भारत आणि पाकिस्तानने शस्त्रविरामाची घोषणा केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर सध्या तरी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ची सुरुवात करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासह वेळोवेळी पत्रकार परिषदा घेत या मोहिमेची माहिती दिली होती. परंतु, त्यांनी भारत-पाकिस्तान युद्धात शस्त्रविरामाची माहिती देताच त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. मुख्य म्हणजे काही वापरकर्ते त्यांच्या मुलीलाही लक्ष्य करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावरील काही वापरकर्ते त्यांच्या बाजूने बोलताना दिसत आहेत. मात्र, तरीही विक्रम मिस्री यांना त्यांचे ‘एक्स’ अकाउंट लॉक करण्यास भाग पडले आहे. आता, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी व काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यासह काही राजकारणी, तसेच माजी सचिवांनी मिस्रींना पाठिंबा दर्शविला आहे. परंतु, त्यांना सोशल मीडियावर लक्ष्य का केले जात आहे? नेमके हे प्रकरण काय? त्याविषयी जाणून घेऊ…

विक्रम मिस्री आणि त्यांच्या मुलीला ट्रोल करण्याचे कारण काय?
भारताने पाकिस्तानशी शस्त्रविराम केल्यानंतर विक्रम मिस्री आणि त्यांच्या मुलीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे आणि त्यांना शिवीगाळ केली जात आहे. १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानने शस्त्रविरामांतर्गत जमिनीवर, हवेत आणि समुद्रात सर्व लष्करी कारवाया तत्काळ थांबविण्यास सहमती दर्शविली. चार दिवसांपासून सीमेपलीकडून सतत होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे सीमेजवळील सर्व भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शस्त्रविरामाची घोषणा करताना परराष्ट्र सचिव मिस्री म्हणाले की, दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांनी शनिवारी दुपारी फोनवर चर्चा केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात जोरदार प्रत्युत्तर देण्याची उघडपणे मागणी करणारे अनेक लोक शस्त्रविरामामुळे निराश झाले आणि त्यांनी त्यांचा राग सचिव विक्रम मिस्त्री व त्यांच्या मुलीवर काढला.
विक्रम मिस्री यांची मुलगी डिडॉन मिस्री लंडनमध्ये वास्तव्यास असून, हर्बर्ट स्मिथ फ्रीहिल्स या जागतिक कायदा फर्ममध्ये ती काम करते. डिडॉन मिस्री यांना वापरकर्त्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्यानंतर प्रकरण तापले. डिडॉन मिस्री हिने तिच्या कामाचा एक भाग म्हणून रोहिंग्या निर्वासितांना कायदेशीर मदत केल्याच्या दाव्यांवरून तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. काही वापरकर्त्यांनी तिच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट शेअर केल्या. मिस्री यांच्या कुटुंबाची वैयक्तिक संपर्क माहिती उघड केली आणि त्यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह टिप्पण्या पोस्ट केल्या. या ट्रोलिंगनंतर रविवारी विक्रम मिस्री यांनी त्यांचे एक्स अकाउंट लॉक केले. या कृतीमुळे इतरांना त्यांच्या पोस्ट पाहण्यापासून किंवा त्यावर टिप्पणी करण्यापासून रोखले गेले. परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप याबाबत अधिकृत विधान केलेले नाही.

नेत्यांचा मिस्री यांना पाठिंबा
ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना आयएएस असोसिएशनने ‘एक्स’वर पोस्ट केले, “आयएएस असोसिएशन परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर एकता दर्शविते. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अनावश्यक वैयक्तिक हल्ले करणे अत्यंत खेदजनक आहे.” राजीव मिस्त्री यांचे एक्स अकाउंट २०११ पासून सक्रिय आहे आणि अनेक उच्च सरकारी अधिकारी त्याचे अनुसरण करतात. मिस्री यांच्यावर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख व हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी परराष्ट्र सचिव मिस्री यांना पाठिंबा दर्शविला. ‘एक्स’वर ओवैसी म्हणाले, “विक्रम मिस्री एक सभ्य, प्रामाणिक व मेहनती डिप्लोमॅट आहेत, जे आपल्या देशासाठी अथक मेहनत घेत आहेत. आपले नागरी सेवा अधिकारी हे एक्झिक्युटिव्हच्या अंतर्गत काम करतात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि एक्झिक्युटिव्ह किंवा देश चालविणाऱ्या कोणत्याही राजकीय नेतृत्वाकडून घेतल्या गेलेल्या निर्णयासाठी त्यांना दोषी ठरवले जाऊ नये.”
भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (आयआरटीएस)नेदेखील एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे, “आयआरटीएस असोसिएशन परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध झालेल्या वैयक्तिक हल्ल्यांचा तीव्र निषेध करते. आम्ही सर्वांना त्यांच्या समर्पित सेवेची आणि राष्ट्राप्रति असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे महत्त्व राखून आदर आणि शिष्टाचार राखण्याचे आवाहन करतो.” २०११ मध्ये निवृत्त झालेल्या माजी परराष्ट्र सचिव निरुपमा मेनन राव यांनीदेखील एक्सवर लिहिले, “भारत-पाकिस्तान शस्त्रविरामाच्या घोषणेवरून परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि त्यांच्या कुटुंबाला ट्रोल करणे अत्यंत लज्जास्पद आहे. मिस्त्री यांनी दृढनिश्चयाने भारताची सेवा केली आहे आणि त्यांच्या बदनामीचे कोणतेही कारण नाही.” ते पुढे म्हणाले, “त्यांच्या मुलीला त्रास देणे आणि त्यांच्या प्रियजनांना शिवीगाळ करणे हे सभ्यतेच्या पलीकडे आहे. हा द्वेष थांबला पाहिजे.”
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलिंगचा निषेध केला आणि भारत-पाकिस्तान संबंधांमधील सर्वांत कठीण टप्प्यांपैकी एक असणारा टप्पा कसा हाताळला याबद्दल मिस्री यांचे कौतुक केले. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर हिंदीमध्ये एक लांबलचक पोस्ट केली. त्यांनी म्हटले की, अशा गैरवर्तनामुळे पूर्ण समर्पणाने देशाची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल कमी होते. त्यांनी लिहिले, “निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारची असते, हे वैयक्तिक अधिकाऱ्यांचे काम नाही. काही समाजविघातक लोक उघडपणे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध अपशब्दांच्या सर्व मर्यादा ओलांडत आहेत आणि भाजपा सरकार किंवा त्यांचे कोणतेही मंत्री त्यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी पुढे आलेले नाहीत किंवा अशा पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलेला नाही.”
गृहनिर्माण व शहरी व्यवहार सचिव श्रीनिवास काटिकीथला यांनी ‘एक्स’वर लिहिले, “कर्तव्य बाजवणाऱ्या समर्पित व प्रामाणिक अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाणे अत्यंत खेदजनक आहे. विक्रम मिस्री हे एक आदर्श अधिकारी व बॅचमेट आहेत. त्यांचे आपल्या कर्तव्याप्रति असलेल्या समर्पणाचे कौतुक केले पाहिजे, तसेच त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचेही रक्षण केले पाहिजे.” विनोदी कलाकार वीर दास यांनीही त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली. त्यांनी लिहिले, “विक्रम मिस्री, तसेच कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांचे कार्य अद्भुत होते. जो कोणी चुकीचा विचार करतो, तो मूर्ख आहे.”
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचा प्रवास
विक्रम मिस्री यांनी १५ जुलै २०२४ रोजी भारताचे ३५ वे परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९६४ रोजी श्रीनगर येथे झाला. ते सुरुवातीची काही वर्षे जम्मू आणि काश्मीरमध्ये होते. विक्रम मिस्री हे भारतीय परराष्ट्र सेवेतील १९८९ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात पाकिस्तान डेस्कवर काम केले आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग व नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव म्हणून काम केले. जानेवारी २०२२ ते जून २०२४ पर्यंत मिस्री यांनी उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचीदेखील भूमिका बजावली.