हमासने इस्रायलवर अचानक हल्ला केल्यानंतर इस्रायलनेही हमासला प्रत्युत्तर दिले असून गाझापट्टीवर बॉम्बहल्ले सुरू केले आहेत. लवकरच जमिनीवरील युद्धाला तोंड फुटणार असल्यामुळे इस्रायलने राखीव सैनिकांना तातडीने सेवेवर रुजू होण्याचे आदेश दिले. पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यानंतर राखीव सैनिकांमधील अनेक लोक आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी सैनिकी सेवा देण्यासाठी कूच झाले. मात्र, या सर्व गदारोळात आता पंतप्रधान नेत्यानाहू यांचा मुलगा यायर नेत्यानाहू कुठे आहे? असाही प्रश्न विचारला जात आहे. देशातील तरुण, प्रौढ नागरिक देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सज्ज झालेले असताना पंतप्रधानांचा तरुण मुलगा यांच्यात का नाही? असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

यायर नेत्यानाहू कुठे आहे?

यायर कुठे आहे? असा प्रश्न सामान्य इस्रायली नागरिक उपस्थित करत आहेत. ७ ऑक्टोबर रोजी हमासने अचानक हल्ला चढवून १,४०० इस्रायली नागरिकांचा बळी घेतला आणि जवळपास २०० हून अधिक लोकांचे अपहरण हमासने केले. या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने तीन लाख राखीव सैनिकांना सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले. गाझापट्टीवर जमिनीवरील आक्रमण करण्यासाठी राखीव सैनिकांना बोलावण्यात आलेले आहे. मात्र, यात पंतप्रधानांचा मुलगा मात्र दिसत नाही. यायर नेत्यानाहू हा पंतप्रधानांचा मोठा मुलगा आहे. सध्या त्याच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या विषयाबाबत फर्स्टपोस्ट या वृत्त संकेतस्थळाने सविस्तर लेख प्रकाशित केला आहे. त्याबद्दल घेतलेला हा आढावा ….

हे वाचा >> गाझापट्टीतील भूमिगत बोगदे उद्ध्वस्त करणे इस्रायलसाठी आव्हानात्मक का आहे?

टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार यावर्षीच्या सुरुवातीलाच यायरने इस्रायल सोडले आणि तो फ्लोरिडाला गेला. सोशल मीडियावर याबाबत अनेक पोस्ट आल्या असून त्यातील माहितीनुसार यायर मियामीमध्ये असल्याचे कळते. मियामीमध्ये समुद्रकिनारी ऊन खात मजा घेत असलेल्या यायरचे फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र, हे फोटो कधीचे आहेत आणि कुठले आहेत? याची खातरजमा होऊ शकलेली नाही.

यायरचे वय ३२ असून राखीव सैन्यासाठी सेवा देण्यात तो पात्र ठरतो. वयाच्या चाळिशीपर्यंत राखीव सैन्यासाठी सेवा देण्यात येते. त्यामुळे इतर राखीव सैनिकांना यायरची अनुपस्थिती खटकल्याचे सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसते.

राखीव सैनिकांनी व्यक्त केली नाराजी

नाव उघड न करण्याच्या अटीवर एका राखीव सैनिकाने इस्रायलमधील वृत्तपत्राला संतप्त प्रतिक्रिया दिली. “यावर नेत्यानाहू तिकडे मियामी समुद्रकिनारी आयुष्याची मजा घेतोय आणि आम्हाला इथे सीमेवर लढण्यासाठी पाठविण्यात आले आहे. आम्ही आमचे काम, कुटुंब, मुले सर्व काही सोडून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर आलो आहोत. पण, या परिस्थितीला जे लोक जबाबदार आहेत ते मात्र खुशाल आहेत. कुणाचा भाऊ, वडील किंवा मुलगा देशाच्या रक्षणासाठी इथे सीमेवर आला आहे. पण, पंतप्रधानांचा मुलगा यायर या ठिकाणी नाही. अशामुळे देशाच्या नेतृत्वावर विश्वास बसत नाही.”

गाझा सीमेवर तैनात असलेल्या दुसऱ्या एका सैनिकाने सांगितले, “मी ज्या राज्यात नोकरी करत होतो, तिथून माझे कुटुंब, माझे आयुष्य सोडून मी सीमेवर आलो आहे. अशा कठीण परिस्थितीत मी माझ्या देशाला मोकळे सोडून, माझ्या लोकांना संकटात सोडून शांत बसू शकत नाही. मी लढण्यास तयार आहे. पण, आमच्या पंतप्रधानांचा मुलगा कुठे आहे? तो इस्रायलमध्ये का नाही? इस्रायली म्हणून प्रत्येक नागरिकाला एकत्र आणण्यासाठी ही एक मोठी संधी आहे आणि प्रत्येक इस्रायली नागरिकाने आज सीमेवर येण्याची गरज आहे. मग तो पंतप्रधानांचा मुलगा का असेना.”

इस्रायलमध्ये सैनिकी सेवा अनिवार्य

टोरोंटो सन या वृत्त संकेतस्थळावरील माहितीनुसार, यायर फ्लोरिडा येथे उजव्या विचारसरणीचे पॉडकास्ट चालवतो. डेली मेलच्या बातमीनुसार, यायर तिथे थिएटर शिकण्यासाठी गेला आहे. अनिवार्य लष्करी सेवा देण्याच्या काळात यायरने इस्रायल संरक्षण दलात प्रवक्ता म्हणून काम केले होते. इस्रायलमध्ये १८ वय पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिला आणि पुरुषाला सैन्यामध्ये अनिवार्य सेवा द्यावी लागते. पुरुषांना तीन वर्षांहून कमी आणि महिलांना दोन वर्षांपर्यंत सैनिकी सेवा देणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.

हे वाचा >> Israel-Palestine War : इस्रायलमधील योम किप्पूर युद्धाची पुन्हा आठवण का काढली जात आहे?

यायरचा चित्रविचित्र भूतकाळ

यावर्षी ऑगस्ट महिन्यात इस्रायलमधील न्यायालयाने यायरला एका महिलेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. या महिलेने यायरविरोधात खटला दाखल केला होता. यायरचे वडील नेत्यानाहू यांचे मुख्य राजकीय विरोधक बेनी गांत्झ यांच्याशी या महिलेचे प्रेमसंबंध होते, असे यायरने सूचित केले होते. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, यायरने डाना कॅसिडी नामक महिलेला ३४ हजार डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी आणि सहा हजार डॉलर्स एवढे कायदेशीर कारवाईचे शुल्क द्यावे, असा एकूण ४० हजार डॉलर्सची नुकसान भरपाई यायरला देण्याचे आदेश देण्यात आले होते. यायर नेत्यानाहूने २०२० साली त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट टाकून डाना कॅसिडी आणि त्याच्या वडिलांचे मुख्य विरोधक बेनी गांत्झ यांचे प्रेमसंबंध असल्याचे सुचित होईल, असा मजकूर टाकला होता.

निवडणुकीनंतर बेंजामिन नेत्यानाहू यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले, त्यानंतर यायरने बेनी गांत्झ यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सुचित करणाऱ्या अनेक सोशल मीडिया पोस्ट टाकल्या होत्या. यायरने आपले वडील बेंजामिन नेत्यानाहू यांचा जवळचा अनौपचारिक सल्लागार म्हणून काम पाहिलेले होते. त्यानेच सोशल मीडियावर अशा पद्धतीने पोस्ट टाकल्यामुळे त्याच्यावर अनेक मानहानीचे खटले दाखल झाले.

द टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या बातमीनुसार, यावर्षी मार्च महिन्यात तेल अवीव येथील एका सलोनबाहेर सरकार विरोधी गटांनी एकत्र येऊन निषेध आंदोलन केले होते. या सलोनमध्ये बेंजामिन नेत्यानाहू यांच्या पत्नी, यायरच्या आई येत असत. यायरने या आंदोलकांना दहशतवादी असल्याचे म्हटले होते.

“हे आंदोलक असू शकत नाहीत किंवा ते अराजकतावादीही नाहीत. ते फक्त दहशतवादी आहेत. इथे एक भूमिगत हिंसक चळवळ उभी राहत आहे. मी स्थानिक दहशतवादाबद्दल बोलत आहे”, असे ट्विट यायरने केले होते. मात्र, या ट्विटवरून गदारोळ झाल्यानंतर यायरने काही वेळात ट्विट डिलिट केले.

इस्रायलमधील वृत्तपत्रांनी त्यावेळी दिलेल्या बातम्यांनुसार, नेत्यानाहू आणि त्यांची पत्नी सारा यांनी यायरला सोशल मीडियापासून लांब राहण्याचा सल्ला त्यावेळी दिला.

याचवर्षी इस्रायलचा प्रमुख विरोधी पक्ष लेबर पार्टीला दुष्ट बोलल्याबद्दल न्यायालयाने यायरल दोषी मानले आणि लेबर पार्टीच्या एका वरिष्ठ खासदाराला १८ हजार डॉलर्सचा दंड देण्यास सांगितले.

हे वाचा >> पंतप्रधान नेत्यानाहू आणि लष्करामधील तणावामुळे गाझापट्टीवरील आक्रमणास उशीर?

यायरची सोशल मीडियावर वादग्रस्त विधाने

गार्डियनने दिलेल्या बातमीनुसार, फेसबुकने डिसेंबर २०१८ साली यायरचे फेसबुक अकाउंट काही काळापुरते बंद केले होते. मुस्लीम विरोधी आणि पॅलेस्टाईन विरोधी पोस्ट टाकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या बातमीनुसार यायरने फेसबुकवर लिहिले होते, “या ठिकाणी तोपर्यंत शांती प्रस्थापित होणार नाही, १) जोपर्यंत ज्यू लोक इस्रायलची भूमी सोडत नाहीत किंवा २) सर्व मुस्लीम इस्रायलची भूमी सोडून जात नाहीत. मी दुसऱ्या पर्यायाची निवड करेन.”

यायरने आणखी एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. ज्यात त्याने लिहिले की, १९६४ पासून जे स्वतःला पॅलेस्टिनी म्हणवून घेत आहेत, ते राक्षस लोक जोपर्यंत इथून जात नाहीत, तोपर्यंत या भूमित शांतता प्रस्थापित होणार नाही. फेसबुकने या पोस्टला द्वेषपूर्ण पोस्ट असल्याचे सांगून सदर मजकूर फेसबुकवरून हटविला होता.

फेसबुकच्या प्रवक्त्याने यावर भाष्य करताना म्हटले, “यायर नेत्यानाहू याने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे आमच्या कम्युनिटी स्टँडर्ड नियमांचा भंग झाला. त्यामुळे आम्ही सदर मजकूर आमच्या प्लॅटफॉर्मवरून हटविला आहे. कुणीही असा आक्षेपार्ह मजकूर टाकला तरीही आम्ही हीच कारवाई केली असती.” त्यानंतर संतापलेल्या यायर नेत्यानाहूने याच पोस्टचा स्क्रीनशॉट इतर सोशल मीडिया साईटवर टाकून ही पोस्ट व्हायरल करण्याचे आवाहन केले. त्याही पोस्टला द्वेषपूर्ण असल्याचे लोकांनी सांगितले.