महाराष्ट्रासमोर हायड्रो गांजाच्या फैलावाचे मोठे आव्हान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच विधान परिषदेत बोलताना याविषयी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, ड्रग्ज सिंडिकेट तस्करीसाठी विविध मार्गांचा वापर करत असल्याने ‘हायड्रो गांजा’ किंवा हायड्रोपोनिक गांजा हे राज्यासाठी एक आव्हान ठरत आहे. मुंबईत २१.५५ कोटी रुपये किमतीच्या २१ किलो हायड्रोपोनिक गांजासह दोन इंडोनेशियन नागरिकांना अटक करण्यात आली. देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले? काय आहे हायड्रो गांजा? राज्यात याचा फैलाव वाढतोय का? त्याविषयी जाणून घेऊया.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय माहिती दिली?
नवी मुंबईतील रहिवासी नवीन चिचकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. फडणवीस यांनी सांगितले की, “नवीन चिचकर नावाची एक व्यक्ती आहे, तो हायड्रो गांजाचे काम करीत होता. देशातून तो पळून गेला आणि ऑस्ट्रेलियात त्याने एक बेट विकत घेतले. तो थायलंड आणि अमेरिकेतून हायड्रो गांजा आपल्या देशात पाठवत होता. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर हे लक्षात आले की, हायड्रो गांजा पोस्टाने पाठवला जातो. पोस्टाचे लोक सापडले, कस्टमचे लोक सापडले आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच यात दोन पोलिसही सामील आहेत हे समजल्यावर त्यांनाही बडतर्फ करण्यात आले. हे समजल्यावर तिथे जाऊन नवीन चिचकरला आपल्या पोलिसांनी पकडून आणल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

हायड्रोपोनिक किंवा हायड्रो गांजा म्हणजे काय?
हायड्रोपोनिक गांजा म्हणजे मातीशिवाय वाढवली जाणारी गांजाची वनस्पती. या पद्धतीमुळे उत्पादकांना वनस्पतीच्या वातावरणावर अचूक नियंत्रण ठेवता येते. परिणामी या वनस्पती लवकर वाढतात आणि उत्पादकांना जास्त उत्पादनही मिळाले. हायड्रोपोनिक्स ही मातीशिवाय लागवड केली जणारी एक पद्धत आहे. या पद्धतीतील वनस्पती पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या पाण्याच्या द्रावणात वाढवल्या जातात. बहुतांश वेळा त्यात कोको कॉयर, परलाइट, चिकणमाती किंवा रॉकवूल असे पोषक घटकदेखील टाकले जातात.
हायड्रोपोनिक गांजा कसा पिकवला जातो?
- एसी रूम
- एलईडी किंवा एचपीएस ग्रोथ लाईट्ससारख्या कृत्रिम लाइट्सचा वापर
- योग्य तापमान आणि आर्द्रता नियंत्रणात ठेवून
- नियमित पोषक घटक देऊन
हायड्रोपोनिक किंवा हायड्रो गांजा का लोकप्रिय आहे?
- जास्त उत्पादन
- वनस्पतींची जलद होणारी वाढ
- पारंपरिक मातीत उगवलेल्या वनस्पतींपेक्षा जास्त क्षमता
हायड्रोपोनिक किंवा हायड्रो गांजा कसा विकला जातो?
हायड्रोपोनिक गांजाची तस्करी सामान्यतः ईशान्येकडून केली जाते आणि त्याची विक्री डार्क वेबचा वापर करून केली जाते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सोशल मीडियाचा वापर या पदार्थाची विक्री करण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी केला जातो. हायड्रोपोनिक गांजा डीलर्स कुरिअर सेवांद्वारेदेखील तो पाठवत आहेत. तसेच जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) आणि गुजरातमधील बंदरांमधून येणाऱ्या मालवाहू वस्तूंमध्येदेखील तो लपवून ठेवण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गंभीर आजारी कर्करोगाच्या रुग्णांचाही ड्रग्ज कॅरियर म्हणून वापर केला जात आहे.
महाराष्ट्रात हायड्रो गांजावर होणारी कारवाई
फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी सर्व पोस्टल आणि कुरिअर कंपन्यांना कन्साइनमेंटची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. टास्क फोर्स सोशल मीडिया आणि डार्क नेटवर लक्ष ठेवतील, अशीही माहिती देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हायड्रो गांजाविषयी बोलताना सांगितले, “या संदर्भातील पोलिसांचे धोरण हे झिरो टॉलरन्सचेच आहे. दोन इंडोनेशियन नागरिकांना पाच दिवसांपूर्वी या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २१ कोटी ५५ लाख रुपये किमतीचा २१ किलो हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे.
या लोकांना अटक केली जाते आणि चार महिन्यांनी सुटून आल्यावर पुन्हा हे लोक हाच व्यवसाय करतात, हे लक्षात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर या संदर्भातला जो कायदा आहे, त्यात आपण या अधिवेशनात सुधारणा करणार आहोत,” असे फडणवीस म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले, “अशा प्रकारचा गुन्हा असल्यास त्यासाठी मकोकाच्या अंतर्गत अटक करण्याचा निर्णय घेतला आहे. कारवाईचा भाग म्हणून शाळा आणि महाविद्यालयांजवळ संशयित पान टपऱ्या किंवा ठेले आणि जिथे अशा प्रकारचा संशयित व्यवहार चालतो तिथे धाड टाकण्यात आली आहे. तसेच अशा काही ठिकाणचे अतिक्रमणही काढण्यात आले आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी अशीही माहिती दिली की, पूर्वी तस्कर पकडले जायचे, तो तस्कर आत जायचा आणि बाहेर यायचा आता याच्या मागे नेमके कोण आहेत, ते शोधून कारवाई करीत आहोत, असे ते म्हणाले.
कोणत्या देशात हायड्रो गांजा कायदेशीर?
- कॅनडा
- अमेरिका
- उरुग्वे
- थायलंड
- दक्षिण आफ्रिका
- जर्मनी
कोणत्या देशात हायड्रो गांजा बेकायदा?
- भारत
- सिंगापूर
- संयुक्त अरब अमिराती
- इंडोनेशिया
- जपान
- चीन
- रशिया