कॅथलिक पंथीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. पोप फ्रान्सिस यांचे उत्तराधिकारी निवडण्यासाठी रोमन कॅथलिक कार्डिनल्सनी ७ मेपासून धर्मगुरूंच्या गुप्त बैठकीचे (कॉन्क्लेव्ह) आयोजन केले आहे. नवा पोप फ्रान्सिस यांच्या सामाजिक न्यायतत्त्वाला धरून पुढे जाणारा असावा की सेंट जॉन पॉल-२ किंवा पोप बेनेडिक्ट १६ वे यांच्यानुसार तत्त्वांना धरून पुढे जाणारा असावा यावरून मतभेद आहेत. कॉन्क्लेव्हमध्ये नेमके काय होते, नव्या पोपची निवड कशी केली जाते, यांविषयी…

कॉन्क्लेव्ह म्हणजे काय?

कॅथलिक सर्वोच्च धर्मगुरू पोप यांचे निधन झाले किंवा त्यांनी पदत्याग केल्यास नव्या पोपची निवड करण्यात येते. यासाठी गुप्त प्रकिया राबवली जाते, ज्याला कॉन्क्लेव्ह असे म्हणतात. पोपची निवड पारंपरिकरीत्या ‘कार्डिनल्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ धर्मगुरूंकडून केली जाते. ही प्रक्रिया अत्यंत गोपनीय असून मध्ययुगीन काळापासून चालत आलेली निवडणूक प्रक्रिया आहे. कॉन्क्लेव्ह हा शब्द इटालियन ‘कॉन क्लेव्ह’ (एक चावी असलेली) या शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. लॅटिनमध्ये याचाच अर्थ ‘बंद खोली’ असा होतो. नवा पोप निवडण्यासाठी बंद खोलीत कार्डिनल्सची बैठक घेतली जाते, त्यामुळे त्याला कॉन्क्लेव्ह असे म्हटले गेले आहे.

ही प्रक्रिया कशी चालते?

पोपची निवड करण्यासाठी जबाबदारी नेहमीच कॅथलिक चर्चमधील वरिष्ठ धर्मगुरूंकडे असते, ज्यांना कार्डिनल्स असे म्हणतात. नव्या पोपची निवड होईपर्यंत कार्डिनल्सचा बाह्य जगाशी कोणताही संपर्क नसतो. सध्या जगभरात २५२ कार्डिनल्स आहेत, ते बिशपही असतात. मात्र केवळ ८० वर्षांखालील कार्डिनल्सलाच नव्या पोपच्या निवडणुकीत सहभाग घेण्याचा अधिकार असतो. फ्रान्सिस यांच्या मृत्यूच्या वेळी ८० वर्षांपेक्षा कमी वयाचे १३५ कार्डिनल्स होते आणि त्यामुळे कॉन्क्लेव्हमध्ये भाग घेण्यास ते पात्र आहेत, परंतु ते सर्व उपस्थित राहतील की नाही याबाबत शंका आहे. ८० किंवा त्याहून अधिक वयाचे कार्डिनल्स कॉन्क्लेव्हमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. परंतु निवडणुकीपूर्वी आयोजित केलेल्या दैनंदिन, बंद-दरवाज्याच्या सत्रांमध्ये सामील होऊ शकतात, ज्याला जनरल कॉन्क्लेव्ह म्हणतात, जिथे वरिष्ठ धर्मगुरू चर्चसमोरील समस्यांवर चर्चा करतात.

नव्या पोपची निवड कशी केली जाते?

नव्या पोपची निवड करण्याची वेळ येते, त्या वेळी सर्व कार्डिनल्सला व्हॅटिकन सिटी येथे कॉन्क्लेव्हसाठी बोलावले जाते. दिवसाची सुरुवात सकाळी कार्डिनल्स कॉलेजचे डीन कार्डिनल जियोव्हानी बॅटिस्टा रे यांच्या प्रार्थना सभेने होते. सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये या प्रार्थना सभेचे आयोजन केले जाते. त्यानंतर सिस्टिन चॅपलमध्ये सर्व कार्डिनल्स एकत्र जमतात. तिथे ‘एक्स्ट्रा ऑम्मेस’ असा शब्द उच्चारल्यानंतर कार्डिनल्सचा बाह्य जगाशी कोणताही संपर्क राहत नाही. ‘एक्स्ट्रा ऑम्मेस’चा लॅटिन भाषेनुसार अर्थ ‘ऑल आऊट’ म्हणजे ‘प्रत्येकाने बाहेर जावे’ असा होतो. हा आदेश दिल्यानंतर कार्डिनल इलेक्टर्स म्हणजेच मुख्य मतदार वगळता तिथे उपस्थित असलेले सर्व जण मतदान प्रक्रिया सुरू करण्यासाठी सिस्टिन चॅपल सोडतात. कॉन्क्लेव्हच्या पहिल्या दिवशी कार्डिनल इलेक्टर्सना मत देण्याचा पर्याय असतो. दोन-तृतीयांश बहुमत मिळविण्यासाठी जर त्यांना पहिल्या मतपत्रिकेवर पोपचा उत्तराधिकारी सापडला नाही, तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मतदान प्रक्रियेला सुरुवात करतात. दुसऱ्या दिवशीपासून ते दररोज सकाळी दोन आणि दुपारी दोन मतदान करतात. जोपर्यंत पोप पदासाठीचे उमेदवार निवडला जात नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया चालते.

एकूण कार्डिनल इलेक्टर्सची संख्या किती?

८० वर्षांपेक्षा कमी वयोमान असलेल्या कार्डिनल इलेक्टर्सची संख्या सध्या १३५ आहे. २०१३ मध्ये फक्त ४८ देशांमधून कार्डिनल येत असे, आता मात्र ७१ देशांमधून ते येतात. सर्वाधिक कार्डिनल इलेक्टर्स युरोपमधून ५३, तर आशियातून २३, आफ्रिकेतून १८, दक्षिण अमेरिकेतून १७, उत्तर अमेरिकेतून १६, मध्य अमेरिकेतून चार आणि ओशनियातून चार येतात. इटलीमध्ये सर्वाधिक १७ कार्डिनल्स असून अमेरिकेत १० आणि ब्राझीलमध्ये ७ आहेत.

या प्रक्रियेत महिलांचा सहभाग का नाही?

पोप फ्रान्सिस आणि त्यांच्या आधीचे पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी महिलांना धर्मोपदेशक म्हणून नियुक्त करण्यावरील बंदी कायम ठेवली आहे, ज्यामुळे त्यांना पोप होण्यापासून रोखले जाते. कॅथलिक सिद्धांतानुसार, पुरोहितपद पुरुषांसाठी राखीव आहे, कारण ख्रिस्ताने त्याचे १२ प्रेषित म्हणून फक्त पुरुषांची निवड केली. ही शिकवण दैवी प्रेरणा आणि अचूक मानली जाते, असे धर्मपंडितांचे मत आहे.

मतदान प्रक्रिया गुप्त आहे का?

पोपच्या निवडची परिषद म्हणजेच कॉन्क्लेव्ह ही अतिशय गुप्त असते. कार्डिनल या काळात व्हॅटिकन सिटीच्या बाहेर जाऊ शकत नाही. नभोवाणी ऐकण्याची, दूरचित्रवाणी, मोबाइल पाहण्याची किंवा वृत्तपत्र वाचण्याचीही त्यांना मुभा नसते. त्यांना दूरध्वनीवरूनही कोणाशीही संपर्क साधता येत नाही. त्यांच्या निवासस्थानीही त्यांना कोणाशीही संपर्क साधता येत नाही. बेनेडिक्टने कॉन्क्लेव्हमध्ये गुप्ततेची शपथ अधिक कठोर केली आहे. कॉन्क्लेव्हमध्ये काय घडले हे बाह्य जगतात उघड करणाऱ्यांना कठोर शासन केले जाते आणि त्याला स्वयंचलित बहिष्काराचा सामना करावा लागतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोपची निवड झाल्यावर काय केले जाते?

कॉन्क्लेव्हमधील मतदान सत्राच्या शेवटी मतपत्रिका जाळल्या जातात. दिवसातून दोनदा वापरण्यात आलेल्या मतपत्रिका दंडगोलाकार चुलीत टाकल्या जातात. या मतपत्रिका जाळल्यानंतर सिस्टिन चॅपेलच्या चिमणीतून धूर बाहेर पडतो. व्हॅटिकन सिटीबाहेरील लोकांना पोप निवडीसंदर्भातील माहिती समजावी म्हणून ही प्रक्रिया केली जाते. चिमणीतून काळा धूर आला तर मतदानातून कोणताही निर्णय झालेला नाही, तर पांढरा धूर आला तर नव्या पोपची निवड झाली असून कॉन्क्लेव्हमध्ये त्याचा स्वीकार केलेला आहे, हे दर्शविले जाते. रंगाबाबत कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून रासायनिक पदार्थ सोडले जातात. काळा धूर निर्माण करण्यासाठी मतपत्रिकांबरोबर पोटॅशियम पर्क्लोरेट, अँथ्रासीन, कोळशाच्या टारचा घटक आणि सल्फर असलेली काडतुसे जाळली जातात. पांढऱ्या धुरासाठी मतपत्रिकांसह पोटॅशियम क्लोरेट, लॅक्टोज आणि क्लोरोफॉर्म रेझिनची काडतुसे जाळली जातात. पोपच्या निवडीचे संकेत देण्यासाठी अधिक स्पष्टतेसाठी घंटाही वाजवली जातात. पोपची निवड झाल्यानंतर सेंट पीटर स्क्वेअरसमोरील सज्जातून ‘हॅबेमस पॅपम’ अशी घोषणा दिली जाते. ज्याचा लॅटिनमध्ये अर्थ ‘आपल्याला पोप मिळाले’ असा होतो. या घोषणेनंतर निवडलेल्या पोपच्या नावाने घोषणा होते आणि नवा पोप कार्यभार स्वीकारून पहिला आशीर्वाद देतो.
sandeep.nalawade@expressindia.com