संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेश विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात ५५ जागांसाठी सोमवारी (१४ फेब्रुवारी) मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात ५८ मतदारसंघांत ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांमधील ५५ जागांसाठी मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांचे प्रमाण अधिक असल्याने समाजवादी पक्षाला या टप्प्यात चांगल्या यशाची अपेक्षा आहे. भाजपनेही जोर लावला आहे. मतांचे ध्रुवीकरण कसे होते व अल्पसंख्याक मतांचे विभाजन किती होते यावर भाजप आणि समाजवादी पक्षाचे भवितव्य अवलंबून असेल.

दुसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे?

सहारणपूर, बिजनोर, मोरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बदायू, बरेली, शाहजहापूर या नऊ जिल्ह्यांमधील ५५ मतदारसंघात मतदान होत आहे. या जिल्ह्यांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मोरादाबादमध्ये सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांचे प्रमाण हे ५० ते ५५ टक्के आहे. साधारणपणे सरासरी ४० ते ४५ टक्के मुस्लीम मतदार या टप्प्यात आहेत. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील मतदानात मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानाला बाहेर पडले होते. हा कल लक्षात घेतल्यास दुसऱ्या टप्प्यातही मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतील अशी चिन्हे आहेत. मुस्लीम मतदानाचा टक्का वाढणे हे भाजपसाठी प्रतिकूल तर समाजवादी पक्षाला अनुकूल ठरू शकते.

गत वेळेला या मतदारसंघांतील चित्र कसे होते ?

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ५५ पैकी ३८ जागा भाजपने जिंकल्या होत्या. समाजवादी पक्षाने १५ तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. तेव्हा सप आणि काँग्रेसची आघाडी होती. सपच्या विजयी १५ उमेदवारांपैकी १० जण हे मुस्लीम होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत या भागातील ११ पैकी सात जागा समाजवादी पक्ष आणि बसप आघाडीने (तेव्हा सप व बसपची आघाडी होती) जिंकल्या होत्या.

भाजपपुढे आव्हान?

मुस्लीम, यादव, दलित यांची मोठ्या प्रमाणावर संख्या असलेल्या या पट्ट्यात भाजपपुढे गत वेळचे यश कायम राखण्याचे मोठे आव्हान असेल. भाजपची सारी मदार ही मतांच्या विभागणीवर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही लढाई ८० टक्के विरुद्ध २० टक्के असल्याचे सांगत त्याला धार्मिक आधारावर मतांची विभागणी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. उत्तर प्रदेशात २० टक्क्यांच्या आसपास मु्स्लीम लोकसंख्या असल्याने तसा रंग मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मानले जाते. या वेळी भाजप, समाजवादी पक्ष, बसप, काँग्रेस अशी बहुरंगी लढत आहे. मुस्लीम मते ही समाजवादी पक्ष, बसप, काँग्रेसमध्ये विभागली जातील. एमआयएमचे काही उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत. यामुळेच मतांच्या विभाजनाचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. या टप्प्यातील प्रचारात भाजपने समाजवादी पक्षावर हल्ला चढवित कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. अल्पसंख्याक मतदारांप्रमाणेच हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यावर भाजपचा भर होता. काँग्रेसने या भागात अधिक लक्ष घातले. त्यातच या भागातील एक प्रभावी मुस्लीम धर्मगुरूने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याने जागा वाढाव्यात हा काँग्रेसचा प्रयत्न असेल. एमआयएमला मुस्लीमबहुल भागात किती पाठिंबा मिळतो यावरही भाजप आणि समाजवादी पक्षाचे बरेच गणित अवलंबून असेल. बिहारमधील सीमांचल या मुस्लीमबहुल भागात एमआयएमने पाच जागा जिंकत काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचे गणित बिघडविले होते.

कोणाला फायदा ?

मुस्लीमबहुल भाग असल्यानेच समाजवादी पक्षाने २०, बसपने २३, काँग्रेसने २० मुस्लीम उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. भाजपचा मित्र पक्ष अपना दलाने (सोनेलाल गट) एक मुस्लीम उमेदवाराला रिंगणात उतरविले आहे. याशिवाय एमआयएमही मुस्लीम मतांवर डल्ला मारू शकतो. मुस्लीमबहुल भागात हिंदू मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपचा त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न दिसतो

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up polls second phase uttar pradesh election samajwadi party voting pmw 88 print exp 0222
First published on: 13-02-2022 at 09:32 IST