कोण होता हिटलर?

अनेकजण २० एप्रिल हा दिवस जगाच्या इतिहासातील काळा दिवस मानतात. जगाच्या इतिहासात हुकूमशहा म्हणून नोंद झालेल्या ॲडॉल्फ हिटलर याचा २० एप्रिल १८८९ हा जन्मदिवस. बव्हेरियाच्या सरहद्दीवरील ‘ब्रानाऊ अम इन’ या गावी सायंकाळी साडे सहा वाजता ‘ॲलॉइस’ व ‘क्लारा’ या दाम्पत्याच्या पोटी अ‍ॅडॉल्फचा जन्म झाला. ॲलॉइस (हिटलरचे वडील) हे कस्टम अधिकारी होते. हिटलर हे आडनाव ‘हाईडलेर’ या नावाचा अपभ्रंश आहे असे काही अभ्यासक मानतात. ॲलॉइसचे वडील जॉर्न जॉर्ज म्हणजेच ॲडॉल्फचे आजोबा हे ‘हाईडलेर’असे नाव लावीत होते. ॲलॉइस हे आपल्या चुलत्याकडे म्हणजेच योहान नेपोमक हीडलर याच्याकडे लहानाचे मोठे झाले. हिटलरचा हा चुलता ‘हुएटलर’असे नाव लावीत होता त्याचमुळे ॲलॉइस हे देखील हेच नाव नंतर वापरू लागले. नंतर काळाच्या ओघात हुएटलर या नावाचा अपभ्रंश होऊन हिटलर नावात ते रुपांतरीत झाले. ॲलॉइस हिटलर म्हणजेच ॲडॉल्फचे वडील यांचे तीन विवाह झाले होते. त्यांना पहिल्या पत्नीपासून संतान प्राप्ती न झाल्याने त्यांनी तिला त्यांनी घटस्फोट दिला आणि दुसरा विवाह केला. ॲलॉइस यांना दुसऱ्या पत्नीपासून दोन मुले होती. परंतु त्यांची दुसरी पत्नी क्षय रोगामुळे मरण पावली. म्हणून त्यांनी तिसरा विवाह केला तो ‘क्लारा’शी; ही त्यांच्यापेक्षा १८ वर्षांनी लहान होती तिच्या पासून त्यांना पाच अपत्ये झाली . त्यातील तीन लहान असतानाच मरण पावली व जी जगली त्यातील एक म्हणजे ‘ॲडॉल्फ’ व दुसरा म्हणजे ‘पॉल’. पॉल हा हिटलर हे नाव लावण्याऐवजी ‘पॉल ॲलॉइस’ एवढेच नाव लावीत होता. हिटलर याचा हा धाकटा भाऊ पॉल मात्र ॲडॉल्फच्या अखेरच्या क्षणांचाही साक्षीदार होता.

आणखी वाचा : विश्लेषण : World Heritage Day 2023: वातावरणातील बदल खरंच ‘सांस्कृतिक वारसा’ नष्ट करत आहेत का?

हिटलर व स्वस्तिक यांचा संबंध काय?

हिटलर याच्या नाझी पक्षाच्या लाल झेंड्यावर पांढऱ्या वर्तुळात काळ्या फितींच्या मदतीने काढलेले चिन्ह स्वस्तिक किंवा हकेनक्रेझ म्हणून ओळखले जाते. अॅडॉल्फ हिटलर याने १९२० साली स्वस्तिक हे चिन्ह जर्मनीचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले. याच काळात नॅशनल सोशालिस्ट पक्षाच्या (नाझी) झेंड्यावर स्वस्तिक हे मध्यभागी झळकले. किंबहुना कालांतराने दुसऱ्या महायुद्धात स्वस्तिक हे जर्मनीची ओळख ठरले होते. यामुळेच स्वस्तिक हे नरसंहार, क्रूरता, फॅसिझमचे प्रतिक म्हणून युरोपात मानले जावू लागले. हिटलर याने युरोपच्या वांशिक शुद्धीसाठी हे चिन्ह निवडले होते. हिटलर याने हे चिन्ह राष्ट्रीय चिन्ह म्हणून निवडण्यामागे जर्मन अभ्यासकांची मोठी भूमिका आहे. इंग्रजांचे राज्य भारतावर स्थापन झाल्यानंतर अनेक जर्मन अभ्यासकांनी संस्कृत या विषयात काम केले होते. जर्मन अभ्यासकांचा संस्कृत हा आवडता विषय होता. जर्मन भाषा व संस्कृत यांच्यातील साम्य दर्शविण्याचा प्रयत्नदेखील याच काळात करण्यात आला. त्यामुळेच संस्कृत साहित्याच्या जर्मन अभ्यासकांच्या माध्यमातून स्वस्तिक हिटलरच्या दृष्टिपथास पडले.

भारतीय स्वस्तिक चोरल्याचा आरोप

जगभरातील अभ्यासक हिटलरने स्वस्तिक हे चिन्ह भारतीय संस्कृतीतून चोरल्याचा आरोप करतात. याच काळात अनेक जर्मन अभ्यासकांनी वेद व इतर वैदिक साहित्य अभ्यासायला सुरुवात केली होती. याच अभ्यासातून वैदिक साहित्यात आढळणारा आर्य हा शब्द ‘वांशिक’ या अर्थाने प्रसिद्ध झाला. याच काळात नव्याने उघडकीस आलेली सिंधु संस्कृती ही भारतीय द्रविड लोकांची आहे असे सांगण्यात आले. व आर्य बाहेरून आले व त्यांनी ही संस्कृती नष्ट करून आपली वैदिक संस्कृती स्थापन केली. यानंतर आर्य नक्की कोण ? यावर अनेक सिद्धांत मांडले गेले. त्यापैकी एक सिद्धांत ते युरोपातून आले असे सांगतो. हाच दुवा पकडून हिटलर याने युरोपीय लोकांच्या वंशशुद्धीचा मुद्दा पुढे करत स्वस्तिक हे संघर्षाचे प्रतिक म्हणून निवडले. परंतु भारतीयांचे पवित्र स्वस्तिक नाझींच्या प्रचंड अत्याचारामुळे ज्यू लोकांसाठी भीतिदायक चिन्ह ठरले. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटापर्यंत जर्मनीमध्ये स्वस्तिक या चिन्हावर बंदी घालण्यात आली होती. किंबहुना आत्तापर्यंत पाश्चिमात्य देशांमध्ये स्वस्तिक हे फॅसिझमचे प्रतिक मानले जाते. याचा निकटचा संबंध हा नाझी हुकूमशहा हिटलर याच्याशीच आहे. हिटलरने आपल्या नाझी पक्षाचे चिन्ह स्वस्तिक स्वीकारल्याने जगात या चिन्हाची मुख्य ओळख विस्मरणात जावून केवळ हिटलरच्या रक्तरंजित इतिहासाशी असलेला संबंध स्मरणात राहिला. इतिहासात डोकावून पाहिल्यावर लक्षात येते की स्वस्तिक हे केवळ आशियायी देशांशी संबंधित नव्हते तर प्राचीन युरोपिय संस्कृतीनमध्येही स्वस्तिकाचे पावित्र्य मान्य केले जात होते.

आणखी वाचा : जगातील ‘आद्यमहिला’; ‘ती’चे वय तब्बल ३१ लाख ८० हजार वर्षे!

स्वस्तिकाचा अर्थ काय ?

जे मंगल करते व घडवते ते स्वस्तिक, असा त्याचा ढोबळ अर्थ आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीत स्वस्तिक या चिन्हाला मांगल्याचे प्रतिक मानले जाते. आशियात अनेक देशांमध्ये स्वस्तिक पूजनीय आहे. हिंदू, जैन व बौद्ध या तिन्ही धर्मांमध्ये स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतिक मानले जाते.

स्वस्तिक युरोपात कसे पोहोचले?

प्राचीन काळी युरोपीय व्यापाऱ्यांच्या माध्यमातून स्वस्तिक आशियातून युरोपियन देशांमध्ये गेले असावे, असे अभ्यासक मानतात. परंतु उपलब्ध पुरातत्वीय पुराव्यांच्या माध्यमातून स्वस्तिक प्राचीन युरोपातही मंगल्याचे प्रतिक म्हणूनच पूजले जात होते हे सिद्ध झाले आहे. स्वस्तिक हे प्राचीन ग्रीक, सेल्ट्स आणि अँग्लो-सॅक्सन यांनी देखील वापरले होते आणि काही जुनी उदाहरणे पूर्व युरोपमध्ये बाल्टिकपासून बाल्कनपर्यंत स्वस्तिकच्या वापराचे दाखले देतात. सुमारे सातहजार वर्षांपूर्वी दक्षिण-पूर्व युरोपमधील निओलिथिक विन्का संस्कृतीत स्वस्तिक वापरात असल्याचे आढळून आले आहे. परंतु कांस्ययुगात ते संपूर्ण युरोपमध्ये अधिक व्यापक झाले. प्राचीन ग्रीक लोकांनी त्यांची भांडी आणि फुलदाण्या सजवण्यासाठी स्वस्तिक आकृतिबंध म्हणून वापरले होते.
अशा या स्वस्तिकाचा मंगल्यापासून ते रक्तरंजीत इतिहास अनेकांच्या भीतीचे कारण ठरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.