जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी भांडवली बाजारात झालेल्या मोठ्या घसरणी पाहिल्या आहेत. सरासरी गुंतवणूकदाराप्रमाणे, त्या अनिश्चिततेच्या काळात त्यांच्या संपत्तीला कोणतीही झळ बसलेली नाही. बाजारातील घसरणीचा उपयोग त्यांनी प्रत्येक वेळी आपली संपत्ती वाढवण्याची संधी म्हणून केला. यामुळे बफे यांची गुंतवणूक रणनीती नेमकी कशी होती, ते समजून घेऊया.

भीती आणि लोभाचा नेमका वापर

वर्ष २००८ मध्ये, जागतिक आर्थिक संकटामुळे सर्वत्र बाजार कोसळले, तेव्हा जागतिक कीर्तीचे गुंतवणूकतज्ज्ञ वॉरन बफे यांनी सर्वात मोठी जोखीम पत्करत गोल्डमन सॅक्समध्ये ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. त्यादरम्यान अमेरिकी भांडवली बाजारात अर्थात ‘वॉल स्ट्रीट’वर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. मला दर्जेदार आणि चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करायला आवडतात, असे २००८ च्या भागधारकांना लिहिलेल्या पत्रात बफे यांनी म्हटले आहे. बाजार घसरणीत गोल्डमन सॅक्समध्ये ५ अब्ज डॉलरच्या केलेल्या गुंतवणुकीवर बफे यांनी ३ अब्ज डॉलरहून अधिक नफा मिळवला होता. मार्च २०२०मध्ये करोना महासाथीमुळे सेन्सेक्स ४२,००० अंशांवरून २५,००० अंशांपर्यंत खाली घसरला होता. ज्यांनी बफे यांच्या सल्ल्यानुसार पडझडीच्या काळात एचडीएफसी बँक, टीसीएस आणि एशियन पेंट्ससारख्या मजबूत कंपन्या निवडल्या, त्यांनी कमी किमतीत १८ महिन्यांत त्यांचे पैसे दुप्पट केले. महासाथीचा अपघातही अंतिम धक्का नसून बाजारासाठी संधीचा ठरला.

किमतीपेक्षा मूल्याकडे लक्ष आवश्यक का?

किंमत म्हणजे तुम्ही जे देता ते, मूल्य म्हणजे तुम्हाला जे मिळते ते, असे बफे गुंतवणूकदारांना कायम सांगतात. वर्ष २००० ते २००२ दरम्यान जेव्हा ‘डॉट-कॉम’चा फुगा फुटला तेव्हा तंत्रज्ञानाशी संबंधित (टेक स्टॉक्स) कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली. बफे यांनी कंपन्यांचा अभ्यास करून अधिक किमती असलेल्या तंत्रज्ञान कंपन्यांपासून दूर राहून मोठे नुकसान टाळले. वर्ष २००८ मध्ये भारतीय शेअर बाजार कोसळण्याच्या वेळीही असेच घडले. बऱ्याच लोकांनी जास्त किमतीच्या पायाभूत सुविधा कंपन्यांचे शेअर आणि गृहनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. परंतु ज्या गुंतवणूकदारांनी बफे यांचा दृष्टिकोन जाणून घेऊन ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात अर्थात हिंदुस्तान युनिलिव्हर किंवा नेस्ले इंडियासारख्या मजबूत ‘फंडामेंटल’ असलेल्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित केले, त्यांनी बराच नफा मिळवला, ते देखील कोणताही अनावश्यक धोका न पत्करता. या कंपन्यांच्या शेअरने केवळ पैशाचे संरक्षण केले नाही तर पुढील दशकात त्यांनी भागधारकांना लक्षणीय संपत्ती निर्माण करून दिली.

‘फॅट पिच’ संधी म्हणजे काय?

बफे अनेकदा ‘फॅट पिच’साठी टिकून राहण्याच्या त्यांच्या ‘बेसबॉल’ धोरणाबद्दल सांगतात, ज्याला ते कृती करण्याची आदर्श संधी म्हणून पाहतात. या धोरणासाठी संयम आणि रोख रक्कम असणे आवश्यक आहे. वर्ष २००८ मध्ये, बफे यांनी स्वतः जवळ सुमारे २० अब्ज डॉलर रोख रक्कम ठेवली होती, ज्यामुळे त्यांना गोल्डमन सॅक्स आणि जनरल इलेक्ट्रिकसारख्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करता आली. तसे, बफे यांच्याकडे सध्या ३०० अब्ज डॉलरची रोख आहे. भारतीय भांडवली बाजारात गुंतवणूक करतानादेखील गुंतवणूकदारांनी योग्य संधीचा फायदा घेण्यासाठी स्वतःचा निधी उभारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वर्ष २०१८ मध्ये जेव्हा ‘आयएल अँड एफएस’ संकटामुळे बाजार घसरला, तेव्हा रोख रकमेसह तयारी करणाऱ्यांनी बजाज फायनान्ससारख्या उच्च दर्जाच्या एनबीएफसी कंपनीमध्ये गुंतवणूक केली आणि नफा मिळवला. तेव्हापासून या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पटींनी वाढले आहे. दर काही वर्षांनी अशी संधी निर्माण होत असते. पुढील ‘फॅट पिच’ पकडण्यासाठी नेहमीच तरलता राखण्याचे महत्त्व हे अधोरेखित करते.

शेअरमूल्यापेक्षा व्यवसाय कामगिरी… 

वर्ष १९८७ मध्ये ‘ब्लॅक मंडे’च्या दिवशी अमेरिकी शेअर बाजार एका दिवसात २२ टक्क्यांनी घसरला. त्यावेळी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणाले की, जेव्हा इतर लोभी असतात तेव्हा आपण काळजीपूर्वक पाऊल टाकावे आणि जेव्हा बाजारात इतर लोक घाबरले असतील तेव्हा आपण लोभी होऊन समभाग खरेदी करावे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, बर्कशायरने एखाद्या सतत किमती वाढणाऱ्या कंपनीचे शेअर खरेदी करण्याऐवजी चांगले व्यवसाय खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित केले. वर्ष २०२० मध्ये करोना काळात बाजार घसरल्यानांतर डी-मार्टसारख्या कंपन्यांनी बफे यांची रणनीती कशी कार्य करते हे दाखवून दिले. कमी कर्ज, उत्तम इन्व्हेंटरी नियंत्रण आणि व्यवसाय करण्याचा सिद्ध मार्ग असलेला व्यवसाय म्हणून डी-मार्टमध्ये गुंतवणूक केलेल्या भागधारकांनी आज चांगला नफा मिळवला.

दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक का असतो?

बफे यांची सर्वात मोठी शिकवण म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून संयम राखणे. वर्ष १९७३-७४ च्या मोठ्या बाजारातील घसरणीदरम्यान डाऊ जोन्स जवळजवळ ४५ टक्क्यांनी घसरला, मात्र त्यावेळी बफे यांनी गुंतवणूक सुरूच ठेवली. भारतीय गुंतवणूकदारांनीदेखील व्यवसायासंबंधित वृत्त आणि पहिल्या पानाच्या मथळ्यांमधून सतत होणाऱ्या चर्चांकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. वर्ष २००८, २०१३ आणि २०२०सारख्या कठीण काळात ज्यांनी गुंतवणूक स्थिर ठेवली होती त्यांनी २००८ मध्ये सेन्सेक्स ८,००० अंशांवरून २०२३ पर्यंत ६५,००० अंशांवर; तर २०२४ मध्ये त्याने ८५,००० अंशांची उच्चांकी पातळी गाठली होती त्यातून लाभ मिळवला. जलद नफ्यासाठी बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टीकोन  बाळगल्यास नफा निश्चितच होतो.

बफे यांच्या संपत्ती निर्मितीचे सूत्र काय?

वॉरन बफे यांची बाजार घसरणीतील रणनीती भारतीय गुंतवणूकदारांना उपयुक्त आहे. बाजारात इतर गुंतवणूकदार घाबरले असताना धाडसी राहून, कंपनीच्या शेअरच्या किमतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्याच्या मूल्यावर लक्ष केंद्रित करून, रोख रक्कम उपलब्ध ठेवून, दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार करून शेअर खरेदी करावे. हेच बफे यांच्यादेखील संपत्ती निर्मितीचे सूत्र राहिले आहे. पडत्या बाजाराचा वापर करून त्यावेळी घाबरण्याऐवजी गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करण्याची उत्तम संधी असते. वेगवेगळ्या बाजार टप्प्यांमध्ये कायमस्वरूपी संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूकदारांकडे संयम असणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

gaurav.muthe@expressindia.com