– संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारच्या धोरणांवर समाजमाध्यमांवर टीकात्मक गाणे प्रसारित करणाऱ्या उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध गायिका नेहा सिंह राठोड अडचणीत आल्या आहेत. ‘यूपी में का बा’ या चित्रफितीमुळे लोकप्रिय झालेल्या या गायिकेला उत्तर प्रदेश पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आपल्या गाण्यातून नेहा सिंह राठोड यांनी सामाजिक भावना भडकविल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना नोटीस पाठविण्याचे कारण आणि इतर माहिती…

नेहा सिंह राठोड यांना नोटीस पाठविण्याचे कारण काय?

भोजपुरी लोकगायिका असलेल्या नेहा सिंह राठोड या त्यांच्या ‘यूपी में का बा’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या. उत्तर प्रदेश सरकारच्या धोरणांवर या गाण्यातून टीका करण्यात आली. आता त्यांनी ‘यूपी में का बा- भाग २’ हे गाणे प्रसिद्ध केले आहे. ट्विटर आणि यूट्यूब यांवर एक चित्रफीत प्रसारित करून हे गाणे जनतेपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. या महिन्यात कानपूर देहाट जिल्ह्यात जमावाने एका ४५ वर्षीय महिला आणि तिच्या २२ वर्षीय मुलीला जिंवत जाळले होते. या हत्याकांडाबाबत नेहा सिंह राठोड यांनी आपल्या गाण्यातून उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली आहे. गाण्यात तिने या घटनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

या नोटिशीत कोणत्या मुद्द्यांचा उल्लेख आहे?

कानपूर पोलिसांचे एक पथक मंगळवारी रात्री कानपूर ग्रामीण भागात राहणाऱ्या नेहा सिंह यांच्या घरी गेले आणि फौजदारी कारवाई करत ही नोटीस बजावण्यात आली. या नोटीसमध्ये पोलिसांनी समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या तिच्या चित्रफितीबद्दलच्या अनेक मुद्द्यांचा तपशील मागावला आहे. ही चित्रफीत तिनेच अपलोड केली आहे का, ज्या यूट्यूब वाहिनी आणि ट्विटर खात्याद्वारे तिने चित्रफीत प्रसारित केली आहे, ती तिचीच आहे का, या गाण्यातील शब्दरचना तिनेच लिहिली आहे, यापूर्वी प्रसिद्ध झालेली गाणी तिची स्वत:ची आहे का, असे अनेक प्रश्न या नोटिसीत पोलिसांनी विचारले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्याकडून तीन दिवसांत या नोटिशीचे स्पष्टीकरण मागितले आहे. या गाण्याद्वारे सामाजिक भावना भडकविल्याचा आरोप नेहा सिंह यांच्यावर करण्यात आला आहे.

नेहा सिंह राठोड यांची नेमकी ओळख काय?

मूळच्या बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील असलेल्या नेहा सिंह या भोजपुरी लोकगायिका आहेत. याच जिल्ह्यातील जंदाह गावात बालपण गेलेल्या २५ वर्षीय नेहा सिंह या गेल्या पाच वर्षांपासून समाजमाध्यमांवर विविध चित्रफिती प्रसिद्ध करून उत्तर प्रदेश व बिहार सरकारवर टीकात्मक गाणी गात आहेत. आपल्या गाण्यांच्या माध्यमातून महागाई, भ्रष्टाचार, गरिबी, कायदा-सुव्यवस्था, नागरी समस्या यांवर प्रश्न विचारून व्यंगात्मक टीका करत आहेत. ‘अलाहाबाद विद्यापीठा’वर एक लोकगीत बनवून त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यानंतर त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यानंतर त्यांनी शेकडो गाणी आणि व्यंगात्मक कविता तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या. यांमुळे अनेकदा वाद निर्माण झाले असून सरकारस्नेही नागरिकांनी त्यांच्यावर टीका केली आहे, तर सरकारविरोधी नागरिकांनी त्यांच्या गाण्यांची वाहवा केली आहे. मोबाइलवर चित्रित करणाऱ्या या गाण्यांचे समाजमाध्यमांवर लाखो फॉलोअर्स आहेत.

नेहा सिंह यांची कोणती गाणी प्रसिद्ध झाली आहेत?

नेहा सिंह यांचे ‘रोजगार देबा कि करबा ड्रामा’ हे गाणे समाजमाध्यमांवर खूपच प्रसिद्ध झाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बेरोजगार तरुणांचे प्रश्न या गाण्यातून मांडण्यात आले होते. ‘यूपी में का बा?’ या गाण्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या. करोनाकाळातील व्यवस्था, हाथरस हत्याकांड आदी गंभीर मुद्दे त्यांनी या गाण्यातून मांडले. त्याशिवाय लखीमपुरीतील शेतकऱ्यांचा मृत्यू आणि करोनाकाळात गंगेत सापडलेले मृतदेह यांसारख्या अनेक गोष्टी आपल्या गाण्यांत मांडून त्यांनी भाग दोन आणि तीनही प्रसिद्ध केले. २०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी ‘बिहार में का बा’ हे गाणे प्रसिद्ध केले. त्यात बिहारमधील समस्यांवर त्यांनी बोट ठेवले होते. त्यानंतर राठोड यांनी सुमारे २०० गाणी प्रसिद्ध केली असून ज्यात बेरोजगारी, भ्रष्टाचार, मजूर व शेतकऱ्यांचे प्रश्न, टाळेबंदीदरम्यान झालेले स्थलांतर यांवर भाष्य केले आहे.

हेही वाचा : उत्तर प्रदेश पोलिसांची नेहा सिंह राठोडला नोटीस, कोण आहे ही भोजपुरी गायिका?

नेहा सिंह यांना नोटीस पाठवल्यानंतर विरोधी पक्षांची भूमिका काय?

नेहा सिंह यांना पोलिसांनी नोटीस पाठविल्यानंतर समाजवादी पक्षाने भाजप सरकारवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेश सरकारचा ‘कुरूप चेहरा’ समोर आला आहे. सरकारला भीती वाटत असल्याने त्यांना आरसा दाखविणाऱ्या लोकगायिकेला त्यांना नोटीस पाठविली, असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सांगितले. लवकरच नेहा सिंह यांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी समाजवादी पक्ष असल्याचे सांगणार असल्याचे यादव म्हणाले. काँग्रेसनेही याप्रकरणी भाजप सरकारवर टीका केली आहे. आम्ही नेहा सिंह यांच्या पाठीशी असून या नोटिशीबाबत चिंता करू नका, असे त्यांना सांगणार आहोत. अत्याचाराच्याविरोधात आपण एकत्र लढू आणि जिंकू, अशी भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, असे काँग्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले. नेहा सिंह या केवळ भाजपवरच टीका करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्यानंतर राठोड यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘प्रश्न केवळ सत्तेत असलेल्यांनाच विचारले जाऊ शकतात. मी लोककवी असून लाेकांच्या भावना मांडत आहेत,’’ असे त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why bjp criticizing neha singh rathore in uttar pradesh police notice for song print exp pbs
First published on: 24-02-2023 at 09:00 IST