Who is Arvind Srinivas? कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात तुलनेने नवीन असलेली Perplexity AI कंपनी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या कंपनीने गूगलचा मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा ब्राऊझर क्रोम खरेदी करण्यासाठी तब्बल ३४.५ अब्ज डॉलर्स एवढी ऑफर दिली आहे. ही ऑफर Perplexityच्या स्वत:च्या १४ अब्ज डॉलर्सच्या मूल्यापेक्षा दुपटीहून अधिक आहे. त्यानंतर अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, की ऑफर खरंच आहे की चर्चेत राहण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. जगभरात क्रोमचे तीन अब्जांहून अधिक वापरकर्ते आहेत. क्रोम हा फक्त वेब ब्राऊझरच नाही, तर गूगलच्या सर्च, जाहिरात व क्लाउड सर्व्हिसेससाठीचा महत्त्वाचा दुवा आहे. केवळ तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या एका एआय कंपनीने अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवणे या गोष्टीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात याची चांगलीच चर्चा होत आहे.

कोण आहेत अरविंद श्रीनिवास?

अरविंद श्रीनिवास यांचा जन्म ७ जून १९९४ रोजी भारतात चेन्नई येथे झाला. त्यांचा शैक्षणिक प्रवास आयआयटी मद्रास येथून सुरू झाला. कॅलिफोर्निया विद्यापीठात गेल्यावर त्यांना तंत्रज्ञान आणि एआय विषयाची आवड निर्माण झाली. तिथे त्यांचे कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळाले. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रख्यात एआय संशोधक योशुआ बेंगियो यांच्यासोबत काम केले. तसेच त्यांनी काही काळ गूगलमध्येही काम केले. त्यामुळे त्यांना सर्चमागील तंत्रज्ञान व इंटरनेट इकोसिस्टीमची सखोल समज मिळाली. २०२२ मध्ये श्रीनिवास यांनी डेनिस यारात्स, जॉनी हो व अँडी कोन्विन्स्की यांच्यासोबत मिळून Perplexity AI ची स्थापना केली. ही कंपनी एआय आधारित सर्च इंजिन विकसित कऱण्यावर लक्ष केंद्रित करते.या तंत्रज्ञानाने रिअल टाइम डेटाचा वापर करून, थेट संवादात्मक उत्तरे देता येतात आणि पारंपरिक सर्च पॅराडाइमला आव्हान देता येते.

अरविंद श्रीनिवास यांनी आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बी. टेक आणि एम. टेकचे शिक्षण घेतले. नंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले इथून संगणक विज्ञानातील पीचएचडी प्राप्त केली. पुढे त्यांनी Representation Learning for Preception and Control या विषयावर प्रख्यात एआय संशोधक पिटर अबील यांच्या मार्गदगर्शनाखाली संशोधनही केले.

अरविंद श्रीनिवास यांचा व्यावसायिक प्रवास

श्रीनिवास यांनी ओपन एआय, गूगल ब्रेन व डीप माइंड येथे संशोधकीय स्वरूपाच्या पदांवर काम केले. या अनुभवांमुळे त्यांना मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे सखोल ज्ञान मिळाले. त्यावरच त्यांनी भविष्यातील तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन उभा केला.

Perplexity AI ची क्रोमवर बोली

श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली Perplexity AI ने गूगलला ३४.५ अब्ज डॉलर्सची ऑफर देऊन क्रोम खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला. ही ऑफर कंपनीच्या स्वत:च्या मूल्यापेक्षा खूपच मोठी आहे. या पावलामुळे सोशल मीडिया, टेक फोरम्स व गुंतवणूक यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. त्यासोबत Perplexity AI ने अलीकडेच कॉमेट नावाचा एआय आधारित ब्राऊझर लाँच केला आहे. पारंपरिक सर्च इंजिन्सना आव्हान देणे आणि लोकांच्या माहितीशी संवाद साधण्याच्या पद्धतीत क्रांती घडवणे हा यामागचा उद्देश आहे.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, Perplexity AI ने अशा वेळी ही ऑफर दिली आहे, जेव्हा गूगल अमेरिकेत अँटीट्रस्ट खटल्याला सामोरं जात आहे. अलीकडेच अमेरिकेतील न्यायाधीश अमित पी. मेहता यांनी असा निर्णय दिला की, गूगलने त्यांची सर्च मोनोपॉली बेकायदा पद्धतीने टिकवली आहे. त्यामध्ये त्यांनी प्रचंड रक्कम खर्च करून डिव्हाइस आणि ब्राउझर्सवर डीफॉल्ट सर्च इंजिन म्हणून आपले स्थान कायम राखले. या संदर्भातील काही उपाययोजना अद्याप ठरल्या नसल्या तरी एक पर्याय म्हणजे गूगलला क्रोम विकण्यास भाग पाडणे. मात्र, गूगलने या निर्णयावर याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. Perplexity AIची ऑफर ही प्रतीकात्मक मानली जात आहे कारण गूगल क्रोम विकेल याची शक्यता फार कमी आहे.

क्रोमच्या बाबतीतली ही ऑफर प्रत्यक्षात यशस्वी होणार नसली तरी Perplexityला यामुळे जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे. आम्ही लहान आहोत; पण आमची स्वप्नं मोठी आहेत, असा संदेश या कंपनीने टेक विश्वाला दिला आहे. Perplexity AIची ऑफर कदाचित व्यवहार्य नसेल; पण त्यांचा संदेश स्पष्ट आहे. सर्च आणि माहिती क्षेत्रातील वर्चस्वासाठी ही लढाई असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गूगल, मायक्रोसॉफ्टसारख्या महाकाय कंपन्यांसमोर नवीन Perplexityने दिलेले हे आव्हान डिजिटल विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. ही ऑफर प्रत्यक्षात आणणे अवघड असले तरी Perplexity ने स्वत:ला जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणले आणि येत्या काही वर्षांत सर्च तंत्रज्ञानाच्या जगात मोठे बदल होण्याचे संकेत दिले आहेत.

Perplexityसारखी छोटी कंपनी गूगलसारख्या महाकाय कंपनीला थेट आव्हान देत आहे. त्यामुळे नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर जागतिक स्पर्धेत उतरणे अशक्य नाही हा भारतीय स्टार्टअप्सनाही संदेश मिळतो.