संदीप नलावडे

भारतीय मानक विभागाने निश्चित केलेल्या सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने देशभरातील किरकोळ विक्री करणाऱ्या खेळण्यांच्या दुकानांवर छापे टाकून १८ हजार ६०० खेळणी जप्त करण्यात आली. यामध्ये हॅमलीज आणि आर्चिस या नामांकित खेळणी दुकानांचाही समावेश आहे. या खेळण्यांवर भारतीय मानक विभागाचे ‘ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डस’ (बीआयएस) हे अनिवार्य मानकचिन्ह नसल्याने ही कारवाई केल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. याव्यतिरिक्त केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या बडय़ा ई-वाणिज्य कंपन्यांनाही नोटीस बजावली आहे. खेळण्यांच्या दुकानांवर छापे टाकण्याची कारणे आणि कायदा काय सांगतो याचा धांडोळा..

नेमके घडले काय?
गेल्या दोन आठवडय़ांपासून भारतीय मानक विभागाकडून सुरक्षा नियमांचे पालन न केलेल्या वस्तूंची विक्री रोखण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. १२ जानेवारी रोजी या विभागाने खेळण्यांच्या दुकानांवर छापे टाकले आणि १८ हजार ६०० खेळणी जप्त केली. देशभरातील आघाडीच्या व्यापारी संकुलांसह विमानतळांवर असलेल्या दुकानांत ही कारवाई करण्यात आली. गेल्या महिनाभरात असे ४४ छापे टाकण्यात आले. जप्त केलेल्या खेळण्यांत स्थानिक स्तरावर उत्पादित, तसेच आयात खेळण्यांचा समावेश आहे. ‘हॅमलीज’,‘आर्चिस’ या नामांकित खेळणी विक्रेत्या कंपन्यांसह ‘डब्ल्यू. एच. स्मिथ,’ ‘किड्झ झोन’, ‘कोकोकार्ट स्टोअर’, ‘टियारा टॉय झोन’च्या दुकानांवर छापे टाकण्यात आले.

छापे टाकण्याचे कारण काय?
भारतीय मानक विभागाच्या विविध नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या खेळण्यांवर भारतीय मानक विभागाचे ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस’ (बीआयएस) हे मानकचिन्ह नव्हते. ‘बीआयएस’कडून हे मानकचिन्ह अनिवार्य करण्यात आले आहे. जुलै २०२२ पर्यंत लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील ८०० खेळणी उत्पादकांनी ‘बीआयएस’चा परवाना घेतला असला तरी, मानकांची निकषपूर्तता न केलेली खेळणी विकली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या, असे ‘बीआयएस’चे महासंचालक प्रमोदकुमार तिवारी यांनी सांगितले. जप्त केलेल्या खेळण्यांत स्थानिक स्तरावर उत्पादित, तसेच आयात खेळण्यांचा समावेश आहे. काही खेळण्यांवर बनावट परवाना क्रमांक होता. काही खेळणी निकृष्ट दर्जाची असल्याचे बीआयएसच्या निदर्शनास आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

कायदा काय आहे?
केंद्र सरकारने १ जानेवारी २०२१ पासून खेळण्यांसाठी भारतीय मानक विभागाने निश्चित केलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य केले आहे. खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेशाद्वारे खेळण्यांवर ‘बीआयएस’ हे अनिवार्य मानकचिन्ह असल्याशिवाय त्यांची निर्मिती, विक्री, आयात किंवा वितरण करता येत नाही. त्याशिवाय काही खेळण्यांवर ‘आयएसआय’ हे मानकचिन्हही असणे आवश्यक आहे. ते नसेल तर ते खेळणे निकृष्ट ठरविण्यात येते. लहान मुलांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने खेळण्यांसाठी विविध सुरक्षा पैलूंचा आधार घेत मानके तयार करण्यात आली आहेत. खेळण्याला टोकदार कडा किंवा धारदारपणा असू नये जेणेकरून खेळताना मुलांना जखमा होणार नाहीत, ती ज्वलनशील घटकांनी तयार केलेली नसावीत, विषारी घटकांचा समावेश नसावा असे हे नियम आहेत. देशांतर्गत उत्पादकांव्यतिरिक्त, आयात केलेली खेळणी आणि परदेशी उत्पादकांनाही हा आदेश लागू आहे. या मानकांची तपासणी केल्यानंतर ‘बीआयएस’कडून प्रमाणपत्र दिले जाते.

ई-वाणिज्य कंपन्यांना नोटीस पाठवण्याचे कारण काय?
दुकानांवर छापे टाकून खेळणी जप्त केल्यानंतर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) ‘ॲमेझॉन,’ ‘फ्लिपकार्ट’ व ‘स्नॅपडील’ या तीन आघाडीच्या ‘ई-वाणिज्य’ कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. या कंपन्यांनी खेळण्यांच्या गुणवत्ता नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. निकृष्ट दर्जाची खेळणी विकल्याचा आणि मानकचिन्हाशिवाय खेळण्यांची विक्री केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नामांकित कंपन्यां’चा इतिहास कसा?
हॅमलीजची ओळख आहे. ही खेळणी निर्मिती करणारी ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनी. विल्यम हॅम्ली यांनी १७६०मध्ये या कंपनीची स्थापना केली. २०१९ मध्ये रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ही कंपनी विकत घेतली. ‘आर्चिस’ ही शुभेच्छापत्रे आणि भेटवस्तूंची विक्री करणारी भारतीय कंपनी आहे. १९७९ मध्ये अनिल मूलचंदानी यांनी या कंपनीची स्थापना केली. सहा देशांत आणि १२० शहरांमध्ये या कंपनीची ‘आर्चिस गॅलरी’ नावाची विक्री दालने आहेत. या दालनांतून शुभेच्छापत्रे, भेटवस्तू, खेळणी, सॉफ्ट टॉइज विकली जातात.