scorecardresearch

Premium

दिल्लीत मुलीचा खून होत असताना लोक शांतपणे का उभे होते? या घटनेचा ‘बायस्टॅण्डर इफेक्ट’शी संबंध कसा लागतो?

दिल्लीत एका १६ वर्षीय मुलीचा भरवस्तीत, अनेक लोकांच्या समोर निर्घृण खून करण्यात आला. या वेळी अनेक लोक त्या रस्त्याने ये-जा करीत होते. कुणीही हल्लेखोराला साधे हटकलेदेखील नाही. यामुळे ‘बायस्टॅण्डर इफेक्ट’ या सिद्धांताची पुन्हा चर्चा होत आहे.

crime against women
महिलांवर अत्याचार होत असताना प्रत्यक्षदर्शी बघ्याची भूमिका घेतात. याचा संबंध 'बायस्टॅण्डर इफेक्ट'शी का लावला जातो. (Photo – Reuters)

दिल्लीमध्ये एका १६ वर्षीय युवतीची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या वेळी रस्त्यावर येणारे-जाणारे, उभे असलेले अनेक लोक दिसत आहेत. पण कुणीही हल्लेखोराला थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, सदर हल्लेखोर बराच वेळ युवतीला मारहाण करीत आहे. त्या वेळी आजूबाजूला अनेक लोक उभे असलेले दिसत आहेत. एवढेच नाही तर हल्लेखोराने युवतीचा खून करून तिथून पळ काढला, तरीही आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती देण्याची तसदी घेतली नाही. या घटनेमुळे पुन्हा एकदा ‘बायस्टॅण्डर इफेक्ट’ची (bystander effect) चर्चा होत आहे. ‘फर्स्टपोस्ट’ या वेबसाइटने या सिद्धांताची सविस्तर माहिती गोळा केली आहे. ती पुढीलप्रमाणे.

‘बायस्टॅण्डर इफेक्ट’ म्हणजे नेमके काय?

‘बायस्टॅण्डर इफेक्ट’ ही संज्ञा पहिल्यांदा १९६४ साली २८ वर्षीय किट्टी जिनोव्हिस (Kitty Genovese) हिच्या हत्येनंतर वापरण्यात आली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या बातमीनुसार सदर हल्ला ३५ मिनिटे सुरू होता. या हल्ल्याचे ३८ साक्षीदार होते, जिनोव्हिस सगळ्यांकडे मदतीची याचना करीत होता. पण एकानेही त्याच्या मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. न्यूयॉर्कमधील क्विन्स परिसरात असलेल्या केव उद्यानात हल्लेखोराने अर्ध्या तासाहून अधिक काळ धुडगूस घातला होता. या वेळी हल्लेखोर हातात शस्त्र घेऊन अर्धा तास महिलेचा पाठलाग करून तिच्यावर हल्ला करीत होता. तीन हल्ले झाले तरीही या ३८ लोकांनी पोलिसांना पाचारण करण्याची हिंमत दाखविली नाही. शेवटी महिलेचा मृत्यू झाल्यानंतर एका साक्षीदाराने पोलिसांना फोन करून हल्ल्याची माहिती दिली, अशी बातमी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिली होती.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

हे वाचा >> दिल्लीत चाकूचे वार करुन अल्पवयीन मुलीची हत्या, एसी मॅकेनिक कसा झाला खुनी? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “मला यात पडायचे नव्हते.” ‘लॉस एंजलीस टाइम्स’ने दिलेल्या बातमीनुसार, ही दुर्दैवी घटना घडत असताना आणि नंतरही प्रत्यक्षदर्शींनी कोणतीही हालचाल केली नाही, त्यामुळे या घटनेला तज्ज्ञांनी ‘बायस्टॅण्डर इफेक्ट’ असे नाव दिले. या संज्ञेनुसार, “एखाद्या घटनेत प्रत्यक्षदर्शींची संख्या जेवढी जास्त असेल, तितकी कोणीतरी हस्तक्षेप करण्याची शक्यता कमी असते.”

‘ब्रिटानिका’या विश्वकोशाच्या माहितीनुसार, अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ बिब लॅटेन आणि जॉन डार्ले यांनी ‘बायस्टॅण्डर इफेक्ट’वर सर्वप्रथम संशोधन केलेले आहे. लॅटेन आणि डार्ले यांच्या संशोधनात असे लक्षात आले की, जेव्हा केव्हा एखादी व्यक्ती अडचणीत सापडलेली असते, तेव्हा हस्तक्षेप करायचा की नाही, हा निर्णय प्रत्यक्षदर्शींच्या एकमेकांच्या निर्णयावर अवलंबून असतो.

अडचणीच्या प्रसंगात लोक हस्तक्षेप का करीत नाहीत?

‘सायकॉलॉजी टुडे’ या अमेरिकन माध्यमाच्या माहितीनुसार, लॅटेन आणि डार्ले यांना आढळून आले की लोक दोन कारणांमुळे हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेत नाहीत. एक म्हणजे जबाबदारीचा अभाव (diffusion of responsibility) आणि सामाजिक प्रभाव.

‘बायस्टॅण्डर इफेक्ट’च्या पहिल्या सिद्धांतानुसार, एखाद्या प्रसंगावेळी बघ्यांची किंवा प्रत्यक्षदर्शींची संख्या जितकी जास्त असते, तेवढी हस्तक्षेप करण्याची गरज लोकांना कमी वाटू लागते. (म्हणजे दुसरी कुणीतरी पुढे जाईल असे सर्वांना वाटत राहते) या सिद्धांतात नंतर सांगितले गेले की, एखाद्या घटनेत कसे वागावे किंवा काय करावे हे ठरविण्यासाठी प्रत्यक्षदर्शी इतरांच्या संकेतावर अवलंबून असतात. (म्हणजे दुसऱ्या कुणी हस्तक्षेप केला तर मग इतरही गोळा होतात.)

एका संशोधनातून असेही समोर आले आहे की, जेव्हा लैंगिक छळाचा प्रसंग घडत असतो तेव्हा लोकांनी हस्तक्षेप करण्याची शक्यता अगदी कमी असते. जर का,

  • प्रत्यक्षदर्शी पुरुष असेल
  • अशा पुरुषांचा महिलांबद्दलचा दृष्टिकोण प्रतिगामी असेल
  • असे प्रत्यक्षदर्शी जे नशेच्या किंवा मद्याच्या अमलाखाली असतील.

‘सायकॉलॉजी टुडे’ या वेबसाइटवर दिलेल्या सल्ल्यानुसार ‘बायस्टॅण्डर इफेक्ट’ काही कृतींनी कमी करता येऊ शकतो. जसे की, एखाद्या प्रत्यक्षदर्शीने, इथे काय चालले आहे, असा प्रश्न मोठ्याने विचारावा किंवा पोलीस इकडे येत आहेत, अशी थाप मारावी. अशा पद्धतीने प्रत्यक्षदर्शी स्वतःसहित इतरांनाही हस्तक्षेप करण्यास प्रेरित करू शकतात. “जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः पुढाकार घेऊन भूमिका घेतो, तेव्हा तो सर्वात प्रभावी ‘बायस्टॅण्डर’असतो. अशा पुढाकारामुळे इतर बायस्टॅण्डर म्हणजेच प्रत्यक्षदर्शींनाही दिशा मिळते आणि ते कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी एकत्र येतात.”, अशी माहिती ‘पीस’ या माध्यमाने दिली.

तज्ज्ञ सांगतात, हा तर सहानुभूतीचा अभाव

भारतात दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष हत्या झाल्याची असंख्य प्रकरणे आहेत. तरुण मुली आणि मुले यांची राजरोसपणे होत असलेली हत्या आणि लैंगिक छळाचे प्रकार लोकांच्या समक्ष घडत आले आहेत. काही प्रकरणात तर प्रत्यक्षदर्शी हस्तक्षेप तर करतच नाहीत, पण अशा घटनेचा व्हिडीओही काढतात. ऑक्टोबर २०२२ साली, उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील एका पीडित महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची दोन किलोमीटरपर्यंत निर्वस्त्र धिंड काढण्यात आली. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या या पीडितेचा व्हिडीओ लोकांनी काढला होता.

तज्ज्ञांच्या मतानुसार, एखाद्या हिंसक घटनेत बघ्याची भूमिका घेणारे निष्क्रिय भूमिका घेऊन फक्त घटनाक्रम टक लावून पाहत बसतात. एवढेच नाही तर, गुन्ह्याचे चित्रीकरण करण्याचे धाडस त्यांना असते पण त्यामध्ये सहानुभूतीचा अभाव असतो. तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे आता असे प्रकार वाढत चालले आहेत. दुर्दैवी प्रकाराचे चित्रीकरण सोशल मीडियावर टाकून प्रसिद्धी मिळवण्याची हाव आणि भयानक कृत्य पाहण्याची अघोरी भावना मनात उत्पन्न झाल्यामुळे अनेक लोक पीडितेचे चित्रीकरण करण्यासाठी पुढे सरसावतात.

न्यायवैद्यक मानसशास्त्रज्ञ दीप्ती पुराणिक यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, स्मार्टफोनच्या माध्यमातून तंत्रज्ञान आता सर्वांपर्यंत आणि सर्वदूर पोहोचले आहे. त्यामुळे एखाद्या प्रसंगाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर टाकल्यानंतर अधिकाधिक प्रसिद्धी मिळवण्याकडे अनेकांचा कल असतो. सोशल मीडियावर लाइक्स मिळवण्याच्या फंद्यात अनेकांना एखाद्या घटनेत चूक काय आणि बरोबर काय? यातला भेदही कळत नाही. बऱ्याच वेळा आरोपीच असे व्हिडीओ तयार करतो आणि पीडितेने तोंड उघडू नये, म्हणून दबाव टाकतो.

पुराणिक पुढे सांगतात की, खून आणि बलात्कार हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत. खूनासारख्या प्रसंगात हिंसेमुळे लोक त्याच्याशी आपला संबंध जोडू पाहत नाहीत. पण प्रसंग ज्या वेळी महिलेच्या बलात्काराचा किंवा ती निर्वस्त्र झाल्याचा असतो, तेव्हा मात्र लोक तिथे जमा होतात. या महिलेसोबत असेच व्हायला हवे, अशी लोकांची भावना झालेली असते. अशा प्रसंगात निष्क्रियपणे उभे राहून लोक व्हिडीओ काढतात.

महिलांप्रति पूर्वग्रहदूषित दृष्टिकोण

दीप्ती पुराणिक ‘बायस्टॅण्डर इफेक्ट’चे समर्थन करतात. त्या म्हणाल्या, “पुरुषप्रधान विचारधारेमुळे एखाद्या अप्रिय घटनेला महिलाच जबाबदार असेल, असा गैरसमज समाजातील लोकांमध्ये असतो. त्यामुळे महिलेवर बाका प्रसंग आल्यानंतर बायस्टॅण्डर (प्रत्यक्षदर्शी) सहानुभूती न दाखविता बघ्याची भूमिका घेतात.”

आंबेडकर विद्यापीठ, दिल्लीच्या प्राध्यापिका रुक्मिणी सेन सांगतात की, आपल्या दैनंदिन जीवनात सत्ता, अधिकार, लिंग, पुरुषप्रधान विचारसरणी यांसारख्या विषयांना हाताळण्यात आपल्याला अपयश आले आहे, कारण आपल्या सामाजिक सरंचनेतच कमतरता आहेत. अशा प्रश्नांना तोंड देण्यासाठी आपली शिक्षणपद्धती, माध्यमे आणि सरकारी यंत्रणादेखील कमी पडत आहेत. शालेय शिक्षण, सरकारी रेडिओ, टीव्ही कार्यक्रम या माध्यमातून आपण सोशल मीडियाचे दुष्परिणाम मुलांना का सांगत नाही? सेन पुढे म्हणतात की, हिंसक घटनांना आळा घालण्यासाठी त्यामागील लैंगिक दृष्टिकोण, मनगटशाही आणि गुन्हेगारांना राज्याचा पाठिंबा यावर आपल्याला गंभीर चर्चा करावी लागणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why did people standing passively when a girl was being murdered in delhi what is bystander effect kvg

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×