scorecardresearch

Premium

Uttarakhand Silkyara Tunnel : मजुरांना बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावणारे अरनॉल्ड डिक्स कोण आहेत? जाणून घ्या…

चारधाम यात्रेच्या मार्गावरील निर्माणाधीन असलेल्या सिलक्यारा बोगद्याचा काही भाग कोसळल्यामुळे ४१ मजूर या बोगद्यात अडकून पडले होते.

UTTRAKHAN TUNNEL AND Arnold Dix
अरनॉल्ड डिक्स यांनी मजुरांना बाहेर काढण्याच्या मोहिमेत मोलाचे योगदान दिले. (फोटो सौजन्य- एएनआय)

साधारण दोन आठवड्यांपासून उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या मजुरांची सुटका करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून या क्षेत्रातील तज्ज्ञ अहोरात्र मेहनत करत होते. या बचावमोहिमेकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले होते. शेवटी मंगळवारी (२८ नोव्हेंबर) या सर्व ४१ मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली. या बचावकार्यात ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय बोगदातज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्याच नेतृत्वाखाली ही बचावमोहीम पार पडली. याच पार्श्वभूमीवर अरनॉल्ड डिक्स कोण आहेत? त्यांना या बचावमोहिमेसाठी थेट ऑस्ट्रेलियाहून का बोलावण्यात आले होते? हे जाणून घेऊ या….

१२ नोव्हेंबरपासून अडकले होते मजूर

चारधाम यात्रेच्या मार्गावरील निर्माणाधीन असलेल्या सिलक्यारा बोगद्याचा काही भाग कोसळल्यामुळे ४१ मजूर या बोगद्यात अडकून पडले होते. त्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी साधारण दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून प्रयत्न सुरू होते. मात्र शेवटी या प्रयत्नांना यश आले असून सर्व ४१ मजुरांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. हे बचावकार्य करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), उत्तराखंडचे राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) यांच्यासह अनेक यंत्रणांच्या हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात होते. या बचावकार्यादरम्यान मंगळवारी (२८ नोव्हेंबर) बोगद्यात अडकलेला पहिला मजूर बाहेर आला. सर्व मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकांद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

part of commercial building obstructing widening of the road was demolished mumbai municipal corporation
रस्ता रुंदीकरणाआड आलेल्या व्यावसायिक इमारतीचा काही भाग तोडला, पश्चिम उपनगरात प्रथमच केला पालिकेने प्रयोग
Uttarakhand riots
उत्तराखंडमध्ये दगडफेक, ५० पोलीस जखमी, दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, मध्यरात्री काय घडलं?
fire breaks out shiravane midc under construction building navi mumbai
नवी मुंबई : निर्माणाधीन इमारतीला आग तीन तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण
tiger from Tipeshwar sanctuary
टिपेश्वर अभयारण्यातील ‘त्या’ वाघाची फासातून सुटका, शिकाऱ्यांनी लावला होता…

…नंतर रॅट होल तंत्रज्ञानाची मदत

हे बचावकार्य करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मजुरांच्या सुटकेसाठी बोगद्यात खोदकाम केले जात होते. त्यासाठी अत्याधुनिक असे ऑगर यंत्र वापरले जात होते. मात्र, खोदकाम करताना ऑगरचे तुकडे झाल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘रॅट होल’ तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. त्यासाठी उत्तर प्रदेशमधून रॅट होल खाणकामगार तसेच तज्ज्ञांना बोलावण्यात आले होते. याच रॅट होल मायनिंगच्या मदतीने अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात आले.

कौशल्य पणाला लावून मजुरांच्या सुटकेसाठी प्रयत्न

बचावकार्याच्या या मोहिमेत ONGC, SJVNL, RVNL, NHIDCL तसेच THDCL अशा एकूण पाच संस्था मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होत्या. मुळचे ऑस्ट्रेलियाचे आणि जिनेव्हा येथील इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशनचे (जिनेव्हा) प्रमुख अरनॉल्ड डिक्स हेदेखील या मोहिमेत त्यांचे कौशल्य पणाला लावून मजुरांची सुटका करण्याचा प्रयत्न करत होते. ते एक भूगर्भशास्त्र, अभियंता, वकीलही आहेत.

विज्ञान आणि कायद्याचे पदवीधर

डिक्स हे मोनॅश विद्यापीठातून विज्ञान आणि कायद्याच्या शिक्षणात पदवीधर आहेत. ते एक निष्णात वकील म्हणूनदेखील ओळखले जातात. गेल्या तीन दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केलेली आहे. भूगर्भातील सुरक्षेविषयी त्यांनी आपले विशेष योगदान दिलेले आहे. त्यांनी २०१६ ते २०१९ या काळात कतारमधील रेड क्रिसेंट सोसायटी (QRCS) मध्येही काम केलेले आहे. अरनॉल्ड डिक्स यांनी २०२० साली अंडरग्राऊंड वर्क्स चेंबर तयार करण्यासाठी लॉर्ड रॉबर्ट मायर पीटर विकरी यांच्यासोबतही काम केलेले आहे.

डिक्स यांना मिळाले अनेक पुरस्कार

जमिनीत बोगदा तयार करण्याच्या तंत्रात डिक्स यांचा हातखंडा आहे. टोकियो सिटी विद्यापीठात ते व्हिजिटिंग प्राध्यापक आहेत. ते या विद्यापीठात इंजिनिअरिंग (बोगदे) बाबत अध्यापन करतात. त्यांच्या या कामाबद्दल डिक्स यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांना २०११ साली अॅलन नेलँड ऑस्‍ट्रॅलेशियन टनेलिंग सोसायटीचा बाय-अॅन्यूअल पुरस्‍कार मिळालेला आहे. बोगदानिर्मितीत असलेल्या प्राविण्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. २०२२ साली त्यांना अमेरिकेतील नॅशनल फायर प्रोटेक्शनतर्फे कमिटी सर्व्हिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

डिक्स काय म्हणाले होते?

बोगद्यात अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका करण्यासाठी डिक्स प्रचंड मेहनत घेत होते. त्यांनी २२ नोव्हेंबर रोजी पीटीआयशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना, “मला बोगद्यात अडकलेल्या ४१ लोकांची सुखरूप सुटका करायची आहे. मला तुम्हा कोणालाही निराश करायचे नाही. मला वाटतं बोगद्यात अडकलेल्या सर्वांचीच सुखरूप सुटका होईल”, असे डिक्स म्हणाले होते. दरम्यान, आता सर्व मजुरांना सुरक्षितपणे बोगद्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे, त्यामुळे सर्वच स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे. डिक्स यांचेदेखील देशभरातून आभार व्यक्त केले जात आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uttarakhand silkyara tunnel all 41 worker rescued know who is international tunnelling experts arnold dix prd

First published on: 29-11-2023 at 13:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×