वांशिक दंगली आणि त्यातून होणारी हत्यासत्रे हे आफ्रिकेसाठी नवीन नाही. तरीदेखील रवांडामध्ये ३० वर्षांपूर्वी झालेल्य नरसंहाराने जग हादरले. या घटनेस ७ एप्रिल रोजी ३० वर्षे पूर्ण झाली. ८ लाखांहून अधिक जणांची १०० दिवसांत कत्तल करण्यात आली. इतक्या क्रूर आणि अमानवी नरसंहारामागची कारणे, त्यामागचा उलगडलेला इतिहास…  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरसंहाराची पार्श्वभूमी काय होती?

१९१८मध्ये बेल्जियमने रवांडावर कब्जा केला. बेल्जियमची सत्ता असताना या देशाची जनगणना करण्यात आली. बेल्जियम सरकारकडून रवांडाच्या नागरिकांसाठी ओळख कार्डे देण्यात आली. या ओळखपत्रांद्वारे रवांडाच्या जनतेला तीन जमातींमध्ये (हुतु, तुत्सी आणि तोवा) विभागण्यात आले. रवांडातील एकूण लोकसंख्येमध्ये हुतु समाज ८५ टक्के आहे.  तर लोकसंख्येच्या ८.४ टक्के तुत्सी आहेत. विभाजनात तुत्सी समुदायाला रवांडातील उच्च जमातीत विभागत सरकारने त्यांना सरकारी सुविधा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे हुतु समुदाय पेटून उठला. यादरम्यान दोन्ही समुदायांत वारंवार संघर्ष होत राहिले. पश्चिमी देशांनी केलेल्या मध्यस्थीने १९६२ मध्ये रवांडा स्वतंत्र झाला. १९७३ मध्ये हुतु समुदायाचे हेबिअरिमाना हे रवांडाचे राष्ट्राध्यक्ष झाले.

हेही वाचा >>>विश्लेषण: पंतप्रधान आवास योजनेची गती का मंदावली?

नरसंहार कशामुळे झाला?

१९५९ साली हुतु समाजाने तुत्सी बेल्जियन सत्ता मोडून काढली. यानंतर लाखो तुत्सी लोकांनी जीव मुठीत घेऊन युगांडासह इतर शेजारी राष्ट्रांमध्ये पलायन केलं. एका तुत्सी समूहाने रवांडन पॅट्रियोटिक फ्रंट (आरपीएफ) या विद्रोही संघटनेची स्थापना केली. ही संघटना १९९०च्या दशकात रवांडामध्ये दाखल झाली आणि संघर्षाला सुरुवात झाली. हुतु सरकारने युद्धादरम्यान तुत्सींवर कारवाई केली आणि ते आरपीएफचे साथीदार असल्याचा दावा केला. सरकारी प्रचाराने त्यांना देशद्रोही ठरवले आणि त्यांच्या विरोधात व्यापक संताप निर्माण झाला. आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपानंतर, तसेच रवांडाचे अध्यक्ष, जुवेनल हेबिअरिमाना यांनी ऑगस्ट १९९३ मध्ये युद्ध संपवण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली, परिणामी आरपीएफ हल्ल्यांना विराम मिळाला. मात्र ६ एप्रिल १९९४ च्या रात्री राष्ट्रध्यक्ष जुवेनल हेबिअरिमाना आणि बुरुंडीचे राष्ट्राध्यक्ष केपरियल नतारयामिरा ज्या विमानात प्रवास करत होते ते विमान रवांडातील किगालीमध्ये पाडण्यात आले. विमानातील सर्वांचा मृत्यू झाला. हे विमान कुणी पाडले, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही. काहीजण यासाठी हुतु अतिरेक्यांना जबाबदार धरतात तर काही रवांडन पेट्रियोटिक फ्रंटला. हे दोन्ही नेते हुतु समाजाचे होते. त्यामुळे हुतु अतिरेक्यांनी यासाठी आरपीएफला जबाबदार ठरवले आणि यानंतर लगेच नरसंहार सुरू झाला.  

हेही वाचा >>>‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?

नरसंहार कसा घडवण्यात आला?

नरसंहारासाठी कारण मिळावे, यासाठी हुतु अतिरेक्यांनीच विमान पाडल्याचा आरोप आरपीएफने केला. त्याकाळी प्रत्येक व्यक्तीच्या ओळखपत्रात त्याच्या जमातीचाही उल्लेख असायचा. त्यामुळे तरुणांनी रस्त्यांवर नाकाबंदी करून तुत्सी जमातीच्या लोकांना वेचून-वेचून धारदार हत्यारांनी ठार केले. हुतु समाजातील लोकांनी त्यांच्या शेजारी राहत असणाऱ्या तुत्सी समाजातील लोकांना ठार केले. यात सर्वाधिक बळी लहान मुले आणि महिलांचे गेले. हजारो महिलांवर सामूहिक बलात्कार झाला होता. तुत्सी जातीच्या हजारो स्त्रियांना बंदी बनवून त्यांना ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणून ठेवण्यात आले. लाखो परिवार नाहीसे झाले. तीन महिन्यांच्या नरसंहारात रवांडाचे ८ लाखांहून अधिक नागरिक मारले गेले.

नरसंहार कधी आणि कसा थांबला?

आरपीएफने हळू-हळू देशातील अधिकाधिक भागांवर ताबा मिळवला. ४ जुलै १९९४ रोजी आरपीएफच्या जवानांनी किगालीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मात्र, आपल्यावर सूड उगारला जाईल, या भीतीने २० लाख हुतुंनी शेजारील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये पलायन केले. काही जण टांझानिया आणि बुरुंडीलाही गेले. सत्तेवर ताबा मिळवल्यानंतर आरपीएफच्या कार्यकर्त्यांनी हजारो हुतु नागरिकांची हत्या केली. बहुतांश हत्या कांगोमध्ये झाल्या, असे मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, हुतु बंडखोरांचा शोध घेण्यासाठी रवांडाने दोनदा आपले सैन्य कांगोमध्ये पाठवले. आरपीएफने या आरोपांचा इन्कार केला आहे.

रवांडातील सद्यःस्थिती कशी आहे?

युगांडामध्ये निर्वासित म्हणून वाढलेले पॉल कागामे रवांडाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. १९९४ पासून विविध पदांवर निवडून आल्यानंतर त्यांनी अंतर्गत संघर्षामुळे कोलमडलेल्या रवांडाला पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रवांडाला टेक्नॉलॉजी हब बनवण्याचा प्रयत्न केला आहे. राजधानी किगाली शहराला नवीन इमारती आधुनिक स्वरूप देतात. मात्र त्यांना विरोधक सहन होत नाहीत आणि त्यांच्या अनेक विरोधकांची देशात आणि देशाबाहेर हत्या झाल्याची टीका त्यांच्यावर केली जाते. किगालीच्या बाहेर दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर आहे, बहुतेक लोक अजूनही शेतीवर उदरनिर्वाह करतात. देशात शांतता असली तरी, रवांडाचे त्याच्या शेजाऱ्यांशी संबंध बिघडले आहेत. अलीकडे कांगोमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकमेकांवर विविध सशस्त्र गटांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What was the cause of the rwandan genocide 30 years ago print exp amy
First published on: 11-04-2024 at 07:10 IST