिशांना या विवाहांवर बंदी घालायची आहे.

रक्ताच्या नात्यांतील विवाहांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या विविध कारणांपैकी एक म्हणजे या जोडप्यांच्या मुलांचे आरोग्याबाबतचे धोके. ब्रॅडफोर्ड, बर्मिंगहॅम व लंडनमधील रेडब्रिजबरोमधील बालमृत्यूंसंदर्भातील एका ब्रिफिंगनुसार, २० ते ४० टक्के मृत्यू नातेसंबंध आणि गुणसूत्रांच्या स्थितीशी संबंधित आनुवंशिक विकारांमुळे होतात”, असे वृत्त ‘द वीक’ने दिले आहे.

बॉर्न इन ब्रॅडफोर्डच्या अभ्यासात असे आढळून आले की, रक्ताच्या नात्यांतील पालकांपासून जन्मलेल्या मुलांमध्ये जन्मजात आरोग्य समस्या असण्याची शक्यता सहा टक्क्यांनी जास्त असते. जर दोन्ही पालकांमध्ये दोषपूर्ण जीन्स असतील, तर नातेसंबंधातून जन्मलेल्या मुलांना आनुवंशिक आजार होऊ शकतात, असे प्रजनन शास्त्रज्ञांचे मत आहे.

रक्ताच्या नात्यांतील विवाहाच्या समस्येला रेक्सेसिव्ह डिसीज, असे म्हटले जाते. त्यामुळे सिस्टिक फायब्रोसिस आणि थॅलेसेमियासारखे आजार जीन्समध्ये त्रुटी असल्याने उद्भवतात. २०२१ च्या एका अभ्यासानुसार, ५५ टक्के ब्रिटिश पाकिस्तानी लोकांचे विवाह रक्ताच्या नात्यांत होतात. आता ही पद्धत कमी होत चालली आहे. २००७ ते २०११ दरम्यान १३ हजार ५०० कुटुंबाचा अभ्यास करण्यात आला. बॉर्न इन ब्रॅडफोर्डनुसार असे आढळून आले की, पाकिस्तानी वंशाच्या ६० टक्के जोडप्यांचे विवाह रक्तातील नात्यांत झाले आहेत. मात्र, २०१६ ते २०२० दरम्यानच्या एका अभ्यासात हा आकडा ६० वरून ४० टक्क्यांपर्यंत घसरला. यूकेमध्ये जन्मलेल्या पाकिस्तानी वंशाच्या जोडप्यांमध्ये अशा प्रकारे विवाह करण्याचे प्रमाण सुमारे ३० टक्के होते.
नॉर्वेमध्ये अशा विवाहांवर बंदी आहे, तर स्वीडन व डेन्मार्कमध्येदेखील अशी पावले उचलण्याची योजना आखली जात आहे. दुसरीकडे, यूकेमध्ये बंदीची मागणी जोर धरत असताना अनेकांनी असाही इशारा दिला आहे की, या विवाहांना बेकायदा ठरवल्याने आधी विवाहबद्ध असलेल्यांना कलंक लागेल.

या संदर्भात अपक्ष खादार इक्बाल मोहम्मद यांनी सकारात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता बाळगण्याचे आवाहन केले. तसेच आरोग्याच्या बाबतीतील धोक्यांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रमदेखील सुचवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑक्सफर्ड विद्यापाठीताली एनएचएस नवजात शिशू शास्त्रज्ञ आणि नीतिशास्त्र तज्ज्ञ प्रोफेसर डोमिनिक विल्किन्सन यांनी या बंदीला विरोध करीत ती अनैतिक असल्याचे म्हटले आहे. त्याऐवजी त्यांनी अशा जोडप्यांनी मुले जन्माला घालण्याचा विचार करावा की नाही हे ठरविण्यास मदत करण्यासाठी एनएचएसकडे विशेष तपासणी करण्याचा प्रस्ताव मांडला.