संदीप नलावडे
भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येत असलेला ‘नासा-इस्रो सिंथेटिक अॅपर्चर रडार’ (निसार) हा अत्याधुनिक उपग्रह नुकताच अमेरिकेहून बंगळूरु येथे दाखल झाला. काही दिवसांतच या उपग्रहाची भारतात अंतिम जोडणी करण्यात येणार असून या अत्याधुनिक उपग्रहाचे भारतातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या ‘निसार’ उपग्रहाविषयी..
‘निसार’ मोहीम काय आहे?
‘निसार’ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. या मोहिमेद्वारे अमेरिकेत अत्याधुनिक उपग्रह बनविण्यात आला आहे. ‘नासा’ या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने तयार केलेल्या या उपग्रहामुळे नैसर्गिक आपत्तीची आगाऊ माहिती मिळणार असून कृषीसह विविध क्षेत्रांना त्याचा फायदा होणार आहे. दक्षिण कॅलिफोर्निया येथील ‘जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी’मध्ये ‘नासा’चे एल बँड रडार आणि भारतीय अवकाश संस्थेचा (इस्रो) एस बँड रडार यांची एकत्रित जोडणी करण्यात आली. अमेरिकी हवाई दलाच्या ‘सी-१७’ या विशेष विमानाने बंगळूरु येथे हा उपग्रह आणण्यात आला आणि नासाने इस्रोकडे हा उपग्रह सुपूर्द केला आहे. नासा आणि इस्रो यांनी संयुक्तपणे हा उपग्रह तयार केला असून अमेरिका आणि भारत यांच्या संबंधामध्ये ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
निसार उपग्रहाची इस्रोकडून जोडणी कशी?
नासाने निसार उपग्रहाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले असून पुढील काम आणि जोडणी यांसाठी ते इस्रोकडे पाठविण्यात आले. इस्रोच्या जेएसएलव्ही रॉकेटमध्ये बसविण्यासाठी निसार उपग्रहाच्या दोन रडारना बंगळूरुतील यू. आर. राव उपग्रह केंद्रात विविध यंत्रणा जोडण्यात येणार आहे. त्यानंतर विविध चाचण्या करण्यात येतील आणि श्रीहरीकोटा येथून २०२४ मध्ये निसारचे प्रक्षेपण केले जाणार आहे. निसार ही नासाच्या विज्ञान मोहिमेचा भाग म्हणून तयार केलेली सर्वात प्रगत रडार प्रणाली आहे, त्यात अत्याधुनिक आणि सर्वात मोठा रडार अँटेना असेल. ड्रमच्या आकाराचा हा रडार अँटेना सुमारे ४० फूट म्हणजेच १२ मीटर व्यासाचा आहे. या अँटेनामुळे कोणत्याही वातावरणात पृथ्वीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे काढणे शक्य होणार आहे.
निसार उपग्रहाची तांत्रिक माहिती?
निसार मोहिमेच्या उपग्रहामध्ये एल आणि एस बँड रडार आहेत. सिग्नलची तरंगलांबी दर्शविण्यासाठी अशी नावे देण्यात आली आहेत. इस्रोने एस बँड रडार तयार केले आहे, जे त्यांनी मार्च २०२१ मध्ये जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीला पाठवले. गेली दोन वर्षे अभियंते आणि संशोधकांनी या प्रयोगशाळेची निर्मिती असलेली एल बँड प्रणाली तयार करण्यासह या उपग्रहातील यंत्रणा जोडणी करण्यास दोन वर्षे लागली. त्याची पडताळणी आणि अनेक चाचण्या केल्यानंतर इस्रोकडे तो सुपूर्द करण्यात आला. गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ व अभियंत्यांनी हा उपग्रह खास रचना केलेल्या शिपिंग कंटेनरमध्ये ठेवण्यात आला आणि त्यानंतर अमेरिकी हवाई दलाच्या विमानाने तो भारतात आणण्यात आला. हा उपग्रह आता इस्रोच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट व्हेईकल मार्क- २ रॉकेटवर बसवण्यात येणार आहे. २०२४ मध्ये श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून तो पृथ्वीच्या जवळच ध्रुवीय कक्षेत पोहोचवला जाणार आहे.
निसार उपग्रह काय करणार आहे?
एखादी वेधशाळा ज्याप्रमाणे काम करते, त्याच -प्रमाणे निसार उपग्रह काम करणार आहे. निसार पृथ्वीवरील जवळपास सर्व जमीन आणि बर्फाच्या पृष्ठभागाचे निरीक्षण दर १२ दिवसांनी दोनदा करेल. पृथ्वीवरील पर्यावरणिक हालचालींचे मोजमाप अत्यंत बारीकसारीकपणे करेल. शास्त्रज्ञांना वनस्पती आणि वातावरण यांच्यातील कार्बनची देवाण-घेवाण समजण्यास मदत करण्यासाठी तो जंगल आणि कृषी क्षेत्रांचे सर्वेक्षणही करेल. संपूर्ण पृथ्वीचा उच्च क्षमतेचा नकाशा निसारद्वारे तयार केला जाणार आहे. एकदा कार्यान्वित झाल्यावर निसार सर्व हवामान परिस्थितीत, दिवसरात्र मोजमाप व माहिती गोळा करण्यास सक्षम असेल. निसारची माहिती संशोधकांना भूस्खलन, भूजलाची हानी आणि कर्बचक्र यांसह पृथ्वी विज्ञान हे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल.