-अमोल परांजपे

‘जर्मन पोलिसांच्या कारवाईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांहून २५ जणांना अटक’ अशी बातमी गेल्या आठवड्यात झळकली. जर्मनीचे कायदेमंडळ असलेल्या ‘बुंडेसटाग’मध्ये घुसून देशात रक्तरंजित सत्तांतर घडविण्याचा कट या लोकांनी आखल्याचा आरोप आहे. हिटलरच्या नाझी राजवटीचा अनुभव घेतलेला युरोप या बातमीने सावध झाला आहे. जर्मनीची सत्ता हाती घेणारे हे गट कोण आहेत, त्यांना जर्मनीची विद्यमान राजवट का पसंत नाही, याचे हे विश्लेषण.

जर्मनीमध्ये उठावाचा कट कुणी आखला होता?

जर्मनीच्या दहशतवादविरोधी पथकांनी २५ जणांना अटक केली. हे लोक अतिउजव्या विचारांचे असून त्यातील अनेक जण हे माजी सैनिक किंवा लष्करी अधिकारीही आहेत. त्यांनी ‘ऑपरेशन डे एक्स’ आखल्याचा आरोप असून, एका निश्चित दिवशी ‘राईशटाग’मध्ये शिरून चान्सेलरसह इतर मंत्र्यांना एक तर अटक करायची किंवा ठार करायचे आणि जर्मनीची सत्ता ताब्यात घ्यायची, असा कट त्यांनी आखल्याचे सांगितले जाते. साधारणतः नोव्हेंबर २०२१मध्ये, म्हणजे वर्षभरापूर्वी हा कट शिजल्याचा संशय जर्मन तपास यंत्रणांना आहे.

रक्तरंजित क्रांतीचा कट कसा उधळला गेला?

जर्मनीच्या ११ राज्यांमधील तब्बल १३० ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. तब्बल ३ हजार जवान या कारवाईत सहभागी झाले होते. देशातील ही आजवरची सर्वांत मोठी दहशतवादविरोधी कारवाई असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. २५ जणांना अटक झाली असून अन्य २७ संशयितही तपास यंत्रणांच्या निरीक्षणाखाली आहेत. हे सर्वजण ‘राईशब्युर्गर’ या संघटनेचे असल्याची माहिती आहे. या गटांमध्ये अनेक अतिउजवे, नाझीवादी असून त्यांच्यावर विशिष्ट विचारसरणीचा प्रभाव आहे.

‘राईशब्युर्गर’चा इतिहास काय आहे?

जर्मनीच्या पश्चिम भागात वृक्षराजींमध्ये लपलेला एक प्रासाद दिसतो. ‘क्योनिग्रिश डॉईचलँड’ अशी पाटी या प्रासादाच्या प्रवेशद्वारावर दिसते. याचा अर्थ आहे ‘जर्मनीचे साम्राज्य’. हा परिसर जर्मनीच्या लोकशाही  सरकारपासून स्वतःला स्वायत्त मानतो. साधारणतः २१ हजार लोकवस्तीचा हा परिसर आहे. हे लोक जर्मन सरकारला कर देत नाहीत. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेले सरकार अनधिकृत आहे, असे या ‘साम्राज्या’चे रहिवासी (जर्मन भाषेत ‘राईशब्युर्गर’) मानतात. अर्थातच, या ‘प्रजे’चा एक राजाही आहे.

स्वायत्त जर्मन साम्राज्याचा पुढारी कोण आहे?

या स्वयंघोषित जर्मन साम्राज्याच्या स्वयंघोषित सम्राटाचे नाव पीटर फ्लिट्झेक आहे. अर्थात ते स्वतःला ‘किंग पीटर प्रथम’ असे म्हणवून घेणे पसंत करतात. साधारणतः दशकभरापूर्वी त्यांनी आपला राज्याभिषेक करवून घेतला, तोदेखील अगदी जर्मन राजघराण्यांच्या परंपरेनुसार… विशेष म्हणजे त्यांचे स्वतःचे चलन आहे आणि नागरिकांना वेगळी ओळखपत्रेही दिली आहेत. त्यांचा स्वतःचा वेगळा राष्ट्रध्वजही आहे.

बंडाच्या कटाबाबत किंग पीटर यांची भूमिका काय आहे?

पीटर यांनी या कटामध्ये सहभागी असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. सध्या जर्मनीमध्ये ‘फॅसिस्ट आणि सैतानी राजवट’ असल्याचे ते सांगत असले आणि जर्मनीचे विद्यमान सरकार ‘विनाशवादी आणि आजारी’ असल्याचा त्यांचा आरोप असला तरी रक्तपातावर आपला विश्वास नाही, असे पीटर यांचे म्हणणे आहे. मात्र या कारवाईमुळे त्यांच्या या ‘साम्राज्या’ला गांभीर्याने घेतले पाहिजे, असे मात्र आता जर्मन नागरिकांना वाटू लागले आहे.

‘राईशब्युर्गर’बाबत जर्मनीचे मत बदलते आहे काय?

आतापर्यंत या स्वयंघोषित साम्राज्याकडे जर्मन जनता आणि राज्यकर्ते एक विनोद म्हणूनच बघत आले आहेत. माथेफिरू लोकांचा एक गट, यापलीकडे त्यांचे फारसे महत्त्व आहे असे कुणाला वाटले नव्हते. मात्र गेल्या आठवड्यातील घटनांमुळे हे मत आता बदलावे लागेल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रस्थापित यंत्रणेला विरोध असणे आणि ती उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणे, यामध्ये मोठा फरक आहे आणि त्यामुळे आता ‘राईशब्युर्गर’ना गांभीर्याने घेतले पाहिजे, असे जर्मनीला वाटू लागले असल्यास नवल नाही. या संघटनेची विचारसरणी ही अमेरिकेतील क्युअॅनन चळवळीशी मिळतीजुळती आहे. 

‘क्यूअॅनन’ चळवळ आणि त्यांची विचारसरणी काय आहे?

‘खरे म्हणजे संपूर्ण देश हा अत्यंत गुप्त असलेल्या निवडक लोकांच्या हाती आहे आणि हे लोक राजकीय पटलावर प्यादी हलवून राजकारण खेळत असतात,’ असे मानणारा एक मोठा गट अमेरिकेमध्ये आहे. जर्मनीमधील राईशब्युर्गर हे साधारणतः अशाच विचारांचे लोक असल्याचे मानले जाते. जर्मन राजघरण्याच्या वंशजांनाच सत्तास्थानी असले पाहिजे असे या गटास वाटते आणि त्यासाठी त्यांनी रक्तरंजित क्रांतीचा कट आखल्याचे सांगितले जात आहे.

कटाची योजना कशी आखली गेली?

जर्मन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम लष्करी पार्श्वभूमी असलेले अनेक जण या गटाने आपल्याकडे ओढले. किमान एक न्यायाधीश, एक जर्मन राजकुमार, अनेक आजी-माजी लष्करी अधिकारी आणि एक माजी पोलीस प्रमुख या गटासोबत असल्याचीही माहिती आहे. त्यांना रीतसर प्रशिक्षण दिले गेले. या गटाने आपले ‘शॅडो कॅबिनेट’ (स्वतःचे वेगळे मंत्रिमंडळ) विद्यमान राजवट उलथवून टाकल्यानंतर देशाचा कारभार चालवणे सोयीचे जावे, यासाठी बनवले. देशाची माहिती-तंत्रज्ञान प्रणाली हाती आली, की क्रांती यशस्वी करणे अधिक सोपे जाईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेला गांभीर्याने का घेतले पाहिजे?

आतापर्यंत झालेली दोन्ही जागतिक महायुद्धे ही जर्मनीच्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षेमुळे झाली आहेत, हा इतिहास आहे. युरोपमधील सर्वात ताकदवान असलेल्या या देशात घडलेली ही लहानशी घटना त्यामुळेच महत्त्वाची आहे. या क्रांतीचा उठाव फसला असला, तरी हे हिमनगाचे एक टोक असावे, असाही संशय आहे. त्यामुळे जर्मनीसह युरोप, अमेरिका आणि जगातील अन्य महत्त्वाची राष्ट्रे या घटनेला अधिक महत्त्व देत असल्याचे दिसत आहे.