अमोल परांजपे

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदानाला अद्याप ११ महिने बाकी असले, तरी त्या देशात ‘निवडणूक ज्वर’ आतापासूनच चढू लागला आहे. याचे कारण आहे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या पक्षांमध्ये जानेवारीमध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षीय उमेदवार ठरवण्यासाठी पक्षांतर्गत प्राथमिक निवडणुकीच्या फेऱ्या… रिपब्लिकन पक्षात डोनाल्ड ट्रम्प यांना बरीच आव्हाने असली तरी सध्या तेच आघाडीवर असल्याचे चित्र आहे. डेमोक्रॅटिक पक्षात विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फारसा विरोध नसला, तरी त्यांना प्रामयरीजची औपचारिकता पूर्ण करावीच लागेल. यानिमित्ताने अमेरिकेतील दोन प्रमुख पक्षांमध्ये कोणते राजकारण शिजत आहे, अंतिमत: अध्यक्षपदाची लढत कुणामध्ये रंगेल, निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात, याचा हा सविस्तर आढावा…

अमेरिकेत प्रायमरीजची प्रक्रिया काय आहे?

अमेरिकेतील दोन प्रमुख पक्ष, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक यांच्या घटनेनुसार कोणतीही मुख्य निवडणूक (हाऊस, सेनेट, गव्हर्नर, राष्ट्राध्यक्ष इ.) लढायची असेल, तर इच्छुकाला आधी स्वत:च्या पक्षातून निवडून यावे लागते. युरोपातील अनेक देश, कॅनडा येथेही अशीच पद्धत आहे. मात्र अमेरिकेतील प्रक्रिया ही प्रचंड गुंतागुंतीची आहे. राज्या-राज्यांमध्ये प्रायमरीजमध्ये कोण मतदान करू शकते, याचे वेगवेगळे नियम आहेत. उदाहरणार्थ; कनेक्टिकट, डेलावेअर आदी १३ राज्ये आणि वॉशिंग्टन राजधानी परिक्षेत्रात ‘क्लोज्ड प्रायमरीज’ होतात. निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत पक्षाचे सदस्यत्व घेतले असेल, तरच तेथे मतदान करता येते. अलास्का, कॅलिफोर्निया आदी १६ राज्यांमध्ये ‘निष्पक्ष’ (इंडिपेंडंट) अशी नोंदणी केलेल्या नागरिकांना आपल्या पसंतीच्या पक्षातील उमेदवाराला मतदान करण्याची परवानगी (सेमी क्लोज्ड प्रायमरीज) असते. ओपन प्रायमरीजमध्ये नोंदणीकृत मतदार कोणत्याही पक्षातील उमेदवाराला मतदान करू शकतो. अलाबामा, अलास्का, जॉर्जिया आदी १४ राज्यांमध्ये ही पद्धत आहे. ही राज्ये विशेषत: महत्त्वाची मानली जातात. कारण आपले मतदार पाठवून विरोधी पक्षातील उमेदवार निवडीवर प्रभाव टाकणे येथे शक्य होते.

हेही वाचा >>>विश्लेषण : राखीव वनक्षेत्रातल्या प्रकल्पांत ‘असुरक्षित’ काय?

प्रायमरीजसाठी मतदान कधी होणार?

सध्या सगळ्या जगाचे लक्ष लागलेल्या रिपब्लिकन पक्षातील प्राथमिक फेरी १५ जानेवारीपासून सुरू होईल. त्या दिवशी आयोवा राज्यात नामांकनाची पहिली लढत रंगेल. त्यानंतर आठवड्याभराने न्यू हॅम्पशायर येथे रिपब्लिकन पक्षांतर्गत प्राथमिक निवडणूक होईल. त्यापाठोपाठ नेवाडा, साउथ कॅरोलिना आणि मिशिगन या राज्यांत प्रायमरीज होतील. डेमोक्रॅटिक पक्षांतर्गत निवडणुकांची सुरूवात फेब्रुवारीमध्ये साउथ कॅरोलिनामधून होईल. मात्र सर्वात महत्त्वाचा दिवस असेल ५ मार्च. हा दिवस ‘सुपर ट्युसडे’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी कॅलिफोर्निया, टेक्साससारखी डझनभर राज्ये पक्षांच्या वार्षिक अधिवेशनांमध्ये आपल्या उमेदवाराची निवड करतील. दोन्ही पक्ष ग्रीष्मकालीन नामनिर्देशन अधिवेशनांमध्ये सर्वाधिक मते मिळविणाऱ्या उमदेवाराला अध्यक्षीय निवडणुकीसाठी नामनिर्देशित करतील. रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन व्हिस्कॉन्सिनमध्ये तर डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन शिकागोमध्ये होईल. अध्यक्षीय निवडणूक नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी, म्हणजे ५ नोव्हेंबर २०२४ रोजी होतील.

रिपब्लिकन उमेदवारांची स्थिती काय?

७७ वर्षांचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चार वर्षांच्या खंडानंतर दुसऱ्या कार्यकाळासाठी आपले नशीब आजमावित असून सद्यःस्थितीत अन्य उमेदवारांपेक्षा आघाडीवर आहेत. २०२०च्या निवडणुकीनंतर ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटॉल हिलवर झालेल्या हल्ल्यासह अनेक महत्त्वाचे खटले ट्रम्प यांच्याविरोधात सुरू आहेत. मात्र रिपब्लिकन पक्षात त्यांच्या अतिउजव्या धोरणांचे समर्थक मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक प्राथमिक फेरीच्या प्रचारात या मुद्द्यांना बगल देतानाच आढळून येत आहेत. उलट त्यांना पक्षांतर्गत आव्हान दिलेले फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटिस आणि संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निकी हॅले यांना ट्र्प यांच्यावरील खटल्यांचा बायडेनविरोधी लढतीत फायदा होऊ शकेल, अशा मताचे आहेत. न्यूजर्सीचे माजी गव्हर्नर आणि पक्षातील अन्य एक उमेदवार क्रिस क्रिस्टी यांनी मात्र ट्रम्प यांच्या कृतीचा जाहीर निषेध केला असून अलास्काचे माजी गव्हर्नर असलेले आणखी एक दुबळे उमेदवार असा हचिन्सन यांनीही ट्रम्प यांच्यावर टीका सुरू ठेवली आहे. ट्रम्प यांच्यासारखीच धोरणे असलेले भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामस्वामी हेदेखील प्रायमरीजच्या मैदानात आहेत. मात्र यांच्यातील कुणीच सध्या तरी ट्रम्प यांना पराभूत करण्याच्या स्थितीत नाही. डिसँटिस यांनी सुरुवातीची पकड आता गमावली आहे. वादविवादात (डिबेट्स) चांगली चुणूक दाखविल्यावर निकी हॅले यांची लोकप्रियता काहीशी वाढली असली तरी ती पुरेशी ठरेल का, याची तज्ज्ञांना शंका आहे.

हेही वाचा >>>एक वर्षापूर्वी राजकारणातून निवृत्तीचा विचार, सामानही हैदराबादला पाठवले; मग असं काय घडलं की नरसिंहराव पंतप्रधान झाले?

बायडेन यांना दुसरा कार्यकाळ मिळणार?

साधारणत: विद्यमान अध्यक्ष दुसऱ्या कार्यकाळासाठी अध्यक्षीय निवडणूक लढणार असेल, तर त्याला पक्षातून फारसा विरोध होत नाही. बायडेनही याला अपवाद नसले तरी मिनेसोटाचे फारसे प्रचलित नसलेले काँग्रेस सदस्य डीन फिलिप्स यांनी प्रायमरीजमध्ये बायडेन यांना आव्हान देण्याची घोषणा ऑक्टोबरमध्ये केली आहे. मात्र अंतिमत: बायडेन यांच्याच गळ्यात माळ पडण्याची शक्यता अधिक असून तसे झाल्यास ८१व्या वर्षी ते अमेरिकेतील सर्वाधिक वयाचे अध्यक्षीय उमेदवार ठरतील. करोनाच्या साथीनंतर सावरलेली अर्थव्यवस्था, ‘अमेरिकेच्या आत्म्यासाठी लढा’ उभारून ट्रम्प यांच्या धोरणांना चालविलेला विरोध या बायडेन यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. मात्र गेल्या वर्षभरात वाढलेली महागाई त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. आगामी निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार कोण असेल, यावर डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रचाराची दिशा ठरेल. पुन्हा ट्रम्प यांना मैदानात उतरविले गेले, तर लोकशाही धोक्यात येण्याची भीती डेमोक्रॅटिक प्रचाराच्या केंद्रस्थानी असेल. त्यामुळे जानेवारी ते मार्च या काळात होऊ घातलेल्या प्ररायमरीज या नोव्हेंबरमधील मुख्य निवडणुकीइतक्याच लक्षवेधी ठरणार आहेत. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

amol.paranjpe@expressindia.com