राजस्थानमधील चुरुजवळ भारतीय हवाई दलाचे जॅग्वार प्रशिक्षणार्थी विमान कोसळून झालेल्या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. यावर्षी मार्चनंतरचा जॅग्वारचा हा तिसरा अपघात आहे. साडेचार दशकांपासून कार्यरत या विमानांच्या अपघातांमुळे सुरक्षिततेविषयी चिंता निर्माण झाली आहे. संपूर्ण जगातून निवृत्त झालेल्या या विमानांचा केवळ भारतीय हवाई दलाकडून वापर केला जातो.

अपघातांची मालिका

भारतीय हवाई दलाच्या विमानांचे सात महिन्यात पाच अपघात झाले. यातील तीन जॅग्वारचे आहेत. सहा फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील शिवपुरीजवळ मिराज- २००० प्रशिक्षण विमान कोसळले. दोन्ही वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडले. सात मार्च रोजी हरियाणातील पंचकुलाजवळ एक जॅग्वार लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले. यात वैमानिक बचावला. याच दिवशी बागडोगरा हवाई तळावर उतरताना एल – ३२ वाहतूक विमानाला अपघात झाला. यात कुणीही जखमी झाले नाही. दोन एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगरजवळ जॅग्वार कोसळले. एकाचा मृत्यू झाला. दुसरा सुरक्षितपणे बाहेर पडला. नऊ जुलैच्या याच विमानाच्या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. जॅग्वारच्या ताफ्याला मागील साडेचार दशकांच्या सेवेत ५० हून अधिक मोठ्या आणि किरकोळ अपघातांच्या घटनांना सामोरे जावे लागले. त्यापैकी काही घटनांमध्ये हवाई दलास वैमानिक गमवावे लागले.

जॅग्वारचा वारसा

जॅग्वार भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील महत्त्वाचा घटक असले तरी त्यात काही समस्याही आहेत. कमी उंचीवरून मार्गक्रमण करणारी ही विमाने १९७९ मध्ये हवाई दलात समाविष्ट झाली होती. दोन इंजिनांमुळे हवेत संचार करण्याची क्षमता अधिक आहे. आखूड आणि अंशत: बांधलेल्या धावपट्टीवरूनही ती आकाशात झेपावू शकतात. हवाई दल सध्या सहा तुकड्यांमध्ये १२० जॅग्वार विमाने चालवते. २०१९ मध्ये पाकिस्तानमधील बालाकोट हल्ल्यादरम्यान, जॅग्वारचा वापर पाकिस्तानी हवाईदलाच्या अत्याधुनिक एफ-१६ चे लक्ष विचलित करण्यासाठी केला गेला. त्यामुळे एफ-१६ विमानांनी जॅग्वारला रोखण्यासाठी नियोजन केले. यातून मिराज लढाऊ विमानांना पाकिस्तानी हवाई क्षेत्र ओलांडता आले.

अपघातांचा इंजिनशी संबंध आहे का?

जॅग्वार विमानांच्या ताफ्याचे आयुष्य वाढविण्यासाठी २०१० मध्ये भारतीय हवाई दलाने इंजिन अद्ययावत करण्याची योजनाही आखली होती. हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि संरक्षण संशोधन संस्था (डीआरडीओ) यांच्या सहकार्याने प्रारंभी या विमानाची दूरवरून हल्ला, अचूक लक्ष्यभेद आणि पुरेशा इंधन साठ्यासह तळावर परतण्याची क्षमता सुधारण्यात आली. पुढील टप्प्यात जॅग्वारला अमेरिकन बनावटीचे इंजिन बसविण्यात येणार होते. परंतु, त्यासाठी मोठा खर्च असल्याने ती योजना मागे घ्यावी लागली. यामुळे जॅग्वार अजूनही ‘लेगेसी ॲडोर एमके ८११’ इंजिनद्वारे उडवली जातात. या विमानाशी संबंधित अनेक अपघात हे इंजिनमधील बिघाडामुळे झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञांच्या मते इंजिनची कमी शक्ती चिंताजनक बाब ठरते.

आव्हाने कोणती?

सुमारे ४५ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या जॅग्वार विमानांचा जगात आज भारतीय हवाई दल एकमेव वापरकर्ता आहे. त्याची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सने शेवटचे जॅग्वार २००५ मध्ये, तर ब्रिटनने २००७ मध्ये सेवेतून निवृत्त केले. ओमान, इक्वेडोर, नायजेरिया यांनीही या विमानाला कधीच निरोप दिला. त्यांनी काही जॅग्वार हवाई संग्रहालयात ठेवली आहेत. संरक्षण मंत्रालय गेल्या दोन दशकात अपघात दर कमी झाल्याकडे लक्ष वेधते. २००० ते २००५ या कालावधीत १० हजार उड्डाण तासांमागे अपघात दर ०.९३ होता. २०१७ ते २०२२ पर्यंत तो ०.२७ पर्यंत घसरला. २०२० ते २०२४ या कालावधीत तो आणखी खाली म्हणजे ०.२० पर्यंत आला आहे. ही सुधारणा विमान प्रणालींचे आधुनिकीकरण, वैमानिक प्रशिक्षण व कठोर सुरक्षा परीक्षणामुळे झाल्याचा दावा केला जातो. तज्ज्ञांच्या मते हेलिकॉप्टर ताफ्यात सुधारणा झाल्या, मात्र जॅग्वारसारखी जुनी लढाऊ विमाने अजूनही असुरक्षित आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेजसचा विलंब अडचणीचा

पर्याय नसल्याने हवाई दलास जॅग्वार विमानांचा वापर अपरिहार्य ठरला. कारण, चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी भारतीय हवाई दलास लढाऊ विमानांच्या ४२ तुकड्यांची (स्क्वॉड्रन) गरज आहे. सद्य:स्थितीत केवळ ३१ तुकड्या अस्तित्वात आहेत. यात जॅग्वारसारख्या जुन्या विमानांना निवृत्त करणे हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेवर परिणाम करू शकते. सध्याच्या ताफ्यात ‘सुखोई – ३० एमकेआय’, ‘मिग – २९ एम’, ‘मिराज – २०००’, राफेल, जॅग्वार आणि ‘मिग – २१ एस’ अशी सात प्रकारची लढाऊ विमाने आहेत. २०२७-२८ पासून हवाई दलाकडून जॅग्वारला निरोप देण्याची अपेक्षा आहे. जुन्या विमानांची जागा तेजसला दिली जाईल. तेजसला विलंब झाल्यामुळे अडचणी वाढत आहेत. अलीकडेच हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांनी लढाऊ विमानांच्या कमतरतेवर प्रकाश टाकत खरेदीतील विलंबावर तीव्र नाराजी प्रगट केली होती. युद्ध सज्जता राखण्यासाठी हवाई दलात दरवर्षी ४० लढाऊ विमाने समाविष्ट करावी लागतील. ते दृष्टीपथास आल्यानंतर जुन्या विमानांच्या निवृत्तीचा विचार होईल हे वर्तमान आहे.