Woman Marries Two Brothers in Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यातील एका तरुणीनं एकाचवेळी दोन तरुणांबरोबर लग्नगाठ बांधली. सुनीता चौहान असं या तरुणीचं नाव असून ती कुनहाट गावातील रहिवासी आहे. सुनीताने हट्टी समुदायातील प्रदीप व कपिल नेगी या दोन तरुणांबरोबर संसार थाटला आहे. शेकडो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला आहे. विशेष बाब म्हणजे दोन्ही तरुण हे सख्खे भाऊ असून उच्चशिक्षित आहेत. या अनोख्या विवाहाची सध्या समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे. यानिमित्ताने बहुपतीत्वाची प्रथा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. हिमाचल प्रदेश व उत्तराखंडच्या पर्वतरांगामध्ये आजही या प्रथेचं पालन केलं जातं. नेमकी काय आहे ही प्रथा? तिला कायदेशीर मान्यता आहे का? त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…

बहुपतीत्व म्हणजे नेमकं काय?

‘बहुपतीत्व’ म्हणजे एखाद्या महिलेने एकाचवेळी एकापेक्षा जास्त पुरुषांबरोबर लग्नगाठ बांधणं. हिमाचल प्रदेशात या प्रथेला ‘जोडीदार’ असं म्हटलं जातं. हिमालयाच्या खालच्या भागांत राहणाऱ्या हट्टी समुदायातील लोक या प्रथेचं आजही पालन करतात. महाभारतातही द्रौपदीने एकाचवेळी पाच पांडवांशी विवाह केला होता, त्यावरून या प्रथेला ‘द्रौपदी प्रथा’ असंही म्हटलं जातं. ही प्रथा सिरमौर जिल्ह्यातील ट्रान्स गिरी भागासह उत्तराखंडातील जौनसार बाबर व हिमाचलमधील किन्नौर या आदिवासी भागांमध्ये आजही प्रचलित आहे. समाजशास्त्रज्ञांच्या मते, ही प्रथा शेतीतील मालकी हक्क टिकवण्यासाठी व कुटुंबांचे विभाजन टाळण्यासाठी स्वीकारण्यात आली होती.

हिमाचलमध्ये दोन भावांचा एकाच तरुणीशी विवाह

पीटीआयच्या वृत्तानुसार, हिमाचल प्रदेशातील शिल्लाई गावातील प्रदीप नेगी व कपिल नेगी या दोन सख्ख्या भावंडांनी कुनहाट गावातील सुनीता चौहान या तरुणीबरोबर विवाह केला. १२ जुलैपासून सुरू झालेला हा विवाह धार्मिक विधींमुळे जवळपास तीन दिवस चालला. या विवाहाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाले. पारंपरिक लोकगीतं आणि नृत्यांसह पार पडलेल्या या सोहळ्यात शेकडो वऱ्हाड्यांनी हजेरी लावली. प्रदीप हे जल शक्ती विभागात कार्यरत असून, त्यांचा धाकटा भाऊ कपिल परदेशात आतिथ्य क्षेत्रात काम करतो. ‘The Tribune’ ला दिलेल्या मुलाखतीत प्रदीप म्हणाले, “सुनीताबरोबर विवाह करण्याचा निर्णय आम्ही दोन्ही भावांनी सहमतीने घेतला. आम्हाला आमच्या परंपरेचा अभिमान असून एकमेकांवर विश्वासही आहे.”

आणखी वाचा : पाकिस्तानचा पाठिंबा असलेली TRF संघटना काय आहे? अमेरिकेनं तिला दहशतवादी का घोषित केलं?

दोन तरुणांशी लग्न करणारी तरुणी काय म्हणाली?

कपिल म्हणाले, “मी परदेशात नोकरीला असलो तरी या विवाहाच्या माध्यमातून आम्ही एकत्रित कुटुंब म्हणून आमच्या पत्नीला आधार, स्थिरता आणि प्रेम देणार आहोत.” सुनीता चौहान यांनीही या परंपरेविषयी आपल्याला माहिती असल्याचं सांगितलं. तसेच आपण कोणाच्याही दबावाखाली न येता स्वेच्छेने दोन्ही तरुणांबरोबर विवाह करण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, “ही माझी स्वतःची निवड होती. माझ्यावर कुणीही दबाव टाकलेला नव्हता. मला ही परंपरा माहिती आहे आणि मी ती स्वेच्छेने स्वीकारली आहे. आम्ही एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे आणि मला आमच्या नात्यावर विश्वास आहे.”

हिमाचलमध्ये बहुपतीत्व किती सामान्य आहे?

हिमाचल प्रदेश व उत्तराखंडच्या सीमेवर वसलेल्या हट्टी समुदायामध्ये बहुपतीत्वाची प्रथा अनेक शतकांपासून चालत आलेली आहे. तीन वर्षांपूर्वी या समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे. सिरमौर जिल्ह्यातील ट्रान्स-गिरी भागातील ४५० गावांमध्ये सुमारे तीन लाख हट्टी लोक राहतात. गेल्या सहा वर्षांत बद्हाणा गावात बहुपतीत्वाची पाच प्रकरणे नोंदवण्यात आली, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, शेतीतील मालकी हक्क टिकवण्यासाठी व कुटुंबांमध्ये एकता ठेवण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली होती. या प्रथेनुसार, एखादी महिला लग्नानंतर तिच्या पतीच्या लहान भावाबरोबरही लग्नगाठ बांधू शकते.

Woman Marries Two Brothers in Himachal Pradesh
हिमाचल प्रदेशमधील सुनीता चौहान या तरुणीनं हट्टी समुदायातील प्रदीप व कपिल नेगी या दोन तरुणांबरोबर संसार थाटला आहे.

महिला म्हणते, मी माझ्या लहान दीराबरोबर लग्न केलं

सिरमौरच्या जामना गावातील एका महिलेने ‘इंडिया टुडे’ला सांगितले की, तिच्या पतीनेच तिला त्याच्या भावाशी लग्न करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार, तो मोठा झाल्यानंतर तिने त्याच्याबरोबर लग्न केलं. “मी २५ वर्षांपूर्वी लग्न करून या घरात आले होते आणि तेव्हा आमची खूप गरिबी होती. घरात फक्त एकच स्वेटरचा व चपलेचा जोड होता, त्यामुळे माझ्या सासूबाई आणि मी अधून मधून त्या वस्तू वापरत होतो. जेव्हा स्वेटर आणि चपलाही वाटून वापराव्या लागत होत्या, तेव्हा मला वाटून घेणे स्वाभाविकच होतं. माझ्या पतीचा लहान भाऊ मोठा झाल्यानंतर मी त्याच्याबरोबर लग्नगाठ बांधली”, असं चाळिशीत असलेल्या त्या महिलेनं सांगितलं.

हेही वाचा : कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला अटक; प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा विवाहांना कायदेशीर मान्यता आहे का?

कायद्यानुसार, बहुपत्नीत्व व बहुपत्नीत्वाला कायदेशीर परवानगी नाही. मात्र, देशातील विविध जमातींच्या परंपरा आणि रूढींचे संरक्षण करण्याच्या तरतुदी आहेत. हट्टी समुदायात हिंदू विवाह कायद्याचं पालन केलं जातं. एनडीटीव्हीच्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने हट्टी जमातीमध्ये चालत आलेल्या जोडीदार प्रथेला ‘जोडीदार कायदा’ म्हणून संरक्षण दिलं आहे. या प्रकारच्या संयुक्त विवाहांतून जन्मलेल्या मुलांना “वाजिब-उल-अर्ज” या स्थानिक परंपरा व चालीरीतींच्या नोंदीत स्थान देण्यात आलं आहे. बाळाच्या वडिलांचं नावही पंचायतच्या नोंदीमध्ये वाजिब-उल-अर्जच्या आधारेच नोंदवलं जातं आणि ते सर्व शासकीय कामांसाठी वैध ठरतं, असं सेंट्रल हट्टी कमिटीचे सरचिटणीस कुंदन सिंग शास्त्री यांनी गेल्या वर्षी इंडिया टुडेला सांगितलं होतं.