How does internet works रेड सीमध्ये समुद्राखाली असलेल्या काही केबल्स नुकत्याच तुटल्याची अथवा कापल्या गेल्याचे वृत्त आहे. यामुळे रविवारी, ५ सप्टेंबर रोजी भारत, पाकिस्तान आणि आशियातील इतर भागांमध्ये इंटरनेट सेवा विस्कळीत झाली, तर मायक्रोसॉफ्टने याला मध्यपूर्वेत ‘विलंबाने सेवा मिळण्याचे महत्त्वाचे कारण’ म्हटले आहे. मंगळवारी असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेला एक जहाज जबाबदार होते. ‘समुद्राखाली असणाऱ्या केबल्स’ हा शब्दप्रयोग कदाचित विरोधाभासी वाटू शकतो, कारण विद्युत उपकरणे आणि पाणी हेच मुळात परस्परविरोधी आहेत, परंतु त्यांचा इतिहास १८०० सालापर्यंत मागे जातो. जगभरातील महासागरांध्ये आज या केबल्स हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेल्या आहेत. त्यांना इंटरनेट आणि आधुनिक दळणवळणाचा ‘कणा’ म्हटले जाते.

समुद्राखाली असणाऱ्या केबल्स म्हणजे काय?

या केबल्सना सबमरीन केबल्स असेही म्हटले जाते, या मूलतः जमिनीवरील तारांप्रमाणेच दळणवळणासाठी समुद्राच्या तळाशी टाकलेल्या तारा आहेत. या तारांमधूनच डेटा – प्रतिमा, आवाज, मजकूर – आदी साऱ्या माहितीचे वहन होते. हे सर्व वहन बायनरी कोडच्या माध्यमातून होते. बायनरी कोडमध्ये संख्यात्मक प्रणाली वापरली जाते, ज्यात फक्त दोन अंक असतात, १ आणि ०. डिजिटल उपकरणावरील प्रत्येक फोटो, मजकूर किंवा इतर माहिती संगणकाला समजण्यासाठी १ आणि ० च्या कोडमध्ये रूपांतरित केली जाते. आणि ही माहिती पुन्हा आपल्या मोबाईलपर्यंत पोहोचते तेव्हा तिला तिचे मूळ रूप प्राप्त होते. म्हणजेच एखादा व्हिडिओ माहिती म्हणून त्याचे वहन होताना तो एक आणि शून्य या कोडमध्ये रूपांतरीत होतो आणि गंतव्य स्थानी पोहोचल्यावर पुन्हा त्याचे मूळ रूप प्राप्त होते.

माहितीचे वहन कसे होते?

जगभरातील मोठ्या सेंटर्समध्ये डेटा मूळ स्वरूपात साठवलेला असतो, त्यात हजारो मशीन्स सतत सुरू असतात, त्यांना सर्व्हर म्हटले जाते, हे अद्ययावत क्षमतेचे शक्तिशाली संगणक असतात. जेव्हा आपण ऑनलाइन माहिती किंवा वेबसाइट शोधतो, आपले उपकरण सर्व्हरला त्या विशिष्ट वेबपेजची (उदा. Google.com) प्रत आपल्या उपकरणावर पाठवण्यासाठी विनंती पाठवते.

अवघ्या काही सेकंदात…

मोबाइल टॉवर्स मध्यस्थाची भूमिका बजावतात. फोन किंवा संगणक रेडिओ लहरींद्वारे (विद्युतचुंबकीय लहरींचा एक प्रकार) टॉवरला सिग्नल पाठवले जातात… टॉवर्स, डेटा सेंटरमधील उपकरणांना केबल्सद्वारे सिग्नल पाठवतात. त्यानंतर विनंती केलेली माहिती सर्व्हर मार्फत पॅकेट्सच्या स्वरूपात (बायनरी कोडमधील डेटाचे लहान बिट्स) पुन्हा केबल्सद्वारे पाठवली जाते. आणि ती पुन्हा टॉवर्सद्वारे लहरींच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचते. ही सर्व प्रक्रिया अवघ्या काही सेकंदात घडते.

समुद्राखालील केबल्स कशासाठी?

युनायटेड किंगडमसारख्या देशांमध्ये टेलिग्राफिक संदेश प्रसारित करण्यासाठी जमिनीवर तारा टाकल्यानंतर समुद्राखालील केबल्स हा पुढील टप्पा होता. विविध खंडांमध्ये माहिती शेअर करण्यासाठी, केबल्स समुद्रातून जोडण्याचा प्रयोग करण्यात आला. सुरुवातीला हा प्रयोग तुलनेने कमी अंतरासाठी करण्यात आला. अमेरिकन व्यापारी सायरस वेस्ट फील्डसह काही उद्योजकांनी अटलांटिक महासागरापलीकडील देशांना जोडण्याचे आव्हान सुरुवातीस स्वीकारले. यूकेच्या विज्ञान संग्रहालयातील माहितीनुसार, १८५६ साली फील्डने अटलांटिक टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. केबल्स तुटणे आणि इतर आव्हानांमुळे सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी झाले.

सर्वात मोठी समस्या

सर्वात मोठी समस्या होती ती म्हणजे तारा किंवा केबल्स वॉटरप्रूफ करणे. विज्ञान लेखक मायकल मायर्स यांनी म्हटले आहे की, इंडिया रबरसारखे पदार्थ अयशस्वी ठरले, परंतु “मलेशियन पालाकियम गुट्टा झाडाच्या दुधासारख्या असलेल्या रसाच्या रूपात आशेचा किरण संशोधकांना दिसला” ते गरम केल्यावर लवचिक होते आणि तारांच्या आकाराशी जुळवून घेऊ शकत होते, शिवाय समुद्रातील तापमानात ताण सहन करण्याची क्षमताही त्यात होती. ते उत्तम विद्युत इन्सुलेटर म्हणून काम करत होते. आशियातील एका ब्रिटिश सर्जनने इंग्लंडला त्याचे नमुने पाठवले आणि हा पदार्थ अखेरीस १८५० मध्ये इंग्लंड आणि फ्रान्स दरम्यानच्या पहिल्या सबमरीन केबलमध्ये पोहोचला, तिथे तांब्याच्या तारेला चहुबाजूंनी गुंडाळून बंद करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला.

समुद्राखाली असलेल्या केबल्सची पहिली चाचणी

१८५८ मध्ये, अटलांटिक टेलिग्राफ कंपनीची दोन जहाजे अटलांटिकच्या मध्यभागी अर्ध्या केबल्स घेऊन गेली. त्यांनी केबल्स जोडल्या आणि नंतर एक जहाज आयर्लंड आणि दुसरे कॅनडाला गेले व समुद्राखाली केबल्स टाकण्यात आल्या. दोन्ही जहाजे पोहोचल्यावर, “अभियंत्यांनी पहिली चाचणी केली तेव्हा सर्वांनी श्वास रोखून धरला, परंतु केबलने अपेक्षेप्रमाणे काम केले आणि त्यांनी दोन्ही बाजूंनी यशस्वीरित्या सिग्नल पाठवले आणि प्राप्त केले,” असे विज्ञान संग्रहालयाने नमूद केले.

पहिला संदेश…

राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकानन आणि राणी व्हिक्टोरिया यांनी औपचारिक अभिनंदनाच्या संदेशाची देवाणघेवाण केली आणि एका वृत्तपत्राने या घटनेचे वर्णन करताना म्हटले: “जुने आणि नवीन जग या घटनेने तत्काळ संपर्कात आले.” मात्र ही जोडणी फार काळ टिकू शकली नाही. त्यानंतर जड केबल्स वाहून नेण्यासाठी एका मोठ्या जहाजाची गरज होती. द ग्रेट ईस्टर्न, तेव्हाचे सर्वात मोठे जहाज त्यासाठी वापरण्यात आले. आणि १८६५ च्या मध्यापर्यंत, सुमारे २,६०० मैल (४,१०० किमी पेक्षा जास्त) नवीन केबल समुद्राखाली टाकण्यात आली होती. आणखी एका अयशस्वी प्रयत्नानंतर, एक मजबूत कनेक्शन अखेरीस अस्तित्वात आले.

undersea internet cable
समुद्राखालील केबलचा उभा छेद, ज्यात १ पॉलिथीन, ३ स्टीलच्या तारा, ७ तांब्याची नळी आणि ८ प्रत्यक्ष ऑप्टिकल फायबर आहेत. (विकिमीडिया कॉमन्स)

केसांपेक्षाही कमी जाडीच्या तारा…

नंतर फायबर ऑप्टिक फायबर केबल्सना प्राधान्य दिले जाऊ लागले, कारण त्या डेटा अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने हस्तांतरित करू शकतात. या अत्यंत पातळ तारा (मानवी केसांच्या जाडीपेक्षा कमी) काच किंवा प्लास्टिकपासून तयार झालेल्या असतात. प्रकाशाच्या वेगाने डेटाचे वहन करण्यासाठी तारांवर अनेक स्तरांचे आवरण असते, यात पॉलिथीन, तांबे, स्टील आणि पेट्रोलियम जेली यांचा समावेश असतो.

समुद्राखालील केबल्स कशा टाकल्या जातात?

यूएस नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) नुसार, समुद्राच्या पातळीपासून २,००० मीटरपेक्षा जास्त खोलीवर, त्या फक्त टाकल्या जातात, कारण मासेमारीची जाळी किंवा मोठ्या ट्रॉलर्ससारख्या मानवी हस्तक्षेपांमुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता कमी असते. कमी खोलीवर, नांगरासारखे फाळ असलेली यंत्रे समुद्राच्या तळाशी एक चर खोदतात आणि त्याच वेळी त्या खोदलेल्या चरामध्ये केबल्स टाकल्या जातात.

केबल्सना असलेला धोका

या केबल्सना अनेक धोके आहेत, भूकंपापासून ते समुद्रातील जोरदार प्रवाहांपर्यंत आणि जहाजातून टाकलेल्या नांगरांपर्यंत. एका व्हिडिओमध्ये शार्क मासा केबल चावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य दिसत होते. दुरुस्ती करणे हे एक कठीण आणि महागडे काम आहे, त्यासाठी साहजिकच पाणबुड्यांचा वापर करावा लागतो किंवा केबल्स परत जमिनीच्या पातळीवर आणून काम करावे लागते. २०१९ च्या सीएनएन अहवालानुसार, दरवर्षी सुमारे २०० घटना नोंदवल्या जातात, ज्यामुळे त्यांची दुरुस्ती करणे भाग पडते. बहुसंख्यवेळा मानवी हस्तक्षेपांमुळेच काही तरी घडलेले असते. केबल्समुळे राष्ट्रांसाठी सुरक्षा चिंता देखील वाढल्या आहेत, ऑस्ट्रेलियाने चीनी टेक दिग्गज हुआवेईला सिडनीला सोलोमन बेटांशी जोडणाऱ्या केबल टाकण्याच्या योजनेला तीव्र विरोध केला होता.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मेटा आणि गुगलसारख्या मोठ्या टेक कंपन्या अशा प्रकल्पांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करत आहेत, उदाहरणार्थ, मेटाने या वर्षाच्या सुरुवातीला प्रोजेक्ट वॉटरवर्थ (५०,००० किमी पेक्षा जास्त लांबीचा) जाहीर केला. ऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिट्यूटचे आर्थिक समाजशास्त्र आणि डिजिटल सामाजिक संशोधन विभागाचे प्राध्यापक विली लेहडोनविर्टा आणि डीफिल उमेदवार अन्निकी मिकेल्सार यांनी म्हटले आहे की, “जगातील सर्वात लांबलचक केबल एकाच सिलिकॉन व्हॅली फर्मच्या मालकीची असेल.” “डिजिटल बाजारपेठा आणि पायाभूत सुविधांमधील एकाधिकारशाहीबद्दल चिंतेत असलेल्या धोरणकर्त्यांसाठी हा बदल महत्त्वाचा असू शकतो: बिग टेक कंपन्या केवळ डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सेवांवरच नव्हे, तर डिजिटल जगाच्या भौतिक पायाभूत सुविधांवरही अधिकाधिक वर्चस्व गाजवत आहेत,” असेही त्यांनी म्हटले आहे.