आसाम सरकारकडून म्हैस आणि कोकीळ लढाईला सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे खेळ माघ बिहूमध्ये आयोजित केले जातात. दरम्यान, आसाम सरकारच्या या भूमिकेविरोधात पेटा(PETA) या प्राणीप्रेमी संघटनेने गुवाहाटी उच्च न्यायालयात दाद मागितली असून अशा प्रकारच्या खेळांवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आसाममधील ही म्हशींची शर्यत, कोकीळ पक्ष्यांची शर्यत काय असते? पेटाने न्यायालयात का धाव घेतली? याआधी न्यायालयाने प्राण्यांची शर्यत आणि प्राण्यांशी निगडित असलेल्या खेळांवर काय निर्णय दिलेला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…

आसाममधील जुनी परंपरा

प्राण्यांची झुंज लावण्याची प्रथा आसाममध्ये फार जुनी आहे. अशा प्रकारच्या शर्यती, झुंज तेथील संस्कृतीचा भाग आहेत, असे म्हटले तरी हरकत नाही. देशात इतर राज्यांत मकर संक्रांत, लोहरी, पोंगल या सणांपासून कापणीला जशी सुरुवात होते, त्याच पद्धतीने आसाममध्ये माघ बिहू सणानंतर पिकाच्या कापणीला सुरुवात होते. या सणानिमित्त आसाममध्ये प्राण्यांची झुंज, शर्यती आयोजित केल्या जातात. याच खेळांमध्ये दोन म्हशींमध्ये झुंज घडवून आणली जाते. नागाव जिल्ह्यातील अहतगुरी येथे अशा प्रकारचा सर्वांत मोठा खेळ आयोजित केला जातो. म्हशींच्या लढाईच्या खेळाचे हे सर्वात मोठे केंद्रच म्हणायला हवे. येथे ‘अहटगुरी अंचलिक मोह-जूज अरु भोगली उत्सव उड्जापन समिती’च्या वतीने अनेक दशकांपासून अशा प्रकारच्या लढती आयोजित केल्या जातात. तर दुसरीकडे हाजो येथील हायाग्रिव माधब (माधव) मंदिरात कोकिळांमध्ये झुंज घडवून आणली जाते. हा खेळ पाहण्यासाठी हाजो येथे आसामच्या वेगवेगळ्या भागांतून लोक येतात. गुवाहाटीपासून हाजो हे ठिकाणी साधारण ३० किमी दूर आहे. या खेळाच्या काही आठवड्यांआधी लोक कोकिळा या पक्ष्याला पाळतात, त्याची काळजी घेतात आणि या खेळाच्या दिवशी या कोकिळांना भाग घ्यायला लावले जाते.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

म्हशींची झुंज संस्कृतीचा भाग

हाजो येथील हायाग्रिव माधब मंदिराचे प्रशासक शिबा प्रसाद शर्मा यांनी या खेळाबद्दल आणि प्रथेबद्दल अधिक माहिती दिली. “म्हशींची झुंज हा येथील संस्कृतीचा भाग असून ती एक परंपरा आहे. विशेष म्हणजे ही प्रथा धर्माशी संबंधित आहे. ही झुंज सुरू होण्यापूर्वी भगवान विष्णूपुढे दिवा ठेवला जातो. त्यानंतर प्रार्थना केली जाते. ही प्रथा फार जुनी असून ती कधीपासून सुरू झाली हे सांगणे कठीण आहे. मात्र, अहोम शासक अशा प्रकारचे खेळ मोठ्या थाटामाटात आयोजित करायचे”, असे शिबा प्रसाद शर्मा यांनी सांगितले.

न्यायालयाच्या निर्णयानंतर बंदी

सर्वोच्च न्यायालयाच्या २०१४ सालच्या निर्णयानंतर आसाममधील म्हशींची आणि कोकिळा पक्षांतील झुंज बंद करण्यात आली. न्यायालयाने आपल्या निर्णयात जलिकट्टू या खेळासाठी बैलाच्या वापरावर बंदी घेतली. तमिळनाडू, महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांत बैलगाडा शर्यतीसाठी बैलाचा वापर केला जातो, त्यावरही न्यायालयाच्या निर्णयानंतर बंदी घालण्यात आली.

…आणि झुंज, शर्यतीवर बंदी आली

प्राण्यांची काळजी घेणारी व्यक्ती संबंधित प्राण्याला माणसाविरुद्ध तसेच इतर प्राण्यांविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त करणार नाही याची खात्री करावी, असा आदेशही न्यायालयाने ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाला (AWBI) दिला होता. या निर्देशानंतर जानेवारी २०१५ मध्ये AWBI ने आसाम सरकारला एक पत्र लिहिले. बिहू सणादरम्यान पक्ष्यांची तसेच प्राण्यांची लढाई, झुंज यावर बंदी घालावी असे आवाहन या पत्रात करण्यात आले होते. या पत्रानंतर आसाम सरकारने बिहूनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या प्राण्यांची झुंज, शर्यत आदी खेळांवर बंदी घातली.

बंदीच्या आदेशाला झुगारून खेळांचे आयोजन

सरकारने बंदी घातल्यानंतरही आसामच्या वेगववेगळ्या भागांत नियमांना, बंदीच्या आदेशाला झुगारून अशा प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले. दुसरीकडे हायाग्रिव माधब मंदिराच्या व्यवस्थापनाने या आदेशाला गुवाहाटी उच्च न्यायालयात आव्हान दिले.

खेळ आयोजित करण्यासाठी नियमावली

सर्वोच्च न्यायालयाने आपला अगोदरचा निर्णय रद्दबातल ठरवत गेल्या वर्षाच्या मे महिन्यात तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक सरकारने प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० कायद्यातील दुरुस्त्या कायम ठेवल्या. या दुरुस्तींच्या अधीन राहून जलिकट्टू, कंबाला, बैलगाडा शर्यत आदी खेळांना मान्यता देण्यात आली. या निर्णयानंतर डिसेंबर महिन्यात आसाम सरकारने म्हैस आणि कोकिळा यांच्यातील लढाईसाठी नियमावली करण्याचा आदेश दिला.

लढत आयोजित करण्यासाठी नियमावली काय?

त्यानंतर आसाम सरकारने म्हैस आणि कोकिळा यांची झुंज आयोजित करण्यासाठी नियमावली जारी केली. तसेच गेल्या २५ वर्षांपासून अशा प्रकारचे खेळ ज्या ठिकाणी आयोजित केले जात होते, त्याच ठिकाणी अशा खेळांना परवानगी देण्यात आली. तसेच १५ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीतच हे खेळ आयोजित करावेत, असा नियम बनवण्यात आला. कोकिळांची झुंज आयोजित केल्यानंतर संबंधित पक्षी सुस्थितीत असेल तरच त्याला सोडून देण्यात यावे, अन्यथा त्याची योग्य ती काळजी घ्यावी, असा नियम करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पुढच्या पाच वर्षे हा खेळ आयोजित करता येणार नाही, अशीही तरतूद करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी लावली हजेरी

नव्या नियमावलीसह आसाममध्ये यावेळी माघ बिहूनिमित्त हे खेळ पुन्हा एकदा आयोजित करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीदेखील अहतगुरी आणि हाजो येथे जाऊन या खेळांना हजेरी लावली. पेटा संस्थेने मात्र पुन्हा एकदा गुवाहाटी उच्च न्यायालयात धाव घेतली असून दोन याचिका दाखल केल्या आहेत. म्हशी आणि कोकिळा यांच्या लढतीवर बंदी घालावी, अशी मागणी पेटा संस्थेने आपल्या याचिकेद्वारे केली आहे. तसेच न्यायालयाचा निकाल येत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या खेळांना अंतरिम स्थगिती द्यावी, असेही पेटा संस्थेने म्हटले आहे.

म्हशींना मारहाण केली जात असल्याचा दावा

अहतगुरी आणि हाजो या दोन्ही ठिकाणी आयोजित केलेल्या वेगवेगळ्या खेळांची पेटा संस्थेने चौकशी केली. या संस्थेने दावा केला आहे की, म्हशींच्या लढतीदरम्यान लढाई करण्यासाठी मालकांकडून म्हशींना मारले जात होते. लाकडी काठीने म्हशींना मारहाण केली जात होती. नाकातून घातलेल्या वसणीच्या माध्यमातून म्हशींना ओढले जात होते. अनेक म्हशींच्या अंगावर यामुळे जखमा झाल्या होत्या, असा दावा पेटा संस्थेने केला आहे.

पक्ष्यांना बेकायदेशीरपणे पकडण्यात आल्याचा दावा

तर हाजो येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकिळांच्या झुंजीबाबत सांगताना ‘पक्ष्यांना बेकायदेशीरपणे पकडण्यात आले होते, तसेच अन्नाचे प्रलोभन देत निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाऊन त्यांच्यात लढाई घडवून आणली जात होती,’ असे पेटा संस्थेने आपल्या याचिकेत म्हटले आहे.