भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत खेळाडूंच्या कामगिरीइतकीच, किंबहुना अधिकच सामन्यात वापरण्यात येणाऱ्या ड्यूक्स चेंडूबाबत चर्चा होत आहे. ड्यूक्सच्या नवा चेंडूचा टणकपणा लगेच कमी होत असल्याने खेळाडू सातत्याने चेंडू बदलण्याची विनंती करत आहेत. याचा गोलंदाजांच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. तसेच षटकांची गती राखणेही (ओव्हर रेट) अवघड होत आहे. यामुळेच ड्यूक्स चेंडूंना होणारा विरोध वाढत आहे. या विरोधामागची नेमकी कारणे काय याचा आढावा.
ड्यूक्स बॉल नेमका कसा तयार होतो?
इंग्लंडमध्ये वापरला जाणारा ड्यूक्स चेंडू हा चामड्याच्या अनेक थरांनी तयार केला जातो. विशेष म्हणजे चेंडूवर असलेली शिवण ही हाताने वळलेली असते. चेंडू मैदानावर स्विंग होण्यासाठी आणि अधिक टिकाऊ राहण्यासाठी ही शिलाई सर्वांत महत्त्वाचा घटक असते. ड्यूक्स चेंडूंची शिलाई हाताने केलेली असल्यामुळे यातून गोलंदाजांना लक्षणीय स्विंग निर्माण करता येतो.
विविध देशांत कोणते चेंडू वापरले जातात?
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतात एसजी कंपनीचे चेंडू वापरले जातात. ऑस्ट्रेलियात कुकाबुरा चेंडूंना पसंती मिळते. ड्यूक्स कंपनीचे चेंडू प्रामुख्याने इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये वापरले जातात.
ड्यूक्स चेंडूच्या वापराबाबत टीका कशामुळे?
भारत आणि इंग्लंड मालिकेदरम्यान चेंडूंचा आकार सातत्याने बदलणे आणि लवकर टणकपणा गमावणे अशा तक्रारी वाढत आहेत. विशेष म्हणजे भारतच नाही, तर इंग्लंडचे खेळाडूसुद्धा चेंडूबाबत तक्रारी करू लागले आहेत. यामुळे चेंडूची निर्मिती प्रक्रिया, वापरण्यात येणारे साहित्य आणि चेंडूच्या बदलाबाबत असलेल्या नियमांमध्ये बदल या सगळ्यावरच चर्चा सुरू झाली आहे.
आकार बदलल्याचे पंच कसे ठरवतात?
पंच चेंडू पूर्णपणे खराब झाल्याशिवाय बदलण्यास तयार नसतात. वेळ वाचवण्यासाठी, जेव्हा वापरात असलेला चेंडू कायम ठेवण्यासाठी कोणताही मार्ग नसेल तेव्हाच चेंडू बदलावा असा मूळ नियम आहे. क्रिकेटच्या नियमात चेंडूचा टणकपणा कमी झाला म्हणून बदलण्याची तरतूद नाही. चेंडूचा आकार गोल असावा असा स्पष्ट उल्लेख क्रिकेट नियमात नाही. आकाराचा निकष ठरविण्यासाठी पंचांकडे दोन प्रकारच्या रिंग्ज असतात. यापैकी एक रिंगवर ‘गो’ असे लिहिलेले असते. यातून चेंडू सरळ बाहेर गेल्यास त्याचा आकार योग्य असल्याचे मानले जाते. दुसऱ्या रिंगवर ‘नो गो’ असे लिहिलेले असते. या थोड्या छोट्या आकाराच्या रिंगमध्ये चेंडू अडकला तरच तो योग्य असल्याचे मानतात. अन्यथा पंच चेंडू बदलतात. चेंडूबाबत काही छेडछाड केली गेल्यास पंच गोलंदाजी करणाऱ्या संघास न विचारता चेंडू बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात. एरवी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडूनच विचारणा झाल्यावर चेंडूच्या बदलाचा विचार केला जातो.
ही उत्पादक कंपनीची समस्या आहे का?
चेंडूचा आकार कमी होणे हे केवळ उत्पादक कंपनीपुरते मर्यादित नाही. २०१०च्या दशकात एसजी अनेकदा चेंडूचा आकार कमी करत असे. तेव्हा भारतीय खेळाडू एसजी प्रयोजित असूनही ती गोष्ट लक्षात आणून देत होते. एसजी, ड्यूक्स, कुकाबुरा या तीनही चेंडूंपैकी कमी सीमसाठी कुकाबुरा चेंडूवर अनेकदा टीका झाली. मात्र, अलीकडच्या काळात त्यांनी योग्य प्रक्रियेने सीमला बळकटी दिली आहे.
याच मालिकेत अशा तक्रारी का वाढल्या?
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत निश्चितच चेंडूच्या बदलावरून ड्यूक्स चेंडू वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघांकडून तक्रारी येत आहेत. मात्र, एक निश्चित की विकेट पडत नाहीत तेव्हा या तक्रारी वाढल्या. लॉर्ड्स कसोटीत अखेरचा दिवस याला अपवाद होता. जडेजा फलंदाजी करत असताना त्याला मोठ्या फटक्यांची संधी नाकारण्यासाठी मऊ चेंडूने गोलंदाजी करणे इंग्लंडच्या हिताचे होते. तेव्हा अखेरच्या दिवशी चेंडूच्या आकाराबाबत प्रश्न निर्माण केला गेला नाही. चेंडू बदलण्याच्या बाबतीत ड्यूक्स कंपनीची बाजू भक्कम करणारी गोष्ट म्हणजे चेंडूवर असलेला बॅच नंबर. त्यामुळे चेंडूचे उत्पादन कधी झाले हे समजते. त्यामुळे चेंडू २०२३ मध्ये उत्पादित केला गेला असेल, तर तो २०२५ मध्ये वापरणे शक्य नाही. या चेंडूंवर २०२५चा शिक्का आहे. विशेष म्हणजे एसजी आणि कुकाबुरा कंपनी असे ओळखचिन्ह वापरत नाहीत.
भारतीय उद्योजकाची कंपनी…
इंग्लंडमध्ये क्रिकेट चेंडू बनविण्यासाठी ब्रिटिश क्रिकेट बॉल्स लिमिटेड ही कंपनी १७६० मध्ये ड्यूक्स कंपनीने स्थापन केली. क्रिकेट उपकरणे तयार करण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. कालांतराने १९८७ मध्ये ही कंपनी भारतीय उद्योजक दिलीप जाजोदिया यांनी खरेदी केली. या सगळ्या टीकेवर जाजोदिया यांनी चेंडू योग्यच असल्याचे समर्थन केले आहे. खेळ बदलला असल्याने आता नियमांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे. दिवसभरातील वापराने चेंडूचा टणकपणा कमी होणे अपेक्षित आहे. पण, क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपाचा अलीकडे खूप परिणाम होत आहे. फलंदाज अधिक शक्तिशाली बॅट वापरत असल्यामुळे चेंडूचा टणकपणा लवकर कमी होत आहे. फलंदाज बाद व्हायला लागले, की खेळपट्टीला दोषी धरले जाते. आता गोलंदाजांना विकेट मिळत नाही म्हटल्यावर त्याचे खापर चेंडू खराब होण्यावर फोडले जात आहे, असेही जाजोदिया यांचे म्हणणे आहे.
नियमात बदल घडू शकतो का?
सध्या क्रिकेटमध्ये वापरत असलेला चेंडू नियमानुसार ८० षटकांनंतर बदलला जातो. आता चेंडू लवकर खराब होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे साधारण ६० किंवा ७० षटकांनंतर नवा चेंडू घेण्यात यावा अशा सूचना पुढे येत आहेत. याबाबत अजून निर्णय नाही. आयसीसीची क्रिकेट समिती आणि क्रिकेट नियम बनवणाऱ्या मेरिलिबोन क्रिकेट क्लबकडे या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.