scorecardresearch

Premium

विश्लेषण : राहुल गांधींकडून थेट केंब्रिज विद्यापीठात ‘पेगासस स्पायवेअर’चा उल्लेख, जाणून घ्या नेमकं प्रकरण ज्यामुळे मोदी सरकार आलं होतं अडचणीत

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा होत आहे.

PEGASUS SPYWARE AND RAHUL GANDHI
राहुल गांधी, नरेंद्र मोदी (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांनी भारतीय लोकशाही संकटात आहे, असा दावा केला आहे. तसेच आपल्या भाषणात त्यांनी मूळच्या इस्रायलमधील कंपनीने तयार केलेल्या पेगासस या स्पायवेअरचाही उल्लेख केला. गतवर्षी पेगासस या स्पायवेअरमुळे मोदी सरकारवर विरोधकांनी सडकून टीका केली होती. देशातील महत्त्वाचे नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पाळत ठेवली जात आहे, असा आरोप करण्यात आला होता. असे असतानाच राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या भाषणामुळे पेगासस स्पायवेअरचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर पेगासस स्पायवेअर काय आहे? मोदी सरकारवर काय आरोप करण्यात आले होते? चौकशीमधून काय समोर आले होते? याविषयी जाणून घेऊ या.

राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात पेगासस स्पायवेअरचा उल्लेख केला. माझ्या मोबाइलमध्ये पेगासस स्पायवेअर होते, असे मला सांगण्यात आले होते. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, “माझ्या मोबाइलमध्ये पेगासस स्पायवेअर होते. माझ्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या फोनमध्येही हे स्पायवेअर होते. मला गुप्तचर अधिकाऱ्याने फोन करून याबाबत माहिती दिली होती. तुम्ही काळजी घ्या. फोनवर बोलताना सतर्क राहा. तुम्ही जे बोलत आहात ते आम्ही रेकॉर्ड करत आहोत, असे मला या अधिकाऱ्याने सांगितले होते,” असे राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.

members of Assembly raised questions recent recruitment process Assistant Professors Gondwana University
गोंडवाना विद्यापीठातील सहायक प्राध्यापक निवड यादीवरून वाद! भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित
National mali Federation Presiden
निजाम राजवटीतील नोंदीच्या आधारे जातीचे दाखले दिल्याने नवा वाद उफाळेल, राष्ट्रीय माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांचे मत
school teacher
गोव्यात विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न? विहिंपकडून पोलिसात तक्रार, मुख्यध्यापकावर कारवाई; नेमकं प्रकरण वाचा!
adani supreme court sebi
अदानींची समभाग व्यवहार लबाडी ‘सेबी’ने दडपली!; सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्रात याचिकाकर्त्यांचा दावा

हेही वाचा >>विश्लेषण : मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कशी केली जाते? नियम कसे बदलले? जाणून घ्या सविस्तर

पेगासस स्पायवेअर फक्त राहुल गांधींच्या डोक्यात- अनुराग ठाकूर

राहुल गांधी यांच्या विधानानंतर भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. “पेगासस स्पायवेअर राहुल गांधी यांच्याच डोक्यात आहे. ते इतरत्र कोठेही नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला नवी ओळख मिळत आहे. राहुल गांधी यांना इतरांचे काहीही ऐकायचे नसेल तर कमीत कमी त्यांनी इटलीच्या पंतप्रधानांचे विधान तरी ऐकायला हवे,” अशी बोचरी टीका अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

पेगासस प्रकरण नेमके काय आहे?

पेगासस या स्पायवेअरची निर्मिती मूळच्या इस्रायलमधील एनएससो या सायबर सुरक्षेवर काम करणाऱ्या कंपनीने केलेली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने भारतात काही पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर स्पायवेअरच्या मदतीने पाळत ठेवली जात आहे, असा दावा केला होता. हा दावा करताना व्हॉट्सअॅपने कोणाचेही नाव उघड केले नव्हते. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये पेगासस हे स्पायवेअर पहिल्यांदा चर्चेत आले होते. पुढे दोन वर्षांनी म्हणजेच जुलै २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काही माध्यम संस्थांनी सोबत येत पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला होता. जवळपास ३०० महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात येत असून, दोन केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षातील नेते, काही अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपतींचा यांमध्ये समावेश आहे, असा दावा या माध्यम संस्थांनी केला होता.

हेही वाचा >> विश्लेषण: नित्यानंद कैलासाच्या प्रतिनिधीने भारताविरोधात केलेले वक्तव्य अप्रासंगिक; संयुक्त राष्ट्राने त्याबद्दल काय सांगतिले?

पेगाससचा वापर केल्याचे स्पष्टपणे नाकारलेले नाही

माध्यम संस्थांच्या या दाव्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. पेगासस स्पायवेअरसंदर्भात चौकशी केली जावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे मोदी सरकारने त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले होते. केंद्र सरकारने हे आरोप फेटाळलेले असले तरी यासंदर्भात ठोस आणि वस्तुनिष्ठ माहिती अद्याप केंद्र सरकारने दिलेली नाही. तसेच सरकारने पेगासस या स्पायवेअरचा वापर केल्याचे स्पष्टपणे नाकारलेले नाही.

पेगासस स्पायवेअर काम कसे करते?

पेगासस प्रकरण चर्चेत आले तेव्हा, स्पायवेअरतर्फे एक लिंक पाठवली जाते, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतरच आपल्या फोनमधील सर्व माहिती मिळवता येऊ शकतो, असा समज होता. मात्र या पेगासस स्पायवेअरच्या व्याप्तीचा अभ्यास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली होती. पेगासस स्पायवेअरला एखाद्या व्यक्तीच्या फोनमधील माहिती मिळवायची असेल किंवा फोनच्या माध्यमातून पाळत ठेवायची असेल तर मोबाइलमध्ये कोणतीही लिंक पाठवण्याची आवश्यकता नाही, असे उघड झाले होते. तसेच हे स्पायवेअर ‘झिरो क्लिक अटॅक’ पद्धतीने कोणतीही लिंक न पाठवता पाळत ठेवू शकते हे समोर आले होते.

हेही वाचा >> विश्लेषण: शेअर बाजारात तेजीचे अकस्मात उधाण; ‘सेन्सेक्स’च्या उसळीला इंधन कशाचे ?

पेगासस स्पायवेअर मोबाइलमध्ये एकदा इन्स्टॉल झाले, की ते आपले काम सुरू करते. इन्स्टॉल झाल्यानंतर हे स्पायवेअर आपल्या ऑपरेटरला मोबाइलमधील सर्व माहिती पुरवते. मोबाइलमालकाला कसलाही सुगावा न लागू देता पेगाससचे हे काम अविरतपणे सुरू असते. हे स्पायवेअर आपल्या ऑपरेटरला टेक्स्ट मेसेज, लाईव्ह व्हॉईस कॉल्स, कॅलेंडर इव्हेंट्स, कॉन्टॅक्ट लिस्ट, मोबाइलमधील पासवर्ड्स, खासगी विदा अशी सर्व माहिती पुरवते.

चौकशी केल्यानंतर काय समोर आले?

पेगासस स्पायवेअरचा मुद्दा चांगलाच गाजल्यामुळे ऑक्टोबर २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी न्यायालयाने न्यायमूर्ती आर व्ही रवींद्रन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. पुढे या समितीने पेगासस प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यानंतर समितीने या प्रकरणाशी निगडित दोन अहवाल न्यायालयासमोर सादर केले होते. यांपैकी एक अहवाल न्यायमूर्ती रवींद्रन तर दुसरा तांत्रिक समितीने सादर केला होता. पुढे या प्रकरणावर मुख्य न्यायधीश एन व्ही रमण्णा यांनी, चौकशी समितीला ठोस पुरावे आढळले नसल्याचे सांगितले. शेकडो मोबाइल फोन्सवर पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचे म्हटले जात होते. मात्र चौकशी समितीला तपास करण्यासाठी फक्त २९ मोबाइल्सच उपलब्ध होते.

हेही वाचा >> विश्लेषण: राज्यातील एकमेव हत्ती कॅम्पमधील हत्तींचा मृत्यू का होतोय?

न्यायालयाने तांत्रिक चौकशी समितीच्या अहवालाबाबतही अधिक माहिती दिली होती. या समितीच्या अहवालात एकूण २९ पैकी पाच मोबाइल्समध्ये मालवेअर आढळले. मात्र हे मालवेअर पेगाससच आहे, का याबाबत काही ठोस माहिती मिळाली नाही, असे तांत्रिक चौकशी समितीने सांगितले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is pegasus spyware detail information rahul gandhi cambridge university speech prd

First published on: 04-03-2023 at 16:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×