China owns stakes in both Pakistan and Bangladesh’s stock exchanges: शत्रू नेहमी बंदूक घेऊनच येतो असं नाही… काही वेळा तो सुटाबुटात येतो. गुंतवणुकीच्या नावाखाली बाजारपेठेवर अधिराज्य गाजवतो. चीनने पाकिस्तान आणि बांगलादेशच्या शेअर बाजारात पाय रोवले आहेत. पण हा आकड्यांचा खेळ भारतासाठी किती महागात पडू शकतो? याचाच घेतलेला आढावा.
डावपेचात हुशार
चीन डावपेचात हुशार आहे. २०१७ साली चीनमधील काही कंपन्यांच्या समूहाने पाकिस्तान शेअर बाजारात ४० टक्के हिस्सा विकत घेतला. त्यानंतर एका वर्षाने एका चिनी समूहाने ढाका शेअर बाजारामधील २५ टक्के हिस्सा संपादन केला.
चीनची घुसखोरी
भारताच्या काही जवळच्या देशांच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये चीनने घुसखोरी केलेली आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या प्रमुख शेअर बाजारामध्ये चीनने मोठा हिस्सा विकत घेतल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांशी भारताचे संबंध फारसे सौहार्दपूर्ण नाहीत आणि तरीही चीनने त्या देशांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये एक महत्त्वाचा भागधारक म्हणून स्वतःची भूमिका निर्माण केली आहे.
पाकिस्तान व बांगलादेशाशी तुलना
शेअर बाजाराच्या आकाराच्या दृष्टीने पाहिल्यास भारताची तुलना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याशी केली असता, भारत हा बराच पुढे आहे. भारताच्या शेअर बाजाराची एकूण बाजार भांडवल किंमत सुमारे ४.५ ट्रिलियन डॉलर्स (\$4,500 अब्ज) इतकी आहे, तर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या शेअर बाजारांचे बाजारमूल्य अनुक्रमे \$44 अब्ज आणि \$5.72 अब्ज इतकेच आहे.
२०१७ साली मार्च चीनने पाकिस्तानमधील काही संस्थांच्या समूहाच्या मदतीने पाकिस्तानी शेअर बाजारामधील ४० टक्के हिस्सा विकत घेतला होता. ही माहिती शांघाय स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनांतून स्पष्ट होते. “२०१७ साली मार्च महिन्यात शांघाय स्टॉक एक्सचेंज (SSE), चायना फायनान्शियल फ्युचर्स एक्सचेंज (CFFEX), शेंझेन स्टॉक एक्सचेंज (SZSE), पाक-चायना इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड आणि हबीब बँक लिमिटेड यांनी एकत्र येऊन एक समूह तयार केला आणि पाकिस्तानी शेअर बाजारातील ४० टक्के हिस्सा विकत घेतला,” अशी माहिती शांघाय स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे.
४० टक्के समभाग खरेदी
पाकिस्तानी शेअर बाजाराच्या संचालक मंडळावर चिनी
पाकिस्तान शेअर बाजाराच्या अलीकडील वार्षिक अहवालानुसार त्यांच्या संचालक मंडळावर एकूण १० संचालक आहेत, त्यापैकी तीन यू हँग, फु हाओ आणि गू जुनमेई हे चिनी प्रतिनिधी आहेत. यू हँग हे चायना फायनान्शियल फ्युचर्स एक्सचेंजचे प्रतिनिधी आहेत, तर फु हाओ आणि गू जुनमेई हे शांघाय स्टॉक एक्सचेंजमधील वरिष्ठ अधिकारी आहेत.
पाकिस्तानी शेअर बाजार असा आला अस्तित्त्वात
पाकिस्तान शेअर बाजाराच्या २०२४ च्या वार्षिक अहवालात शांघाय स्टॉक एक्सचेंज (SSE), चायना फायनान्शियल फ्युचर्स एक्सचेंज (CFFEX) आणि शेंझेन स्टॉक एक्सचेंज (SZSE) यांचा उल्लेख “परदेशी भागधारक” (foreign shareholders) म्हणून करण्यात आला आहे. पाकिस्तान शेअर बाजाराची स्थापना मूळतः १९४९ साली कराची स्टॉक एक्सचेंज (गारंटी) लिमिटेड या नावाने झाली होती. त्यानंतर २०१२ साली या संस्थेचे कॉर्पोरेट कंपनीत रुपांतरण (corporatisation) आणि डीम्युच्युअलायझेशन (demutualisation) करण्यात आले आणि नाव बदलून कराची स्टॉक एक्सचेंज लिमिटेड असे करण्यात आले. त्यानंतर, २०१५-१६ या वर्षात, कराची स्टॉक एक्सचेंज, लाहोर स्टॉक एक्सचेंज आणि इस्लामाबाद स्टॉक एक्सचेंज यांचे एकत्रीकरण करून एक राष्ट्रीय संस्था ‘पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज लिमिटेड’ स्थापन करण्यात आली, अशी नोंद पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजच्या अलीकडील वार्षिक अहवालात आहे.
बांगलादेश
यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे, पाकिस्तान हा एकमेव दक्षिण आशियाई देश नाही जिथे चीनने आर्थिक व्यवस्थेमध्ये आपली उपस्थिती सिद्ध केली आहे. या यादीत बांगलादेशचाही समावेश आहे. पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये हिस्सा घेतल्यानंतर एका वर्षाने, शांघाय स्टॉक एक्सचेंज (SSE) आणि शेंझेन स्टॉक एक्सचेंज (SZSE) यांच्या नेतृत्वाखालील चिनी समूहाने ढाका शेअर बाजारामधील २५ टक्के हिस्सा विकत घेतला.
२०१८ साली मान्यता
“२०१८ साली मे महिन्यात बांगलादेश सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने शांघाय स्टॉक एक्सचेंज (SSE) आणि शेंझेन स्टॉक एक्सचेंज (SZSE) यांच्या नेतृत्वाखालील चिनी समूहाच्या निविदा योजनेला अधिकृत मान्यता दिली,” अशी माहिती शांघाय स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर दिली आहे.
केवळ एकच चिनी प्रतिनिधी
मात्र, पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजच्या तुलनेत ढाका स्टॉक एक्सचेंजच्या संचालक मंडळावर चीनची उपस्थिती लक्षणीय नाही. ढाका स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळानुसार, संचालक मंडळातील एकूण १३ सदस्यांपैकी वांग हाय नावाचे केवळ एकच चिनी प्रतिनिधी आहे. वांग हाय हे शेंझेन स्टॉक एक्सचेंजचे प्रतिनिधित्व करतात.
चिनी गुंतवणुकीचा भारतावर परिणाम?
चीनने पाकिस्तान (४० टक्के) आणि बांगलादेश (२५ टक्के) स्टॉक एक्सचेंजमध्ये घेतलेला हिस्सा केवळ आर्थिक गुंतवणूक नसून, हा प्रभाव वाढवण्याचा भूराजकीय डाव आहे. भारताच्या शेजारील देशांच्या आर्थिक धोरणांवर चीनचा परिणाम वाढल्यास, भारताचे प्रादेशिक प्रभावक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे. यामुळे भारतावर अवलंबून असलेल्या आर्थिक व सुरक्षा यंत्रणांवर दबाव वाढू शकतो आणि सार्कसारख्या क्षेत्रीय गटांतील भारताचे वर्चस्व बळकट ठेवणं अधिक कठीण होऊ शकतं, यासाठी चीनचे हे उपदव्याप सुरू आहेत.