-अभय नरहर जोशी

अमेरिकेत २३ डिसेंबर रोजी मोठ्या हिवाळी वादळाने अमेरिकेच्या काही भागाला झोडपले. अतिथंड वातावरण, तीव्र वारे व प्रचंड हिमवृष्टीमुळे किमान नऊ जणांचा मृत्यू झाला. दहा लाखांहून अधिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. ख्रिसमस व नववर्ष स्वागतासाठी केलेले सुटीचे नियोजनही विस्कटले. हवामानतज्ज्ञ या वादळाला ‘बॅाम्ब चक्रीवादळ’ संबोधत आहेत. हे ‘बॅाम्ब चक्रीवादळ’ म्हणजे नक्की काय, हे जाणून घेऊयात…

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

‘बॅाम्ब चक्रीवादळा’ची व्याख्या काय?

‘वॉशिंग्टन पोस्ट’ने ‘बॅाम्ब चक्रीवादळा’ची दिलेली व्याख्या अशी : या वादळात हवेचा मध्यवर्ती दाब किमान २४ तासांसाठी प्रति तास एक ‘मिलीबार’च्या (वातावरणाचा दाब मोजण्याचे एकक) वेगाने कमी होतो. हवेचा सामान्य दाब सुमारे एक हजार १० मिलीबार असतो. परंतु अमेरिकेत हा वातावरणाचा दाब एक हजार तीन मिलीबारवरून ९६८ मिलीबारपर्यंत घसरल्याचा अंदाज आहे. हा दाब जेवढा कमी होईल तितकेच मोठे वादळ निर्माण होते. अमेरिकेत हा दाब ३५ मिलीबारने घटला आहे. त्यामुळे अतिशय कमी वेळात वेगाने या वादळाची तीव्रता वाढते.  हवामानतज्ज्ञ त्याला ‘विस्फोटक बॅाम्बोजेनेसिस’ म्हणतात. परंतु हवेचा हा दाब घटण्याची कारणेही अनेक असतात.

ही चक्रीवादळे कशी निर्माण होतात?

इतर वादळांप्रमाणेच, भिन्न तापमानाच्या वायू वस्तुमानांची धडक झाल्याने ‘बॅाम्ब चक्रीवादळ’ निर्माण होते. जेव्हा थंड व कोरडी हवा उत्तरेकडून खाली सरकते व उष्ण कटिबंधातून येणारी उष्ण व दमट हवा वरच्या दिशेने सरकते. उष्ण हवा झपाट्याने वाढून, दमटपणामुळे ढग तयार होतात. त्यामुळे हवेचा दाब घटतो. त्यामुळे या कमी दाबाच्या केंद्राभोवती घड्याळाच्या उलट दिशेने फिरणारे वादळ विकसित होते. उष्ण वारे मोठ्या प्रमाणात या वादळाच्या परिभ्रमणात खेचले जाऊन वर्तुळाकार पद्धतीने फिरून वरच्या दिशेने बाहेर पडतात. जेव्हा हे वारे चक्रवातात आत खेचले जाण्याऐवजी अधिक प्रमाणात बाहेर पडतात तेव्हा हवेचा दाब अजून घटतो. विशेषत: उत्तर ध्रुवीय वाऱ्यांचे वस्तुमान हे सध्या अमेरिकेत येत असलेल्या या वाऱ्यांप्रमाणे थंड असेल ( उदाहरणार्थ- २३ डिसेंबर रोजी मोंटानाचे तापमान उणे ४५ अंशापर्यंत घसरले होते)  तर हवेतील तापमानातील हा फरक या प्रक्रियेला पोषक ठरतो अन् वादळ जलद गतीने प्रबळ होत जाते.

‘बॅाम्ब चक्रीवादळ’ अन्य चक्रीवादळांपेक्षा वेगळे कसे?

कॅलिफोर्निया विद्यापीठातील हवामान शास्त्रज्ञ डॅनियल स्वेन यांनी सांगितले की, ‘बॅाम्ब चक्रीवादळे’ ही संपूर्णपणे नेहमीच्या चक्रीवादळांप्रमाणे नसतात. बॅाम्ब चक्रीवादळांत चक्रीवादळांसारखी वैशिष्ट्ये असू शकतात. अतिवेगवान वारे, मुसळधार पाऊस आदी वैशिष्ट्ये या वादळांतही आढळतात. नेहमीची चक्रीवादळे सामान्यतः उष्णकटिबंधीय भागात निर्माण होतात. त्यासाठी सागरातील तुलनेने उष्ण पाणी पोषक ठरते. म्हणूनच अमेरिकेत जेव्हा उन्हाळ्यात किंवा शरद ऋतूच्या प्रारंभी समुद्राचे पाणी जास्त उष्ण असते तेव्हा चक्रीवादळे निर्माण होतात. मात्र, या उलट बॅाम्ब चक्रीवादळांना अशा उष्ण सागरी पाण्याची गरज भासत नाही. ही वादळे सागरासह भूप्रदेशावरही निर्माण होतात. सामान्यत: ही वादळे शरद ऋतूच्या अखेरीस किंवा वसंत ऋतूच्या प्रारंभी येतात. या काळात उष्णकटिबंधीय वाऱ्यांचा ‘आर्क्टिक’ प्रदेशातून येणाऱ्या थंड हवेशी संपर्क आल्यावर ही बॅाम्ब चक्रीवादळे तयार होतात.

बॅाम्ब चक्रीवादळे किती प्रबळ असतात?

बॉम्ब चक्रीवादळांमुळे मुसळधार पाऊस किंवा हिमवृष्टी, किनारपट्टीवर पुराची शक्यता असते. तसेच ते वाऱ्याचे प्रबळ झोत निर्माण करतात. डॅनियल स्वेन यांनी सांगितले, की इतर शक्तिशाली वादळांप्रमाणेच या वादळांचा प्रभाव असतो. मात्र, ‘बॅाम्ब चक्रीवादळे’ खूप कमी वेळात शक्तिशाली बनतात. त्यांच्या या वेगवान आगमनाने नागरिकांना प्रतिबंधक उपाययोजना किंवा आश्रय घेण्यास फारशी उसंत मिळत नाही. हाच या वादळांचा सर्वांत मोठा धोका आहे. या वर्षी अमेरिकेतील ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात धडकलेल्या एका बॅाम्ब चक्रीवादळाने तब्बल दोन फुटापर्यंत हिमवृष्टी केली. २०१९ मध्ये ‘पॅसिफिक नॉर्थवेस्ट’ भागात आलेल्या अशाच एका वादळात वाऱ्यांचा वेग प्रतितास १०६ मैल होता.

‘बॉम्ब चक्रीवादळ’ असे का म्हणतात?

‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे हवामानशास्त्रज्ञ फ्रेडरिक सँडर्स व जॉन आर. ग्याकुम यांनी १९८० मध्ये लिहिलेल्या शोधनिबंधात या वादळांबद्दल ‘बॅाम्ब चक्रीवादळ’ हा नवा शब्दप्रयोग केला होता. ग्याकुम यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला सांगितले, की उन्हाळ्याव्यतिरिक्त व चक्रीवादळाच्या नेहमीच्या हंगामात न येणाऱ्या या वादळांची तीव्रता प्रभावीपणे सांगण्यासाठी हा शब्दप्रयोग आम्ही केला.

अमेरिकेतील दैनंदिन जीवनावर कोणता परिणाम?

दि. २३ डिसेंबर रोजी अमेरिकेस हिवाळ्यातील या ‘बॅाम्ब चक्रीवादळा’चा तडाखा बसल्याने विमान उड्डाणे रद्द करावी लागली अथवा त्यांना विलंब झाला. त्याचा हजारो नागरिकांना फटका बसला. अमेरिकेत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सुमारे दहा हजार ४०० विमानांना विलंब झाला. याशिवाय पाच हजार ७५३ विमानउड्डाणे रद्द करण्यात आली. मिनेसोटा, आयोवा, विस्कॉन्सिन व मिशिगनचा जवळपास सर्वच भाग दाट हिमाच्छादित झाला होता. ईशान्येकडील अनेक राज्यांत अचानक पूर आला. नागरिकांना हिवाळ्यातील वादळाचा इशारा देण्यात आला होता. तसेच उपायही सुचवले होते. हवामानतज्ज्ञांनी सांगितले, की या कडाक्याच्या थंडीत कोणीही बाहेर पडल्यास त्याला काही मिनिटांतच ‘हिमबाधा’ होण्याचा धोका असतो. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने (एनडब्ल्यूएस) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अमेरिकेच्या काही भागांत या सप्ताहाच्या अखेरपर्यंत उणे ४५ ते उणे ५६ अंश सेल्सियस तापमानापर्यंत पारा घसरण्याची शक्यता आहे.