Indus Waters Treaty suspension: २२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने इंडस वॉटर करार (सिंधू जलवाटप करार) स्थगित केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पूर्वी झालेली तीन युद्धे किंवा सातत्याने असलेल्या वैरभावाच्या परिस्थितीतही हा करार टिकून होता. या कराराची अमलबजावणी स्थगित करण्यामागे बराच व्यापक अर्थ आहे. एकूणच भारताच्या इतिहासात आणि संस्कृतीत सिंधू नदीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच नदीच्या काठावर विकसित झालेल्या संस्कृतीला सिंधू संस्कृती किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन (हडप्पा संस्कृती) असे नाव मिळाले आहे. या संस्कृतीचे ऐतिहासिक महत्त्व येथे वेगळे सांगायला नको. याशिवाय या नदीच्या पाण्याने आधुनिक भारतात एका महत्त्वाच्या घटनेत मोलाची भूमिका बजावली होती. ही घटना सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीशी संबंधित आहे. ही घटना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांची परीक्षा घेणारी ठरली होती.
पाकिस्तानमधून सिंधू नदीचे १२ औंस पाणी का मागवण्यात आले होते?
गुजरातमधील प्राचीन सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी घेतलेल्या ट्रस्टने जगभरातून वेगवेगळ्या ठिकाणाची माती, वनस्पती आणि पाणी गोळा करण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला होता. या वस्तू मंदिरात अर्पण केल्या जाणार होत्या. या वस्तूंमध्ये पाकिस्तानातील सिंधू नदीचे १२ औंस पाणीही मागवण्यात आले होते. या संदर्भातील माहिती राष्ट्रीय अभिलेखागारात जतन केलेल्या कागदपत्रांमधून मिळते. याच दस्तऐवजांचा वापर करून इंडियन एक्स्प्रेसच्या हरिकिशन शर्मा यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे.
ऐतिहासिक पत्रव्यवहार
मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी सिंधू नदीच्या पाण्याच्या मागणीसाठी २० फेब्रुवारी १९५१ रोजी नवानगरचे जामसाहिब यांनी पाकिस्तानातील भारताचे कार्यकारी उच्चायुक्त खुबचंद यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी म्हटले होते की, ‘सोमनाथ मंदिराच्या समारंभासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून पाणी, वनस्पती आणि माती मागवण्यात आल्याचे आम्हाला कळवण्यात आले आहे. पाकिस्तानातून आम्हाला सिंधू (इंडस) नदीचे १२ औंस पाणी हवे आहे. या पाण्याच्या पॅकेटवर स्पष्ट लेबल असावे आणि हे पॅकेट एअर मेलने पाठवावे. जेणेकरून ते मला उशिरात उशिरा १५ मार्च १९५१ (प्रतिष्ठापनेचा दिवस) पर्यंत प्राप्त होईल.’
सिंधूचे पाणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे
तत्काळ कारवाई करत, खुबचंद यांनी दोन आठवड्यांनी सिंधू नदीचे पाणी असलेले पॅकेट दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे (MEA) पाठवले आणि साउथ ब्लॉकला कळवले. पाण्याचे हे पॅकेट पाठवण्यासंदर्भात खुबचंद यांनी MEA चे उपसचिव एस. के. बॅनर्जी यांना नवानगरचे जामसाहिब यांच्याबरोबर झालेल्या पत्रव्यवहाराचा दाखला देऊन पाणी हवाई टपालाद्वारे तत्काळ पाठवण्यास कळवले होते. किंबहुना त्यांनी त्याच दिवशी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी शुभेच्छा देत पाणी पाठवल्याचे नवानगरच्या जाम साहिबांनाही कळवले. दिल्लीमध्ये, बॅनर्जी यांनी इंडस नदीच्या पाण्याचे पॅकेट अन्न व कृषीमंत्री असलेल्या के. एम. मुंशी यांच्याकडे पाठवले आणि जाम साहिबांना पत्र लिहून कळवले की, शिवलिंगाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तेच हे पाणी घेऊन जाणार आहेत.
पाकिस्तानातील सिंधूच्या पाण्याला प्रसिद्धी नको?
मात्र, कागदपत्रांमधून असे दिसून येते की, दिल्लीमध्ये सिंधूचे पाणी आल्यानंतर आठवडाभराने खुबचंद यांना पाकिस्तानमध्ये याचा कसा स्वीकार केला जाईल याची चिंता वाटू लागली. १९ मार्च १९५१ रोजी त्यांनी बॅनर्जी यांना लिहिले की, सिंधू (इंडस) नदीचे पाणी भारताच्या उच्चायुक्त कार्यालयाकडून पाकिस्तानातून पाठवले गेले… किंवा ते समारंभासाठी वापरण्यात आले, अशी प्रसिद्धी कोणत्याच परिस्थितीत करू नये. त्यामुळे पाकिस्तानात यावर टीका होऊ शकते. बॅनर्जी यांनी २८ मार्च रोजी पत्राद्वारे खुबचंद यांची ‘प्रसिद्धी देऊ नये’ ही केलेली विनंती के. एम. मुंशींकडे पाठवली आणि त्याच वेळी कार्यवाह उच्चायुक्तांना विचारले, “सोमनाथ मंदिरातील प्रतिष्ठापना पूजेत सिंधू नदीच्या पाण्याचा वापर करण्यात पाकिस्तानला नेमकी काय हरकत असू शकते?”
पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांचे संभाव्य आक्षेप
प्रश्नाचे उत्तर दोन दिवसांनी खुबचंद यांनी दिले. “पाकिस्तान सरकारला याबाबत कोणतीही हरकत नाही. मात्र पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांमध्ये काही प्रमाणात टीका होण्याची शक्यता आहे. ही टीका साधारणपणे अशा स्वरूपाची असू शकते,
(अ) भारत स्वतःला धर्मनिरपेक्ष लोकशाही देश म्हणून मिरवतो, तरीही मुस्लिम आक्रमकाने उद्ध्वस्त केलेल्या मंदिराच्या पुनर्बांधणीसंबंधी मोठ्या थाटामाटात समारंभ करतो.
(ब) भारताने फाळणीचा स्वीकार केलेला नाही. सिंधू आता भारतीय नदी राहिलेली नाही. ती पाकिस्तानच्या जीवनवाहिनीप्रमाणे आहे. सिंधू नदीच्या पाण्याचा वापर सूचित करतो की, भारत अजूनही या नदीला स्वतःच्या दृष्टिकोनातून पवित्र मानतो.”
आंतरराष्ट्रीय मते काय असतील?
खुबचंद पुढे म्हणाले, “अर्थातच हा आपल्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे की, आपण सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी करतोय. मात्र, माझं वैयक्तिक मत असं आहे की, भारताच्या उच्चायुक्त कार्यालयाने सिंधू नदीचे पाणी पाठवल्याचा उल्लेख केला जाणे टाळावे. मात्र, समारंभात जगभरातील विविध ठिकाणांहून आणलेल्या पाणी व मातीबरोबर सिंधूचे पाणी वापरण्यात आले. याचा सौम्य उल्लेख करणे जर आवश्यक वाटले तर चालेल… पाकिस्तानमधील परिणामापेक्षा महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानातील प्रसारमाध्यमे किंवा त्यांच्या प्रचारकांकडून व्यक्त केला जाणाऱ्या मतमतांतरांमुळे आंतरराष्ट्रीय मतमतांतरणावर होणारा प्रभाव अधिक महत्त्वाचा आहे.”
…नेहरू सरकारमध्ये मतभेदाची ठिणगी
शेवटी हे प्रकरण पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पर्यंत पोहोचले. त्यांनी परराष्ट्र सचिव के. पी. एस. मेनन यांच्यामार्फत आपली नाराजी व्यक्त केली. (काँग्रेस नेते समर्थन करत असले तरी नेहरू कोणत्याही प्रकारे त्यांच्या सरकारचा सोमनाथ मंदिराच्या प्रतिष्ठापनेशी संबंध असावा याविरोधी होते). नेहरूंचा संदेश देताना मेनन यांनी २५ एप्रिल रोजी खुबचंद यांना लिहिले की, “नवानगरच्या जाम साहिबांनी सिंधू नदीच्या पाण्याबाबत केलेली विनंती ही पंतप्रधानांच्या मान्यतेशिवायच आहे आणि भविष्यात अशा कोणत्याही विनंतीची अंमलबजावणी करण्यापूर्वी ती आमच्या निदर्शनास आणून द्यावी.” ३० एप्रिल १९५१ रोजी खुबचंद यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला उत्तर दिले की, “आम्ही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत सिंधू नदीचे पाणी पाठवले, जेणेकरून जर आवश्यक असेल तर त्या विनंतीची योग्य छाननी केली जाऊ शकली असती. यासंदर्भात मी आधीच विनंती केली आहे की, उच्चायुक्त कार्यालयाने सोमनाथ मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी सिंधू नदीचे पाणी पुरवल्याची कोणतीही प्रसिद्धी होऊ नये.”
भारतविरोधी प्रचारासाठीचे निमित्त
खुबचंद यांची समारंभाच्या नकारात्मक प्रसिद्धीबाबतची चिंता योग्य ठरली. २१ मे १९५१ रोजी, माहिती विभागाचे उपमुख्य माहिती अधिकारी व्ही. आर. भट्ट यांनी तयार केलेल्या १२ पानी अहवालात परराष्ट्र मंत्रालयाला कळवले की, पाकिस्तानी गुजराती प्रसारमाध्यमांनी भारतावर धार्मिक पक्षपातीपणा आणि प्रतिशोध घेण्याचा आरोप करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या. भट्ट यांनी नमूद केले की, सोमनाथ समारंभ हा हिंदू आणि भारतविरोधी तीव्र प्रचारासाठी एक निमित्त ठरला होता.