International Day of Yoga : दि. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो. मानवी जीवनातील ‘योग’ला असणारे महत्त्व यामुळे उद्धृत होते. किंबहुना योग दिन साजरा करण्यात येऊ लागला तेव्हापासून ‘योग’ला अधिक महत्त्व आले. आता योग हा लोकांच्या दैनंदिन शब्दातील ‘योगा’ झाला आहे. परंतु, ‘योगा’ म्हणजे ‘योग’ आहे का, हा संशोधनाचा मुद्दा ठरू शकतो. योग दिनानिमित्त योगशास्त्रातील स्थित्यंतरे, योगचे योगामध्ये झालेले रूपांतर आणि योगा डे म्हणजे इंडिया हे झालेले समीकरण याविषयी जाणून घेऊया…

योग म्हणजे काय ?

संस्कृतमधील ‘युज्‌’ धातूपासून ‘योग’ हा शब्द बनला आहे. ‘युज्‌’ म्हणजे जोडणे. भारतीय आस्तिक सहा दर्शनांपैकी योग हे एक दर्शन आहे. योगदर्शनाला भारतीय मानसशास्त्र म्हटले जाते. मनाचा, मानसिक स्थितींचा, मानसिक विकारांचा प्रथम अभ्यास योगशास्त्रामध्ये करण्यात आला. चार्वाक दर्शन वगळल्यास अन्य आठ भारतीय दर्शनांनी योगशास्त्राचे महत्त्व मान्य केलेले आहे. योग ही केवळ शारीरिक क्रिया नव्हे, किंवा योग म्हणजे आसन-प्राणायाम नव्हे. आसन हा योगशास्त्राचा एक भाग आहे. दर्शन साहित्याच्या आधी योग ही संकल्पना वेदांमध्ये आलेली दिसते. उपनिषदांमध्ये त्याचा अधिक सविस्तर अभ्यास करण्यात आला. ‘युज्’ या धातूचा अर्थ जोडणे असा आहे. गाडीला किंवा रथाला घोडा वा बैल जुंपतात/जोडतात. या रथाला एक सारथी असतो, जो हे बैल वा घोडे नियंत्रित करतो.आणि रथी म्हणजे त्या रथाचा मालक त्यातून प्रवास करतो. कठोपनिषदामध्ये इंद्रियांना घोड्‌यांची, मनाला सारथीची आणि शरीराला रथीची उपमा दिलेली आहे. महर्षी पतंजलीप्रणित योगदर्शन आज उपलब्ध आहे. यामध्ये योगची व्याख्या ‘योग: चित्तवृत्तिनिरोध:’ अशी केलेली आहे. चित्तवृत्ती म्हणजे मनाच्या विविध अवस्थांवर, षड् रिपूंवर नियंत्रण म्हणजे योग असे म्हटले आहे. पुढे योगचे ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, हठयोग, लययोग, मंत्रयोग असे विविध प्रकार सांगितलेले आहे. परंतु, सर्वांमध्ये चित्ताची एकाग्रता महत्त्वाची मानलेली आहे. योगशास्त्राचे ध्येय हे समाधी अवस्था हे आहे. भारतीय विद्यांमधील योग हा ज्ञानमार्ग सांगणारा, शरीर-मनाचे उन्नयन करणारा आणि पर्यायाने सुखदुःख, राग-द्वेष, असुया, आनंद अशा द्वंद्वातून मुक्तता देणारा आहे. मनाचा शास्त्रीयरीतीने अभ्यास करणारे शास्त्र हे योगशास्त्र आहे.

article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी :विज्ञान आणि तंत्रज्ञान
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
complaints can be made by keeping name confidential in savitribai phule pune university
पुणे : नाव गोपनीय ठेवून करता येणार तक्रार

२१ जून-योग दिनाचा इतिहास

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधानपद स्वीकारले. भारतीय संस्कृती, कला, परंपरा, भारतीय विद्या यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा त्यांचा अजेंडा होता. मनुष्यजीवनातील योगला असणारे महत्त्व, योगविषयक जागृती व्हावी, या उद्देशाने योग दिन साजरा करण्याची त्यांनी कल्पना मांडली. २१ जून हा उत्तरायणातील शेवटचा आणि वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. म्हणून या दिवशी योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्र आमसभेमध्ये त्यांनी हा प्रस्ताव मांडला. ११ डिसेंबर, २०१४ रोजी १७७ देशांनी सहमती देऊन २०१५ पासून योग दिन साजरा करण्यात येऊ लागला.
योग ही भारतीय विद्या आहे. योगशास्त्र हे भारतीय ज्ञानपरंपरेचा भाग आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाची संकल्पना मांडल्याने ‘योग दिन’ हा ‘इंडियन ब्रँड’ झाला आहे.

हेही वाचा : विश्लेषण : उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केलेले ‘गारदी’ नक्की आहेत तरी कोण? काय आहे गारदींचा इतिहास

प्राचीन काळी अस्तित्वात असणारा ‘योग’

वैदिक काळापासून ‘योग’चा अभ्यास केलेला दिसून येतो. योगशास्त्रामध्ये योगासनांपेक्षा, योगामुद्रांपेक्षा सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी योगविद्येचा अभ्यास भारतीय परंपरेमध्ये केलेला आहे. ध्यानधारणा, स्व-अध्ययन, चित्तवृत्ती नियंत्रण, मनाची एकाग्रता, शारीरिक आणि मानसिक ऊर्जा यांच्यावरती योगशास्त्रामध्ये विशेषत्वाने लक्ष दिलेले आहे. आपल्या श्वासोच्छवासाच्या गतीपासून आसनांपर्यंत योगशास्त्र विचार करते. योगशास्त्राच्या मते, शिवशंकर हे प्रथम योगी होते. केवळ शारीरिक आसनांच्या पलीकडे जाऊन आत्मविकास, ‘मी’ म्हणजे कोण आहे, शाश्वत आनंद म्हणजे काय याचा शोध घेतला. पूर्वजन्म, पूर्वजन्माचे मनावर असणारे परिणाम, मनाची दंद्वात्मकता, मन अस्थिर करणाऱ्या गोष्टींचा निरोध कसा करावा, या सर्वाचा सूक्ष्म विचार भारतीय योगदर्शनाने केला आहे.

हेही वाचा : विश्लेषण : प्राचीन काळी पृथ्वीवर १९ तासांचा दिवस होता ? काय सांगते नवीन संशोधन

आजच्या ‘योगा’चे स्वरूप

वैदिक साहित्य, नंतर महर्षी पतंजलीच्या योगदर्शनानंतर ‘हठयोगा’चा उदय झाला. योगशास्त्राचा अधिक प्रसार हा १८९३ च्या शिकागो वर्ल्ड फेअरमध्ये स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानांमुळे झाला. या व्याख्यानामुळे उत्तर अमेरिकेत ‘योग’ विषयाबाबत अधिक जिज्ञासा निर्माण झाली. या काळात युरोप आणि उत्तर अमेरिकेतून शारीरिक व्यायामांचा प्रभाव जगावर पडू लागला. लोकांना ‘अँशंट’ गोष्टींबाबत उत्सुकता वाटू लागली. योगशास्त्रातील ‘आसन’ आणि ‘प्राणायाम’ यांना अधिक महत्त्व देण्यात आले. ‘जिम्नॅशियम’च्या प्रभावामुळे लोकांना शारीरिक व्यायाम, हालचाली, क्रिया ‘फीटनेस’साठी महत्त्वाच्या वाटू लागल्या.
१९१८ मध्ये योगाभ्यासक श्री योगेंद्र यांनी ‘द योगा इन्स्टिट्यूट ऑफ मुंबई’ याची स्थापना केली. त्यांना ‘आधुनिक योग पुनर्जागरणाचे जनक’ म्हटले जाते. त्यांनी आसनआधारित योगची शिकावं जगाला दिली. १९२४ मध्ये कृष्णमाचार्य यांनी म्हैसूरमध्ये प्रथम हठयोग अभ्यास शाळा स्थापन केली. बी .के.एस. अय्यंगार, टी.के.व्ही देशिकाचार, इंद्रा देवी आणि पट्टाभी जोइस यांनी योगचा भारतभर प्रसार केला.योगक्रियांचे संपूर्ण निरीक्षण केले असता असे लक्षात येते की, मूळ योग हा ज्ञानकेंद्रित आहे आणि सध्याचे योगाचे स्वरूप हे शरीरक्रिया केंद्रित आहे.

सध्या अनेक योगवर्गांमध्ये योगतत्त्वज्ञानापेक्षा आसनांना महत्त्व दिले जाते. प्राणायाम आणि आसन एवढ्यापुरताच ‘योगा’ मर्यादित आहे. परंतु, ‘हेही नसे थोडके’ म्हणून या प्रशिक्षण वर्गांना महत्त्व आहे. आज योग विषयांमध्ये अनेक नवीन संशोधन होत आहे. नवीन अभ्यासक्रम निर्माण होत आहेत. योगशास्त्राचे दैनंदिन जीवनात उपयोजन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ही सकारात्मक बाजू आहे. आज योग म्हटले की, संपूर्ण विश्वात भारताचे नाव ठळकपणे घेतले जाते. योगदिनानिमित्त आज अनेक ठिकाणी योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली. परंतु, आसनांसह योगतत्त्वज्ञानाचाही विचार होणे तेवढेच आवश्यक आहे. अन्यथा योग दिन हा योगासन दिन होईल.