Air India plane crash investigation गेल्या महिन्यात १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेशी संबंधित तपासाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. भारतातील विमान दुर्घटनांशी संबंधित तपास करणारी संस्था एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरोने म्हणजेच विमान अपघात अन्वेषण विभागाने (एएआयबी) एएआयबीने हा अहवाल नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सोपवला आहे. हा या दशकातील सर्वांत मोठा विमान अपघात होता. या अपघातात विमानातील तब्बल २४१ जणांचा मृत्यू झाला. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरोने शुक्रवारी (११ जुलै) रात्री एक प्राथमिक अहवाल जारी केला.
एअर इंडियाच्या ‘एआय१७१’ या अपघातग्रस्त विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा एका सेकंदाच्या फरकाने बंद झाला होता, असे अपघातासंबंधीच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, हा इंधनपुरवठा कसा बंद झाला किंवा कोणी बंद केला याबद्दल कोणताही ठोस निष्कर्ष अद्याप काढता आलेला नाही. दोन्ही वैमानिकांपैकी एकाने दुसऱ्याला विमानाचा इंधनपुरवठा का खंडित केला असे विचारले. त्यावर दुसऱ्या वैमानिकाने उत्तर दिले की, त्याने तसे काहीही केले नाही.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, वैमानिक चुकून बटन बंद किंवा चालू करू शकत नाही, परंतु जर बटन बंद केले गेले, तर लगेच इंजिन बंद पडू शकते. या अहवालामुळे स्विचच्या कार्यप्रणालीबद्दल आणि नेमके काय घडले याबद्दल आणखी प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची अधिक तपासणी करण्याची मागणीही केली जात आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड हे विमानातील दोन ब्लॅक बॉक्सपैकी एक आहे. अशा स्वरूपाचे तपास कसे केले जातात? ‘एएआयबी’ नक्की काय आहे? त्यांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालावर प्रश्नचिन्हे उपस्थित का केली जात आहेत? त्याविषयी जाणून घेऊयात.
विमान अपघातांची चौकशी कोण करतं?
- आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतुकीचे व्यवहार १९४४ मध्ये स्वाक्षरी केलेल्या आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक करार किंवा शिकागो कराराद्वारे नियंत्रित केले जातात.
- आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (आयसीएओ) या कराराच्या तांत्रिक मानकांवर देखरेख करते. ही संयुक्त राष्ट्रांची संस्था आहे, ज्यात १९३ सदस्य देशांचा (भारत, अमेरिका, युनायटेड किंग्डम इत्यादी) समावेश आहे.
- या करारात विमान अपघात आणि गंभीर घटनांच्या चौकशीसाठी आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल नमूद करण्यात आले आहेत. त्यातील प्रोटोकॉलनुसार ज्या देशात अपघात झाला, त्या देशाकडे तपासाची जबाबदारी दिली जाते.
- तसेच या चौकशीत इतर देशांना सहभागी होण्याचा औपचारिक अधिकार असतो. या चौकशीत ‘स्टेट ऑफ रजिस्ट्री’ (जिथे विमान नोंदणीकृत आहे), ‘स्टेट ऑफ द ऑपरेटर’ (ज्याने अपघातग्रस्त विमान चालवले आहे), ‘स्टेट ऑफ डिझाईन’ व ‘स्टेट ऑफ मॅन्युफॅक्चरर’) यांचाही समावेश असतो.
विमान अपघात अन्वेषण विभाग म्हणजे काय?
AI 171 विमान अपघात भारतात झाला असल्याने करारात नमूद केल्याप्रमाणे चौकशीची जबाबदारी भारताकडे देण्यात आली. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो म्हणजेच विमान अपघात अन्वेषण विभाग ही भारतातील तपास संस्था आहे. त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. ही भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सरकारी संस्था आहे, जी नागरी विमान वाहतूक अपघात आणि गंभीर घटनांची चौकशी करण्यासाठी जबाबदार आहे. सरकारला १९३४ च्या विमान कायद्याच्या कलम ७ अंतर्गत तपासासाठी नियम तयार करू शकते.
२०१२ पर्यंत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (एव्हिएशन मंत्रालयाच्या अंतर्गत) हवाई सुरक्षा संचालनालय अपघात आणि सुरक्षिततेशी संबंधित घटनांची चौकशी करत असे. “आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (आयसीएओ)ने जारी केलेल्या मानके आणि शिफारस केलेल्या पद्धतीनुसार, तसेच नियामक कार्यापासून तपासकार्याचे स्वातंत्र्य प्रदान करण्याकरिता भारत सरकारने स्वतंत्र ब्यूरो स्थापन करण्याचा निर्णय घेतला,” असे अधिकृत वेबसाइटमध्ये म्हटले आहे.
विमान अपघात अन्वेषण विभागाची काय कार्ये आहेत?
सर्वसाधारणपणे एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो (एएआयबी) भारतीय हवाई क्षेत्रात चालणाऱ्या विमानांशी संबंधित अपघात काही श्रेणींमध्ये वर्गीकृत करते; जसे की, अपघात, गंभीर अपघात इत्यादी. ही संस्था २,२५० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या (प्रवासी आणि मालवाहू विमानाचे एकूण वजन) विमानांसह सर्व अपघात, गंभीर घटना, तसेच टर्बोजेट विमानांची चौकशी करते. आवश्यक असल्यास एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो इतर प्रकरणांचीदेखील चौकशी करू शकते. असे अपघात आणि दुर्घटना थांबवणे हे विमान (अपघात आणि घटनांचा तपास) नियम, २०१७ च्या कलम ३ अंतर्गत, एएआयबीद्वारे केल्या जाणाऱ्या तपासाचे एकमेव उद्दिष्ट आहे.
तपासाचा एक भाग म्हणून, एएआयबी दुर्घटनेची सूचना मिळताच एक किंवा अधिक तपासकांना घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा करण्यासाठी नियुक्त करते. त्यांच्या वेबसाइटवर असे नमूद करण्यात आले आहे की, सुरुवातीच्या तपासाचे प्राथमिक उद्दिष्ट पुढील विश्लेषणासाठी पुरावे गोळा करणे आणि त्यांचे जतन करणे आहे. त्यामध्ये दुर्घटनेमुळे तयार झालेले ढिगारे आणि आजूबाजूच्या ठिकाणांचे नमुने, ब्लॅक बॉक्स इत्यादी पुरावे महत्त्वाचे मानले जातात. तपास पथक गोळा केलेल्या सर्व पुराव्यांचे पुनरावलोकन करते. त्यानंतर डोमेन तज्ज्ञांना बोलावले जाऊ शकते. एएआयबीने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि डीजीसीएसारख्या एजन्सींबरोबर त्यांच्या प्रयोगशाळा वापरण्यासाठी एक सामंजस्य करारदेखील केला आहे.
त्यासह तपास पथकाद्वारे ऑपरेटर, नियामक, संबंधित कर्मचारी आदींकडून गोळा केलेल्या कागदपत्रांचा आणि नोंदींचा अभ्यास आणि विश्लेषण केले जाते. एएआयबीला न्यायालयीन संस्था किंवा इतर सरकारी अधिकाऱ्यांकडून पूर्वसंमती न घेता, कोणत्याही एजन्सी किंवा संस्थेकडून सर्व संबंधित पुरावे मिळविण्याचा अधिकार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर एक मसुदा अहवाल सादर केला जातो आणि त्यानंतर तो एएआयबी महासंचालकांकडून स्वीकारला जातो.
पुढील सल्लामसलत झाल्यानंतर आणि पुनरावलोकनानंतर, अंतिम अहवाल सादर केला जातो आणि तो सार्वजनिक केला जातो. तसेच हा अहवाल अधिकृत वेबसाइटवरदेखील प्रकाशित केला जातो. अंतिम अहवाल आयसीएओ आणि तपासात सहभागी असलेल्या राज्यांनादेखील पाठविला जातो. मुख्य म्हणजे एएआयबी वेळोवेळी सुरक्षा अभ्यासदेखील करते. तपास अहवाल आणि सुरक्षा अभ्यासांमध्ये केलेल्या शिफारशी त्यांच्या अंमलबजावणीसाठी भारत, डीजीसीए किंवा इतर आयसीएओ करार करणाऱ्या देशांच्या नागरी विमान वाहतूक नियामक संस्थांना पाठविल्या जातात.