History of death rituals India: वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये मृत्यूनंतरच जग कसं असतं, याविषयी वेगवेगळ्या धारणा आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारही वेगवेगळ्या प्रकारे केले जातात. ज्या परंपरांमध्ये एकच जन्म मानला जातो, त्या परंपरेतील लोक मृतदेह थडग्यांमध्ये ठेवतात आणि समाधी किंवा दगडांच्या स्मृतिचिन्हांनी त्या ठिकाणांना चिन्हांकित करतात. याउलट ज्या संस्कृतींमध्ये पुनर्जन्माला प्राधान्य दिले जाते, त्या संस्कृतीतील लोक मृतदेह निसर्गाकडे सुपूर्त करतात. म्हणून दहन, मृतदेहाचे पाण्यात विसर्जन करणे किंवा प्राण्यांकडे सुपूर्त करणे या पद्धती अवलंबल्या जातात.
आसाममध्ये अहोम राजे १३ व्या शतकात चीनमार्गे आग्नेय आशियातून आले. ते मृत व्यक्तींना मातीच्या टेकड्यांमध्ये पुरत असत. या टेकड्यांना ‘मोइडम’ असे म्हणतात. काही वेळा राजांबरोबर त्यांच्या सेवकांनाही जिवंत पुरण्यात येत असे. मात्र, नंतर जेव्हा अहोम राजे हिंदू झाले, तेव्हा त्यांनी चितासंस्काराची पद्धत स्वीकारली. हिंदू परंपरेनुसार दहनानंतर अस्थी गोळा करून नदीत विसर्जित केल्या जातात. ज्यामुळे आत्म्याचा पुनर्जन्म प्राप्त होतो, अशी धारणा आहे. अशा प्रकारे अंत्यसंस्कारांच्या पद्धतीत बदल झाल्यास, संस्कृतीतही मोठे परिवर्तन घडते.
प्रागैतिहासिक ते वेदकाळातील अंत्यसंस्कार परंपरा
प्रागैतिहासिक कालखंडात मृतदेह पुरताना मडक्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असे. प्राथमिक दफन (primary burial) पद्धतीत मृतदेह थेट मडक्यांमध्ये ठेवून पुरले जात. तर, द्वितीय दफन (secondary burial) पद्धतीत चितेवरील अस्थी गोळा करून त्या मडक्यांमध्ये ठेवून नंतर पुरल्या जात होत्या. तामिळ संगम काव्यांमध्येही एका विधवेने कुंभाराला आपल्या मृत पतीसाठी मोठे मडके तयार करून देण्याची विनंती केल्याचा उल्लेख आहे.
प्रागैतिहासिक कालखंडातील दफन स्थळांमध्ये ‘सिस्ट’ देखील आढळतात. सिस्ट म्हणजे दगडांनी आच्छादलेले खड्डे. सिस्ट हे विशेषतः दक्षिण भारतात सापडतात.
हडप्पा संस्कृतीत चितासंस्काराचा प्रचलित पुरावा आहे, पण अनेक समाजांनी मृतदेह पुरण्याची पद्धत अवलंबली होती. हडप्पामध्ये अशा समाधी सापडल्या आहेत, जिथे फारच कमी दफनवस्तू जसे की मणी किंवा काही मडकी ठेवलेली दिसतात. धोलावीरा येथे असेही पुरातन टेकाड सापडले आहे, जिथे मृतदेह सापडत नाहीत. कदाचित ही स्मृतिस्तंभ स्वरूपातील टेकडी असावी, जी परदेशात गेलेल्या किंवा परदेशात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आली असावी.
दख्खनच्या प्रदेशात महाश्मयुगीन म्हणजे लोहयुगीन (इ.स.पू. १०००) पुरणस्थळांशी संबंधित स्मारके सापडतात. गंगा-यमुना नदीच्या खोऱ्यात वैदिक संस्कृती फुलत असताना महाश्मयुगीन संस्कृती ही दक्षिण भारतात बहरत होती. या पुराणस्थळांवर दोन उभ्या दगडांवर आडवा दगड ठेवून एक प्रकारचे स्मारक उभारले जात असे, याला डोल्मेन म्हणतात. या संरचनेच्या खाली मृत व्यक्तीच्या हाडांबरोबरच अन्नही ठेवले जाई, जेणेकरून मृतांची आठवण जिवंत ठेवता येई.
वेदांमध्ये चितासंस्कार आणि दफन या दोन्ही पद्धतींचा उल्लेख आहे. रामायण आणि महाभारतातही चितासंस्काराची परंपरा दिसते. दशरथावर, रावणावर चितासंस्कार झाले होते, कौरवांवरही चितासंस्कार करण्यात आले होते. अंत्यसंस्कारानंतर पितरांना अन्न अर्पण करण्याची परंपराही होती.
चितासंस्कार प्रामुख्याने उच्चवर्णीय समाजांमध्ये रूढ झाले, त्यांना लाकूडफाटा परवडू शकत होता. अनेक निम्नवर्णीय समाज आजही वैदिकपूर्व दफनपद्धतींचा अवलंब करत असतात. मृतदेह घराच्या शेतात पुरण्याची प्रथा आजही काही ठिकाणी प्रचलित आहे, त्यातून त्या भूमीवर हक्क दर्शवला जातो.
स्तूप, समाधी आणि दगड
भारताच्या अनेक भागांमध्ये विशिष्ट धार्मिक समुदायातील लोकांना बसलेल्या स्थितीत पुरण्याची परंपरा आहे. धार्मिक जीवन जगणाऱ्यांचा पुनर्जन्म होत नाही, अशी धारणा आहे. अनेक हिंदू मठांमध्ये संतांना बसलेल्या अवस्थेत पुरले जाते आणि त्यांच्या समाधीवर खास तयार केलेल्या मडक्यात तुळस लावली जाते.
जैन साधूंना दफन करताना त्यांच्या समाधीस्थळी अनेकदा झाड लावले जात असे किंवा त्यावर स्तूप उभारण्यात येत असे. चितेवर संस्कार केल्यानंतर अस्थींच्यावर स्तूप बांधण्याची प्रथा बौद्धधर्मीयांनी देखील स्वीकारली होती. वैदिक लोकांनी बौद्ध धर्मीयांना “अस्थीपूजक” म्हणून उपहासाने संबोधल्याचा उल्लेखही आढळतो. बौद्धधर्मीय मृतदेह किंवा अस्थी दफन स्थळांना स्तूप म्हणत, तर हिंदू आणि जैन परंपरेत अशा ठिकाणांना समाधी म्हणतात.
कधी कधी मृत्यू किंवा चितासंस्काराच्या जागी मंदिर बांधून, त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली जात असे. अशी प्रथा काही चोल राजांनी स्वीकारली होती. राजस्थान, गुजरात आणि भारतातील अनेक भागांमध्ये वीरगळ उभे केले जात असत, हे वीरगळ त्या योद्ध्याच्या स्मरणार्थ होते, ज्याने गावावरच्या आक्रमणांपासून किंवा जंगली प्राण्यांपासून गावाचे रक्षण करताना प्राण दिला होता.
सतीशिळा त्या जागेवर उभी केली जात असे जिथे स्त्रियांनी आपल्या पतीच्या चितेबरोबर स्वतःही अग्निसमाधी घेतली होती. कर्नाटकमध्ये निशिधीशिळा उभारण्यात येते, जी त्या ठिकाणाची खूण असते जिथे जैन साधूंनी उपवास करून देहत्याग केला होता.
कबरी, गुमट्या आणि मंडप
इ.स. १० व्या शतकानंतर इस्लामी संस्कृती भारतात आल्यावर कबरी बांधण्याची प्रथा सुरू झाली. मात्र, कबर बांधणे ही अरबी परंपरा नव्हे. ही परंपरा मध्य आशियातून आली आहे. अरब लोक मृतांना जमिनीत पुरत असत, तर प्राचीन झरथुस्त्री धर्मीय (पारशी) लोक मृतदेह गिधाडांसारख्या वन्य पक्ष्यांना देत.
मध्य आशियातील जमातींनी इस्लाम स्वीकारल्यानंतर कबरी बांधण्याची पद्धत अधिक प्रचलित झाली आणि त्यांनी भारतात भव्य कबरी बांधण्यास सुरुवात केली. त्यामुळे १० व्या शतकानंतर भारतात खिलजी, तुघलक, लोदी आणि सूर घराण्यांच्या कबरी बांधल्या गेल्या. त्यानंतर प्रसिद्ध मुघल स्मारके उभारली गेली, त्यात ताजमहाल सर्वात प्रसिद्ध आहे. सुफी संतांच्या समाधीस्थळांना देखील यात्रा स्थळाचे स्वरूप आले.
ही इस्लामी प्रथा पाहून अनेक राजपूतांनी शाही चितासंस्काराच्या जागी गुमट्या आणि मंडप उभारले. त्यांनाच छत्र्या म्हणतात. अशा छत्र्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही आढळतात. ही प्रथा १३ व्या ते १९ व्या शतकादरम्यान लोकप्रिय झाली. आजही अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या दहनसंस्काराच्या जागी ‘समाधी’ उभारली जाते. ही गोष्ट वैदिक परंपरेच्या विरोधात आहे, कारण वैदिक श्रद्धेनुसार पुनर्जन्म सुलभ होण्यासाठी मृताच्या कोणत्याही अवशेषांचा ठावठिकाणा ठेवू नये.
ईशान्य भारतातील मोनपा या आदिवासी समुदायात मृतदेहाचे १०८ तुकडे करून ते नदीत टाकले जातात, जेणेकरून मासे त्यास भक्षण करतील.
भारतभरातील अंत्यसंस्कार स्मारकांचा अभ्यास केल्यावर देशातील विविध धार्मिक परंपरा आणि श्रद्धांचा वेध घेता येतो.
विषयाशी संबंधित प्रश्न:
- आसाममधील अहोम राजे पूर्वी मृतांना मोइडम नावाच्या टेकाडांमध्ये पुरत असत. नंतर त्यांनी ही प्रथा सोडून दहन संस्कार का स्वीकारला? त्यांच्या संस्कृतीत हा बदल कशामुळे घडला?
- वीरगळ, सतीशिळा आणि निशिधीशिळा यांचा नेमका अर्थ काय आहे? या स्मारकांमधून कोणते ऐतिहासिक प्रसंग आणि सामाजिक मूल्ये जपली गेली आहेत?
- अंत्यसंस्काराच्या पद्धती जात, वर्ग आणि आर्थिक क्षमतेवर कशा अवलंबून राहिल्या? उदा. दहन संस्कारासाठी लाकडाचा खर्च केवळ काही वर्गांनाच परवडतो, ही गोष्ट समाजव्यवस्थेत कशी दिसून येते?
- भारताच्या अंत्यसंस्कार स्थापत्य परंपरेत पर्शियन, मध्य आशियाई आणि स्थानिक परंपरांचा कसा संगम घडला? यामधून स्थापत्यकलेची कोणती ऐतिहासिक घडामोड उलगडते?
- भारतभरातील विविध अंत्यसंस्कार स्मारकांचा अभ्यास केल्यावर, देशातील विविध धर्म, श्रद्धा, रूढी आणि परंपरांची कोणती बहुरंगी चित्रपटपट आपल्या समोर उभी राहते? यावर सविस्तर विचार मांडावा.