Israeli Military Operations Gaza : गाझा पट्टीतील हमासच्या सशस्त्र दलाचा प्रवक्ता अबू ओबैदा एका हवाई हल्ल्यात ठार झाल्याचा दावा इस्रायलच्या लष्कराने रविवारी (३१ ऑगस्ट) केला. या कारवाईनंतर इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये इस्रायल डिफेन्स फोर्स (IDF) आणि सुरक्षा संस्था शिन बेट यांचं कौतुक केलं. त्यानंतर इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक झाली. गाझामधील अत्यंत दाट लोकसंख्या असलेल्या भागांवरील वाढत्या आक्रमणांबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. दुसरीकडे हमास व त्यांची सशस्त्र शाखा अल-कसाम ब्रिगेड्स यांनी या दाव्यावर कुठलाही प्रतिसाद दिला नाही. विशेष म्हणजे हमास आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या मृत्यूची तत्काळ पुष्टी करीत नाही. अनेकदा त्यासाठी आठवडे किंवा महिने लागतात. दरम्यान, कोण होता अबू ओबैदा? त्याला इस्रायलच्या लष्करानं कसं ठार केलं? त्याबाबत जाणून घेऊ…

कोण होता अबू ओबैदा?

अबू ओबैदा हा गाझा पट्टीत हमासच्या सशस्त्र दलाचा दीर्घकाळापासून प्रवक्ता होता. गेल्या आठवड्याच्या शेवटी एका हवाई हल्ल्यात त्याला ठार करण्यात आलं, असा दावा इस्रायली लष्करानं केला. मात्र, हमासनं या दाव्याची अद्याप पुष्टी केलेली नाही. इस्रायलनं शुक्रवारपासून हमासविरुद्ध एक नवीन लष्करी मोहीम सुरू केली आणि गाझा शहराला युद्ध क्षेत्र घोषित केलं. त्याच दिवशी दुपारी अबू ओबैदा यानं एक अधिकृत निवेदन जारी केलं. “हमासच्या सैन्यदलाकडून इस्रायलमधील ओलिसांचं संरक्षण केले जाईल; मात्र ते युद्ध क्षेत्रातच राहतील. मृत ओलिसांचे मृतदेहही सापडणार नाहीत,” असा इशाराच ओबैदा यानं निवेदनातून दिला होता.

इस्रायलमधील हल्ल्याचा सूत्रधार

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासनं दक्षिण इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यामागे अबू ओबैदा याचा हात असल्याचं सांगितलं जात होतं. अनेक वर्षांपासून तो अल्-कस्साम ब्रिगेडच्या वतीनं इस्रायलविरुद्ध चिथावणीखोर भाषणं देत होता. त्यामुळेच त्याला इमासमध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली होती. बीबीसीच्या माहितीनुसार, गाझा शहरातील अल-रिमाल परिसरातील सहा मजली इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर एकाच वेळी पाच क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला होता. ज्या मजल्याला लक्ष्य करण्यात आलं होतं, तिथे एक दंतचिकित्सा क्लिनिक होतं. या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोकड हवेत उडताना दिसली. त्यातील काही रोकड स्थानिकांनी उचलली होती; मात्र नंतर ती हमासनं परत मिळवली.

आणखी वाचा : रशियाकडून तेल खरेदी केल्याने भारताला किती झाला फायदा? आकडेवारी काय सांगते?

ओबैदा हा हमासचा चेहरा कसा झाला?

नेहमीच पॅलेस्टिनी स्कार्फने आपला चेहरा झाकून ठेवणारा अबू ओबैदा हा पश्चिम आशियातील हमासच्या समर्थकांसाठी एक प्रेरणादायी ठरला होता. त्यानं २००४ पासून अल्-कस्साम ब्रिगेडचा प्रवक्ता म्हणून काम केलं. २००६ मध्ये इस्रायली सैनिक गिलद शालितच्या अपहरणाची घोषणा केल्यानंतर तो पहिल्यांदा चर्चेत आला होता. अनेक अमेरिकन व इस्रायली अधिकाऱ्यांनी ओबैदा याची खरी ओळख हुजैफा अल-कहलुत, अशी असल्याचा दावा केला होता. मात्र, असं असलं तरी हमासनं कधीही त्याच्या खऱ्या ओळखीची पुष्टी केली नाही, असं ‘द न्यूयॉर्क टाइम्स’नं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, गाझामधील एका इमारतीत अबू ओबैदा हा लपून बसला होता. त्यानंतर हवाई दलानं अचूक मारा करीत इमारतीला लक्ष्य केलं, ज्यामध्ये ओबैदा याचा मृत्यू झाला, असा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे.

Israel military killed Hamas spokesperson
हमासच्या सशस्त्र दलाचा प्रवक्ता अबू ओबैदा (छायाचित्र रॉयटर्स)

गाझामध्ये इस्रायलचा पुन्हा लष्करी हल्ला

रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझामधील नवीन लष्करी कारवाईचं समर्थन केलं. त्यांनी सांगितलं की, ही कारवाई पूर्वी उघड केलेल्या माहितीपेक्षा अधिक व्यापक आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या टीकेला उत्तर देताना नेतान्याहू म्हणाले, “इस्रायलकडे सध्या दुसरा कोणताही पर्याय नाही. हमासचा पराभव करणं आमची जबाबदारी आहे. सुरक्षा कॅबिनेटच्या बैठकीत केवळ गाझा शहरातच नव्हे, तर मध्यवर्ती तळ आणि ‘मुवासी’ येथेही हमासच्या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”

गाझामध्ये इस्रायलचे ५० हून अधिक ओलीस?

हमासनं गाझामध्ये ५० हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलं असल्याचा संशय इस्रायलच्या लष्कराला आहे. त्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला असून, अजूनही २० जण जिवंत असण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये युद्धविराम होत नसल्यानं संतापलेल्या ओलिसांच्या कुटुंबीयांनी थेट इस्रायलच्या कॅबिनेट बैठकीबाहेर निदर्शने केली. अनेक आठवड्यांपासून इस्रायली लष्कर या आक्रमणाच्या तयारीसाठी गाझा शहराच्या बाहेरील बाजूस कारवाई करीत आहे. लष्करानं किनारी भागांमध्येही हवाई हल्ले वाढवले आहेत.

हेही वाचा : पंचशील तत्वे काय आहेत? त्यामुळे भारत-चीन संबंध सुधारणार? मोदी-जिनपिंग भेटीत काय घडलं?

इस्रायलमध्ये आतापर्यंत किती जणांचा मृत्यू?

इस्रायली लष्करानं गाझा शहरातील लाखो रहिवाशांना दक्षिणेकडे जाण्यास सांगितलं आहे. मात्र, वारंवार कराव्या लागणाऱ्या स्थलांतरांमुळे आम्ही थकून गेलो आहोत, असं तेथील रहिवाशांनी सरकारला सांगितलं आहे. तसेच, गाझामध्ये कोणतीही जागा सुरक्षित असण्याबद्दल त्यांना शंका आहे. दरम्यान, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार- युद्ध सुरू झाल्यापासून परिसरातील १२४ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच २१५ प्रौढ व्यक्ती कुपोषणाशी संबंधित कारणांमुळे दगावले आहेत. या युद्धात आतापर्यंत किमान ६३ हजार ३७१ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले, असा दावाही मंत्रालयानं केला आहे. त्यामुळे हमास व इस्रायल यांच्यातील युद्ध नेमकं कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.