भारतात उशीरा का होईना पण मान्सून सक्रिय झाला आहे. उष्णतेचा पारा वाढल्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी भाजीपाल्याचा दराचा पारा मात्र चढाच दिसत आहे. भाजीपाल्याचे कडाडलेले दर सामान्यांच्या खिशाला झळ पोहोचवत आहेत. देशातील अनेक घाऊक बाजारपेठांमध्ये टोमॅटो आणि इतर भाजीपाल्याचे दर रोज वाढताना दिसत आहेत. लिंबू, अद्रक, हिरव्या मिरच्या, टोमॅटो आणि इतर भाजीपाल्याचे दर कडाडल्याचे राजस्थान पासून ते केरळपर्यंत जाणवत आहेत. पावसाळा सुरू होताच भाजपील्याचे दर वाढण्याची कारणे काय आहेत? याबाबत घेतलेला हा आढावा.

कोणत्या शहरांमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले

फर्स्टपोस्ट वेबसाईटने माध्यमात आलेल्या विविध बातम्यांचे विश्लेषण करून याबाबत एक लेख लिहिला आहे. केरळमधील होसूर, म्हैसुरू, कोलार आणि तिरुअनंतपुरम या शहरांमध्ये टोमॅटो, लिंबू, अद्रक आणि मिरचीचा दर किलोमागे १०० रुपयांच्या वर गेला आहे. यामुळे अनेक सामान्य नागरिकांचे घरगुती खर्चाचे बजेट कोलमडले आहे. देशातील अनेक बाजारामध्ये टोमॅटोचा दर १०० रुपये प्रतिकिलो, अद्रकचा दर ६० ते २४० रुपये प्रतिकिलो झाला आहे. याचप्रमाणे हिरव्या मिरचीची मागणीही वाढली असून मिरचीचा दर वधारला आहे. मिरचीला मागच्या महिन्यात ४० रुपये प्रतिकिलो दर होता, या महिन्यात किरकोळ बाजारात हा दर १६० रुपये किलोच्या आसपास पोहोचला आहे. छोट्या कांद्याच्या दरातही वाढ झाली आहे. ४० रुपये किलोने मिळणारा कांदा आता शंभरीपार गेला आहे.

loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
navi mumbai municipal corporation, appeals residents
उष्णतेमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

मुंबई आणि उपनगरातदेखील भाज्यांचे दर कडाडले आहेत. १९ जून रोजी वाशीच्या एपीएमसी घाऊक बाजारात टोमॅटोचा दर १५ रुपये प्रतिकिलो होता, तर किरकोळ बाजारात ४० रुपये किलोने टोमॅटो मिळत होते. मात्र २६ जून रोजी, टोमॅटोचे दर भडकले असून घाऊक बाजारात ६० रुपये आणि किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो दराने टोमॅटो विकले जात आहेत.

हे वाचा >> विश्लेषण : टोमॅटो उत्पादक अन् ग्राहक दोघेही चिंतेत; भाव वाढण्याचे कारण काय?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, गुवाहटीमध्ये भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. उदाहरणार्थ, याठिकाणी दोडका ३० ते ४० रुपये किलोने विकला जात होता, त्याचा दर आता वाढून ८० ते १२० रुपये प्रतिकिलो एवढा झाला आहे. भेंडीचा दर ८० रुपयांवरून वाढून १३० रुपये आणि हिरव्या मिरचीचा दर वाढून १५० रुपये किलो एवढा झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये अद्रक, टोमॅटो आणि भेंडीचा दर अनुक्रमे १००, ४७ आणि ५७ रुपये प्रतिकिलो आहे, अशी बातमी टेलिग्राफने दिली आहे.

न्यूज१८ ने दिलेल्या बातमीनुसार, राजस्थानमध्ये १५ दिवसांपूर्वी घाऊक बाजारपेठेत तीन रुपये किलो दराने हिरव्या मिरच्यांचा पुरवठा झाला होता, अशी माहिती एका पुरवठादाराने दिली. आज हिरव्या मिरच्यांचा दर २५ रुपये प्रतिकिलो (घाऊक बाजारात) झाला आहे. दोडका प्रतिकिलो ८ ते १० रुपये प्रतिकिलोने विकला जात होता, आज त्याची किंमत वाढून २५ रुपये प्रतिकिलो झाली आहे. यासोबतच भेंडी, कोबी, अद्रक, लिंबू, दोडका आणि इतर भाजांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत.

भाजीपाल्याचे दर वाढण्यासाठी कोणते घटक कारणीभूत

कर्नाटकमध्ये पर्जन्यमान अतिशय कमी राहिल्याने भाजीपाल्याचे दर वाढले असल्याचे तेथील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. “आमच्या येथे पाऊस व्यवस्थित झालेला नाही, तसेच यावर्षी उन्हाळाही तीव्र होता. त्यामुळे भाजीपाल्याच्या पिकांना त्याचा फटका बसला. तापमानातील बदल आणि पुरेसा पाऊस न पडल्यामुळे टोमॅटोच्या पिकांवर किटक-रोगराईचा हल्ला झाला”, अशी माहिती बंगळुरूच्या केआर बाजारातील व्यापारी मंजुनाथ यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

तर मुंबईमध्ये दरवाढ होण्याचे कारण सांगताना व्यापाऱ्यांनी म्हटले की, यावर्षी उन्हाळा नेहमीपेक्षा कडक होता, तर पावसाचेही आगमन उशीरा झाल्याने शेतकऱ्यांनी इतर पिके घेण्यास प्राधान्य दिले. राजस्थानमध्ये भाजीपाला आणि विशेषतः टोमॅटाचा दर वाढण्यामागे बिपरजॉय चक्रीवादळ आणि त्यामुळे पडलेला मुसळधार पाऊन कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. बिपरजॉय चक्रीवादळामुळे काही भागात पावसाचे आगमन लवकर झाले. शेतकऱ्यांच्या पिकाची नासधूस झाली. ज्यामुळे टोमॅटोच्या दरात पाच पटीने वाढ झाल्याचे दिसत आहे. तसेच इतर भाजीपाल्याच्या किंमतीमध्ये दोन ते तीन पटींनी वाढ झाली आहे.

बंगळुरू, नाशिक, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातून अधिकतर भाजीपाला आणि टोमॅटोचा पुरवठा होत असतो.

टोमॅटो ट्रेडर्स असोसिएशनचे (TTA) अध्यक्ष अशोक कौशिक यांनी दिल्लीमधील आझादपूर मंडी येथे बोलताना सांगितले की, मार्च ते जून महिन्यात राजधानी दिल्लीत हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यातून टोमॅटाचा पुरवठा झाला. मात्र मे महिन्यात या राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. ज्यामुळे आता टोमॅटोचा पुरवठाही आटला आहे.

हवामान बदलामुळे भारतातील शेती क्षेत्र सर्वाधिक असुरक्षित आहे. ‘इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन व्हेजिटेबल क्रॉप्स अँड इट्स मिटिगेशन’ या संशोधन निंबधात हवामान बदलांमुळे पिकांच्या नुकसानाचा आढावा घेण्यात आला आहे. उत्पन्न कमी होणे, पिकांचा दर्जा कमी होणे आणि पिकांवर रोग तसेच किटकांचा प्रभाव वाढल्यामुळे भाजीपाला उत्पादन घेणे तोट्याचे होत चालले आहे.

आगामी काळात दोन महिन्यांचा श्रावण आणि तीन दिवसांच्या ईद-उल-झुहा या सणांमुळेही भाजीपाल्याचे दर चढेच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पर्जन्यमानाची भूमिका

पावसाचे जेव्हा जेव्हा आगमन होते, तेव्हा भाजीपाल्याचे दर वाढतात, असा एक अनुभव आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान होणे, वितरणाच्या साखळीत अडथळे निर्माण होणे, मागणी वाढणे, काही विशिष्ट भागांवर भाजीपाल्यासाठी अवलंबून असणे आणि पिक काढणीनंतर होणारे नुकसान या कारणांमुळे भाज्याचे दर पावसाळ्यात वाढतात, अशी माहिती न्यूज१८ ने दिली आहे.

पिकांचे नुकसान : मुसळधार पावसामुळे पाणी साचणे, पूर परिस्थिती निर्माण होणे, अशा कारणांमुळे पिकांचे नुकसान होते किंवा जे पिक हातात येते ते खाण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे भाजीपाल्याची कमतरता भासून दरवाढ होते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार गुवाहटीमध्ये पूराच्या पाण्यामुळे १० हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले.

पुरवठा साखळीते येणारे अडथळे : पावसामुळे दळणवळणात निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे शेतकऱ्याकडून घाऊक बाजारात भाजीपाला वाहून नेणे जिकरीचे बनते. काही ठिकाणी पाण्यामुळे रस्ते बंद होतात, अशावेळी भाजीपाल्याची वाहतूक ठप्प होते. ज्यामुळे शहरातील घाऊक बाजारात भाजीपाल्याचा कमी पुरवठा होऊन भाव गगनाला भिडतात.

वाढती मागणी : पावसाळ्यामध्ये विशिष्ट भाज्यांना अधिक मागणी असते, त्यामुळे त्याचा ताण पुरवठ्यावर येतो आणि दरवाढ होते.

पुरवठ्यासाठी विशिष्ट क्षेत्रावरील अवलंबत्व : भाजीपाल्याचा पुरवठा करणारे काही विशिष्ट क्षेत्रावर अवलंबत्व असल्यामुळे त्याठिकाणी पाऊस किंवा इतर काही कारणांचा नकारात्मक परिणाम झाल्यास पुरवठा खंडीत होतो. शेतीचे नुकसान किंवा दळणवळणाच्या समस्या निर्माण झाल्यास घाऊक बाजारातील भाजीपाल्याचा पुरवठा खुंटतो आणि त्याच्या परिणामस्वरुप दरवाढ होते.

उदाहरणार्थ, बंगळुरू आणि नाशिकमधून घाऊक बाजारात ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटोचा पुरवठा होतो. यावर कर, कमिशन आणि मजुरी लावल्यानंतर हेच देर प्रतिकिलो ८० ते ८५ रुपयांच्या घरात पोहोचतात. त्यानंतर किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलो दराने टोमॅटो मिळत आहेत.

पिक काढणीनंतरचे नुकसान : पावसाळ्यात जास्त ओलावा असल्यामुळे भाज्या लवकर कुजतात. त्यामुळे पिक काढणीनंतर लवकर ते बाजारात न पोहोचल्यास त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि दर वाढतात.

ही दरवाढ तात्कालिक आहे का?

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बाजारातील दरवाढीची ही स्थिती बदललेल्या ऋतूमुळे निर्माण झालेली आहे. पुढील काळात दर खाली येतील. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला अशी दरवाढ पाहायला मिळते.

कन्ज्युमर अफेअर्सचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी सांगितले की, टोमॅटोच्या बाबतीतला मागच्या पाच वर्षांतला डेटा पाहिल्यास क्वचितच टोमॅटोचे दर इतके वाढलेले दिसतात. पण हे दर लवकरच खाली येतील. दिल्लीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास पुढच्या दहा दिवसांमध्ये हिमाचल प्रदेशमधून पुरवठा सुरू होईल.