जगातील असंख्य क्रीडारसिकांना जोडणारा धागा म्हणजे फुटबॉल.. दर चार वर्षांनी होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेच्या निमित्ताने विविध देशांतील फुटबॉलप्रेमी आपापल्या संस्कृतीचे आदानप्रदान करताना पाहायला मिळतात.. पुढील आठवडय़ापासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेच्या निमित्ताने रशियातही असेच चित्र दिसत आहे. विविध संस्कृतीचे चाहते जगातील सुंदर खेळाचा आस्वाद लुटण्यासाठी रशियातील विविध शहरांमध्ये दाखल झाली आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या स्पध्रेत अमेरिकेचा संघ पात्र ठरला नसला तरी त्यांची विश्वचषकांच्या तिकीटांची मागणी सर्वाधिक असल्याचे जाणवत आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) जाहीर केलेल्या तिकीट विक्रीच्या आकडेवारीत यजमान रशियापाठोपाठ सर्वाधिक तिकीटांची खरेदी ही अमेरिकेतून झाली असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे संघ खेळत नसूनही अमेरिकेच्या चाहत्यांचे फुटबॉल प्रेम प्रकर्षांने जाणवत आहे.

फिफाने सप्टेंबर २०१७ पासून ते आत्तापर्यंत २४ लाख ३ हजार ११६ तिकीटांची विक्री करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यजमान रशियापाठोपाठ अमेरिकेतून तिकिटांचा अधिक मागणी असल्याचे निदर्शनास आले आहे. यजमान देशातील ८ लाख ७१ हजार ७९७ लोकांनी, तर अमेरिकेतील ८८ हजार ८२५ लोकांनी तिकीट खरेदी केली आहेत. या निमित्ताने रशियामध्ये विविध भाषांचे आणि संस्कृतीचे लोक दाखल होणार आहेत. त्यांच्या पायाभूत सुविधेसाठी रशियाने जवळपास एक कोटी ३० लाख अमेरिकन डॉलर इतका खर्च केला आहे. सहा शहरांमधील विमानतळावर नवीन टर्मिनल बनवण्यात आले असून २१ नवीन हॉटेल्सचीही उभारणी करण्यात आली आहे. त्याशिवाय प्रेक्षकांना तिकिटावर सरकारी वाहतूक सेवेतून मोफत प्रवासाचीही मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी ७०० अतिरिक्त लोकल सोडण्यात येणार आहेत.

जगभरातून तिकीटांसाठी होत असलेल्या मागणीची संख्या लक्षात घेता अव्वल दहा देशांमध्ये ब्राझील (७२,५१२), कोलंबिया (६५,२३४), जर्मनी (६२,५४१), मेक्सिको (६०,३०२), अर्जेटिना (५४,०३१), पेरू (४३, ५८३), चीन (४०,२५१), ऑस्ट्रेलिया (३६,३५९) आणि इंग्लंड (३२, ३६२) यांचा क्रमांक येतो. जवळपास ५४ टक्के तिकिटांची विक्री यजमान देशाबाहेर झाली आहे आणि १५ जुलैपर्यंत त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

विश्वचषकाची रणमैदाने – व्होल्गोग्रॅड स्टेडियम, व्होल्गोग्रॅड

विश्वचषक स्पर्धेसाठी जागतिक दर्जाचे स्टेडियम असावे, या दृष्टीनेच येथील सेंट्रल स्टेडियमच्या जागी हे स्टेडियम बांधण्यात आले. रशियाच्या दक्षिण बाजूला व्होल्गोग्रॅड शहराच्या मध्यभागी हे स्टेडियम आहे. २०१४मध्ये पूर्वीचे स्टेडियम पूर्णपणे पाडून टाकण्यात आले व २०१५मध्ये नव्या स्टेडियमच्या बांधकामाला सुरुवात झाली. लोखंडी जाळीचा उपयोग छप्पर व बाजूच्या भिंतींकरिता करण्यात आला असून, हे स्टेडियम वास्तुकलेचा उत्तम नमुना मानला जातो. अनेक पर्यटक हे स्टेडियम पाहण्यासाठी गर्दी करीत असतात. विश्वचषक स्पर्धेनंतर रोटोर व्होल्गाग्रॅण्ड क्लबसाठी हे घरचे मैदान असणार आहे.

  • आसन क्षमता : ४५ हजार
  • सामने : टय़ुनिशिया वि. इंग्लंड, नायजेरिया वि. आइसलॅण्ड, सौदी अरेबिया वि. इजिप्त, जपान वि. पोलंड.