Ashadhi Wari 2023: आज आषाढी एकादशी. विठ्ठल नामघोषात अवघा महाराष्ट्र दुमदुमून जातो. विठ्ठल देवतेच्या आणि भक्तांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. परंतु, विठ्ठल देवतेचे मूळ स्वरूप कोणते आहे, याविषयी कमी चिकित्सा होते. सर्वांची प्रिय अशी विठूमाऊली असली, तरी विठ्ठल हे नामकरण कसे झाले, वैष्णव, शैव आणि बौद्ध संप्रदायाचा विठ्ठलाशी कसा संबंध आहे, विठ्ठल देवतेच्या उत्पत्ती कथा, पंढरपूरची व्युत्पत्ती हे जाणून घेणे माहितीपूर्ण ठरेल.

कथा ‘विठ्ठल’ आणि ‘पंढरपूर’ नावाची…

महाराष्ट्रातील, तसेच आंध्र-कर्नाटकातील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत, महाराष्ट्रातील भागवत-वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल हे आहे. विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशी अन्य नावेही आहेत. पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरातल्या सोळंखांबी मंडपातील एका खांबावर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागांत पंढरपूरचा निर्देश ‘पंडरगे’ असा केलेला आढळतो. ‘पंडरगे’ हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहे. या नावावरूनच पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांडरीपूर, पांडरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली असण्याची शक्यता आहे.
विठ्ठलाला पांडुरंग असेही म्हणतात. ‘पांडुरंग’ हे नाव ‘पंडरगे’ या मूळ क्षेत्रनामावरून आले. ‘पांडुरंग’ या शब्दाचा अर्थ ‘शुभ्र रंग’ असा होतो. विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी विठ्ठल हा शब्द ‘विष्ठल’ या शब्दापासून आलेला असावा, असे म्हटले आहे. या व्युत्पत्तीनुसार विठ्ठलदेव हा दूर, रानावनात असणारा देव ठरतो. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या मते, ‘विष्णू’ या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रूप ‘विट्टि’ असे होते आणि ‘विट्टि’ वरूनच ‘विठ्ठल’ हे रूप तयार झाले, असे म्हटले आहे. ‘शब्दमणिदर्पण’ या कन्नड व्याकरण ग्रंथाच्या अपभ्रंश प्रकरणातील ३२ व्या सूत्राच्या आधारे विष्णूचे ‘विट्टु’ हे रूप होते, या रुपाला ‘ल’ प्रत्यय लावला की, ‘विठ्ठल’ असे रूप तयार होते, अशीही एक व्युत्पत्ती दिसते. विदा (ज्ञानेन), ठीन् (अज्ञजनान्), लाति (गृह्‌ णाति) म्हणजे ‘अज्ञ जनांना ज्ञानाने स्वीकारणारा तो विठ्ठल अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते. ‘विदि (ज्ञाने) स्थलः (स्थिरः)’ ‘म्हणजे जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे, तो विठ्ठल, अशी एक व्युत्पत्ती वि. कृ. श्रोत्रिय यांनी दिली आहे. इटु, इठु, इटुबा, इठुबा ही विठ्ठलाची मराठीतील बोलीभाषेतील नामोच्चारणे आहेत. श्रीविठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैरे यांनी ‘इटु’ असा शब्द तमिळ भाषेत असून त्याचा अर्थ ‘कमरेवर हात ठेवलेला’असा असल्याचे प्रतिपादन केले आहे. ‘विटेवर जो उभा, तो विठ्ठल’अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते.

Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
hindus atacked in canada
हिंदू भाविकांवरील हल्ला कॅनडा प्रशासनाचं कारस्थान? व्हायरल Video मध्ये महिलेचा टाहो; म्हणाली, “हाच तो”!
10 kg ganja seized in pune
मध्य प्रदेशातून गोव्यात गांजाची तस्करी करणारे गजाआड, खडकी परिसरात कारवाई; दहा किलो गांजा जप्त
Loksatta vyaktivedh Bibek Debroy English translation of 18 Puran
व्यक्तिवेध: बिबेक देबरॉय
Thieves stole thousands of tons of cheddar cheese in London What is Cheddar Cheese
लंडनमध्ये चोरांचा हजारो टन चेडर चीजवर डल्ला! चेडर चीज म्हणजे काय? मुळात त्याची चोरी करावीशी का वाटली?
Tunic Worn by Alexander the Great
Alexander the great’s purple tunic: ३००० वर्षे प्राचीन ‘अलेक्झांडर द ग्रेट’चा जांभळा अंगरखा अखेर सापडला; त्याचा भारताशी काय संबंध?
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन

श्रीविठ्ठलाला ‘कानडा’ का म्हणतात ?

विठ्ठल हा कानडा आहे. श्रीज्ञानदेवांनी विठ्ठलाला ‘कानडा’ आणि ‘कर्नाटकु’ अशी विशेषणे उपयोजिली आहेत. एकनाथांनी ‘तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरीये।’असे म्हटले आहे, तर नामदेवांनी ‘कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी’ असे लिहिले आहे. ‘कानडा म्हणजे अगम्य’ अशा अर्थानेही संतांनी श्रीविठ्ठलाचे उल्लेख केलेलेआहेत. ‘कर्नाटकु’ या शब्दाचा कर्नाटक प्रदेशाशी संबंध नसून ‘कर्नाटकू’ म्हणजे ‘करनाटकू’ वा ‘लीला दाखविणारा’, असेही मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे. परंतु पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. त्याचे प्राचीन नाव ‘पंडरगे’ हे कानडीच आहे. विठ्ठलाचे बहुतेक सेवेकरीही कर्नाटकातले आहेत, या गोष्टीही ‘कानडा’ म्हणण्यास कारण ठरू शकतात. श्रीविठ्ठल हे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या, तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

हेही वाचा : युगे अठ्ठावीस विटेवरी उभा… विठ्ठलाच्या आरतीचा नेमका अर्थ माहीत आहे का ?

विठ्ठल देवतेचे प्रकटन कसे झाले ?

विठ्ठल देवता पंढरपूरला प्रकटण्याची सर्वमान्य कथा म्हणजे भक्त पुंडलिकाची कथा. सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी ती स्वीकारलेली आहे. पंढरपुरातील विठ्ठलाच्या प्रकटनासंबंधी आणखी तीन कथा आहेत. त्यातील एक म्हणजे डिंडिरव वनातल्या डिंडीरव याच नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचे रूप घेतले आणि त्याचा वध केला. पंढरपूर येथे भीमा नदीकाठी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे. त्याचा या कथेतील डिंडीरव वनाशी संबंध असावा, अशी शक्यता आहे. दुसरी कथा म्हणजे, कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली मैत्री सोडली नाही, म्हणून रूक्मिणी रूसून दिंडीरवनात येऊन राहिली तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाईगोपाळांसोबत आला आणि गोपवेष धारण करून रूक्मिणीस भेटावयास गेला. तेव्हा त्याने गाईगोपाळांना गोपाळपूरला ठेवले. पंढरपूरजवळ गोपाळपूर नावाची वाडी आहे. वारीमध्ये या गावाला भेट दिली जाते. तिसरी कथा म्हणजे, पद्मा नावाच्या एका सुंदर तरूण स्त्रीने इष्ट वर मिळावा म्हणून तपश्चर्या सुरू केली, तेव्हा विष्णू तिच्यापेक्षा मनोहर रूप धारण करून तिच्या समोर प्रकट झाले. त्या रूपाचा तिला मोह पडला. तिचे वस्त्र गळून पडले आणि केस मोकळे झाले. पुढे तिच्या नावाने ‘मुक्तकेशी’ नावाचे तीर्थ निर्माण झाले. पंढरपूरच्या पश्चिमेस पद्मावती तीर्थ नावाचे तळे आहे. तिथे पद्मावतीचे देऊळही आहे. पद्मावतीला ‘नग्ना’ आणि ‘मुक्तकेशी’ अशी विशेषणे लावली जातात. लखूबाई आणि पद्मावती या दोन्ही देवतांच्या पूजेचा अधिकार श्रीविठ्ठलाच्या पुजाऱ्यांकडेच आहे. लखूबाई ही रुसून आलेली रुक्मिणी समजण्यात येते. या तीन कथांपैकी डिंडीरवाची व रुसून पंढरपूरला आलेल्या रूक्मिणीची कथा पांडुरंगमहात्म्यात, पुंडलिकाची कथा स्कंद पुराणात, पांडुरंगमाहात्म्यात आणि पद्मेची कथा स्कंद आणि पद्म अशा दोन्ही पुराणात आलेली आहे.

हेही वाचा : विश्लेषण : कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ का होत आहे? कुत्र्यांच्या आक्रमकतेतील वाढीची कारणं काय?

विठ्ठल देवता आणि व्यंकटेश, बुद्ध, जिन

पंढरपूरची विठ्ठल देवता आणि तिरूमलाई (आंध्र प्रदेश) येथील व्यंकटेश या दोन देवांमध्ये साम्य आहे. विठ्ठलाप्रमाणेच व्यंकटेश हा हाती शस्त्र नसलेला आणि शांत आहे. त्याचा डावा हात कमरेवर असून उजवा हात त्याच्या भक्तांना वर देत आहे. विठ्ठलाच्या काही मूर्ती अशाच प्रकारच्या आहेत. पांडुरंगमाहात्म्यांप्रमाणेच व्यंकटेशाशी संबंधित संस्कृत माहात्म्य ग्रंथ आहेत. रूसलेल्या रूक्मिणीची समजूत काढण्यासाठी कृष्ण (विठ्ठल) पंढरपूरला आले. त्याचप्रमाणे व्यंकटेशही रूसलेल्या लक्ष्मीसाठी तिरूमलई येथे आले, अशी कथा सांगितली जाते. विठ्ठल आणि व्यंकटेश या दोन्ही देवांना कांबळे (जाड घोंगडे) अत्यंत प्रिय आहे. व्यंकटेश देवता वेंकटाचलावर एका चिंचेच्या झाडाखाली असलेल्या वारूळातून प्रकट झाली, अशी कथा सांगितली जाते. पंढरपूर येथील दिंडीरवन हे चिंचेच्या झाडांचे वन होते. अशी या देवतांसंदर्भात साम्यस्थळे आहेत.
मराठी संतांनी अनेकदा विठ्ठलाला बुद्ध वा बौद्ध म्हटले आहे. संत जनाबाईंनी एका अभंगात असे म्हटले आहे की, कृष्णावतारी कंसवध करणारा माझा विठ्ठल हा आता बुद्ध होऊन अवतरला आहे. तसेच, विठ्ठल हा बुद्धाचा अवतार आहे, असे एकनाथांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे. विठ्ठल हा कृष्णानंतरचा विष्णूचा नववा अवतार आहे, अशी काही संतांची श्रद्धा दिसते. काही चित्रशिल्पांमधूनही ही श्रद्धा व्यक्त झालेली आहे. काही जुन्या पंचांगांच्या मुखपृष्ठावर छापलेल्या दशावतारांच्या चित्रांत नवव्या अवताराच्या ठिकाणी विठ्ठलाचे चित्र दाखविलेले दिसते आणि त्या चित्राखाली ‘बुद्ध’ असेही छापलेले आढळते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील लक्ष्मीकेशवमंदिरात कोरलेल्या दशावतांरांत बुद्ध म्हणून कोरलेली मूर्ती विठ्ठलाचीच असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
विठोबा हे जैनांचे दैवत आहे, असा जैनांचा दावा अठराव्या शतकापर्यंत होता, असे दिसते. मराठी संतांनी मात्र विठ्ठलाला अनेकदा बुद्ध म्हणून संबोधिले असले, तरी जिन म्हणून कधीही संबोधिलेले नाही. रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी त्यांच्या भरतखंडाच्या अर्वाचीन कोशात एका जैन पंडिताने जैन तीर्थंकर नेमिनाथाच्या स्थापन केलेल्या मूर्तीचे वर्णन करणारे संस्कृत श्लोक एका जैन ग्रंथातून उदधृत केले आहेत. ते वर्णन पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मूर्तीशी जुळते, असे त्यांनी म्हटले आहे. कृष्ण आणि नेमिनाथ यांचा संबंध जैन परंपरेत जवळचा मानला गेला आहे. दोघेही यदुवंशीय असून चुलतभाऊ होते, असे ही परंपरा सांगते. त्यामुळे ज्याला कृष्णाचे बालरूप मानले जाते, त्या विठ्ठलात जैनांनी नेमिनाथांना पाहिले असणे शक्य आहे. रा. चिं. ढेरे यांनी विठ्ठल देवतेचा विशेष अभ्यास करून वरील संदर्भ दिले आहेत.

डॉ. रा. चिं. ढेरे यांनी विठ्ठलाचे वर्णन ‘महासमन्वय’ असे केले आहे. विठ्ठलाची विकसनप्रक्रिया आणि त्याची विविध रूपे पाहून ते सत्य वाटते.