Vote Chori Rahul Gandhi Minta Devi : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप करीत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संसद भवन परिसरात सोमवारी (११ ऑगस्ट) आंदोलन केलं. या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांतील अनेक खासदार सहभागी झाले होते. यावेळी खासदार प्रियांका गांधी यांच्यासह महिला खासदारांनी ‘मिंता देवी’ यांचा फोटो असलेला टी-शर्ट परिधान केला होता. या शर्टवर मागच्या बाजूला ‘124, Not Out’ असा मजकूर छापण्यात आला होता. त्यामुळे मिंता देवी नेमक्या आहेत तरी कोण? विरोधक त्यांचा संबंध मतचोरीच्या आरोपांशी कसा जोडत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याच संदर्भात घेतलेला हा आढावा…
कोण आहेत मिंता देवी?
निवडणूक आयोगाच्या नोंदींनुसार, मिंता देवी या बिहारमधील सिवान जिल्ह्यातील दरौंदा विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत मतदार आहेत. त्यांच्या पतीचे नाव धनंजय कुमार सिंह असून, मतदार यादीत मिंतादेवींचे वय १२४ वर्षे दाखवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, मिंता देवी यांनी २०२४ मध्ये पहिल्यांदाच मतदान केल्याचं सांगितलं जात आहे. अरजानिपूर येथील कन्या माध्यमिक विद्यालय हे त्यांचे मतदान केंद्र आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, बिहारमधून एक अदभुत प्रकरण समोर आलं आहे, ज्यात महिला मतदाराचं वय १२४ असून, त्या पहिल्यांदाच मतदान करीत आहेत. ही मतदार यादी खोटी असून, हा नव्या प्रकारचा घोटाळा आहे, जो भाजपा आणि निवडणूक आयोगानं मिळून केला आहे.
काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला चिमटे
काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी याच मुद्द्याला हाताशी धरून निवडणूक आयोगाला चिमटा काढला. “निवडणूक आयोगानं मानवजातीस मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी बिहारमधील मतदार यादीच्या सखोल तपासणीतून १२४ वर्षांच्या मिंता देवी यांना शोधलं आहे. निवडणूक आयोगाकडून झालेली ही मोठी मतदार फसवणूक कधीही स्वीकारली जाणार नाही. जोपर्यंत मतचोरी थांबणार नाही, तोपर्यंत इंडिया आघाडी याविरोधात आंदोलन करीत राहील,” असं वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनीही निवडणूक आयोगाला टोला लगावला आहे. “आम्ही अभिमानाने मिंता देवी यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी नामांकन देतो. भारतातील सर्वांत वयस्क; पण सर्वांत तरुण दिसणारी महिला निवडणूक आयोगानं शोधून काढली आहे,” अशी पोस्ट पवन खेडा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून केली आहे.
आणखी वाचा : डोनाल्ड ट्रम्प चीनविरोधात नरमले? भारतावर दबाव नेमका कशासाठी? कारण काय?
वयाच्या नोंदीत चूक की मतदार फसवणूक?
अलीकडेच बीबीसीने जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती म्हणून इंग्लंडमधील सरे येथील ११५ वर्षीय एथेल कॅटरहॅम यांचे नाव जाहीर केले होते. मात्र, निवडणूक आयोगाच्या नोंदींनुसार मिंता देवी यांची जन्मतारीख १५ जुलै १९९० आहे. म्हणजेच त्या कॅटरहॅम यांच्यापेक्षा तब्बल नऊ वर्षांनी मोठ्या आहेत. काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी यावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय, “ही केवळ नोंदणीतील टायपिंगची चूक नाही, तर मतदार फसवणुकीचा मोठा पुरावा आहे. इंडिया आघाडी मतचोरीविरोधातील हे आंदोलन तोपर्यंत थांबवणार नाही, जोपर्यंत ही फसवणूक संपत नाही.”
मिंता देवी खरंच १२४ वर्षांच्या आहेत का?
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, मिंता देवी यांचे जन्मवर्ष १९९० असून, त्याऐवजी मतदार यादीत चुकीने त्यांच्या जन्मतारखेची नोंद १९०० अशी करण्यात आली. म्हणजेच त्या १२४ वर्षांच्या नसून, प्रत्यक्षात त्यांचे वय ३५ वर्ष आहे. संसद भवन परिसरात इंडिया आघाडीचे खासदार आंदोलन करीत असताना राहुल गांधी यांना माध्यमांनी मिंता देवी यांच्याबाबत विचारले असता, त्यांनी हसत उत्तर दिलं, “पिक्चर अभी बाकी है” (आणखी काही समोर येणार आहे). निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्यानं एनडीटीव्हीला सांगितलं की, अर्जातील चुकीमुळे मिंता देवी यांच्या वयाची नोंद बदलली गेली आहे. मात्र, मतदार यादीतील फेरफार दूर करण्यासाठी केल्या जाणाऱ्या विशेष फेरतपासणी प्रक्रियेत अशी चूक टिकून कशी राहिली, याचे स्पष्ट स्पष्टीकरण मिळालेले नाही.
‘मतदार फसवणुकी’विरोधात विरोधकांचे आंदोलन
बिहारमध्ये या वर्षीच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी निवडणूक आयोगानं मतदार याद्यांची विशेष फेरतपासणी मोहीम (SIR) हाती घेतली आहे. या प्रक्रियेद्वारे मतदार यादीत सुधारणा केली जात असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. मात्र, विरोधी पक्ष आणि निवडणूक प्रक्रियेवर काम करणाऱ्या संघटनांनी बिहारमध्ये ही प्रक्रिया घाईघाईनं करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी याविरोधात आंदोलन सुरू केलं असून निवडणूक आयोगावर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘मतचोरी’ करून मतदारांना अधिकारांपासून वंचित करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा : अमेरिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? पुन्हा महामंदी येणार? १९२९ मध्ये काय घडलं होतं?
निवडणूक आयोगानं फेटाळले सर्व आरोप
मतदार यादीतील अनियमितता व विरोधकांचे मतचोरीचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळून लावले आहेत. २००४ पासून नियमित मतदार याद्यांची फेरतपासणी प्रक्रिया न झाल्यामुळे हे पुनरावलोकन आवश्यक असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही वर्षांत अनेक अपात्र व्यक्तींनी मतदार ओळखपत्रं मिळवली असून, काही जणांकडे जाणूनबुजून किंवा नकळत वेगवेगळ्या मतदारसंघांमधील अनेक ओळखपत्रं आहेत. आतापर्यंत १० हजार ५७० मतदारांनी मसुदा यादीत आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. ही यादी १ सप्टेंबरपर्यंत सर्वसामान्य नागरिक व राजकीय पक्षांकडून हरकती आणि दावे नोंदवण्यासाठी खुली आहे, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, हा वाद संसदेतही पोहोचला असून, सोमवारी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीतील अनेक खासदारांना मोर्चादरम्यान ताब्यात घेण्यात आलं. २१ जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून, मतदार फेरतपासणी वाद व ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेमुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज वारंवार ठप्प होत आहे.