|| धनंजय रिसोडकर

महाभारतात उल्लेख नाही असे जगात काही घडलेच नाही आणि घडणारही नाही, असे म्हटले जाते. या विधानातील दावा हा अवास्तव आहे हे निश्चित. मात्र पुराणातल्या किंवा महाभारतातल्या कथा या केवळ कथा म्हणून जरी त्यांच्याकडे बघितले तरी त्यात कुठे, ना कुठे आजच्या काळातल्या वास्तवाचा तथ्यांश आढळतो. पुराणातील वांग्यांमध्येही आजच्या काळातील बी.टी.वांग्याचे साम्य किंवा अंश दिसतोच. आता अश्वत्थामा या महाभारतातील द्रोणाचार्य पुत्राचा आणि बेल्जियमचा संबंध काय? असा सवाल सहजपणे मनात येतो. अश्वत्थाम्याच्या बालपणातील एका गोष्टीचा महाभारतात उल्लेख आहे. तो लहान असताना घरच्या गरिबीमुळे त्याला पुरेसे दूधसुद्धा देणे त्याच्या आई-वडिलांना शक्य होत नसे. मग त्याची आई घरातील पिठात पाणी कालवून त्याचा पांढरा रंग दाखवत लहानग्या अश्वत्थाम्याला दूध पाजत असे. गोष्ट तीच पण थोडय़ाशा बदलाने घडली. ती पण भारतात नाही बेल्जियममध्ये.

प्रचंड गरिबीने गांजलेल्या घरात जन्माला आलेल्या बेल्जियमचा भरवशाचा आक्रमक रोमेलू लुकाकूला त्याची आई नाश्ता आणि दोन्ही जेवण म्हणून केवळ दूध आणि पावच देत असे. पाच-सहा वर्षांपर्यंत गरिबी किंवा तत्सम बाबी कळतच नसल्याने तोदेखील आनंदात हसत-खेळत जगत होता. एके दिवशी आईकडे दूध मागायला गेला तर ती त्या दुधाच्या बाटलीमध्ये काहीतरी टाकत असल्याचे त्याला दिसले. त्या क्षणी त्या अबोध बालकाला आपल्या परिस्थितीचा उलगडा होण्यास प्रारंभ झाला. त्याने पुन्हा दूध पाव खाल्ला आणि तो फुटबॉल खेळायला गेला. वर्षभरानंतर थोडेसे मोठे झाल्यावर त्याला कळले की आई आपल्या घरातील दुधाच्या बाटलीत थोडेसेच दूध आणून त्यात पाणी मिसळते. मग ते दूध सर्व भावंडांना पावाबरोबर खायला देते. अश्वत्थामा आणि रोमेलू यांच्या कथेत साम्य जाणवते. त्या दिवशी रोमेलूने स्वत:च्या मनाशी आणि देवाशी एक निर्धार केला. अन् त्यानंतरचा त्याचा प्रवास आपले डोळे दीपवून टाकतो.

प्रत्येक आठवडा कसा ढकलायचा, हा यक्षप्रश्न बनून गेलेल्या घरात रोमेलू वाढत होता. सहाव्या वर्षांपर्यंत वास्तवाचे चटके बसू लागलेल्या रोमेलूला एके दिवशी त्याची आई हताश होऊन टेबलावर डोके ठेवून रडत असल्याचे दिसले. परिस्थितीच्या चटक्यांनी अकाली प्रौढ झालेल्या रोमेलूने त्याच्या आईला धीर दिला. ‘‘रडू नकोस, अश्रू पूस. कारण ही परिस्थिती काही फार दिवस राहणार नाही. मी लवकरात लवकर एक मोठा फुटबॉल खेळाडू बनेन आणि आपले दिवस पालटतील,’’ असे तो आत्मविश्वासाने म्हणाला. त्यानंतर मात्र रोमेलूने ध्यास घेतला तो फक्त आणि फक्त फुटबॉलचा. कारण तोच त्याचे आयुष्य बदलवून टाकू शकतो, असा त्याला विश्वास वाटतो. त्याला दयनीय अवस्थेतून स्वत:ला आणि आपल्या आईला बाहेर काढायचे होते. त्यामुळे तो जीव तोडून मेहनत करू लागला. रुपेल बुम आणि लिअसेकडून काही सामने खेळल्यानंतर वयाच्या १६व्या वर्षी त्याने अंदेरलेश्त या छोटय़ा स्थानिक क्लबमध्ये प्रवेश केला. तिथे अधिकाधिक चांगल्या कामगिरीची नोंद केल्याने त्याला चेल्सी आणि एव्हर्टन क्लबचे दरवाजे खुले झाले. २०१० साली तो त्याच्या बेल्जियमसाठी पहिला सामना खेळला. तेव्हापासून विश्वचषकात अभूतपूर्व कामगिरी नोंदवायची खूणगाठ त्याने मनाशी बांधली होती. देशासाठी खेळताना त्याने आतापर्यंत केलेली ४० गोलची नोंद त्याला देशातला सर्वाधिक यशस्वी आक्रमक ठरवण्यास पुरेशी ठरते. आता तो नियमितपणे मॅँचेस्टर युनायटेड क्लबचा आणि अर्थातच त्याच्या बेल्जियम देशाचा सर्वाधिक मौल्यवान खेळाडू बनला आहे. एका अतिसामान्य घरातून केवळ जिद्दीच्या बळावर असामान्य बनलेल्या रोमेलूचा प्रवास खरोखरच नेत्रदीपक ठरला आहे. अडथळ्यांवर मात करण्याची ही वृत्ती आणि जिद्दच त्याला त्याचे मोठेपण सिद्ध करण्यास पुरेशी ठरली. ही विजिगीषू वृत्ती गोरगरिबांच्या घरांमध्ये अशीच चिरंजीवी आहे.

प्रशिक्षकाशी लावली पैज

अंदेरलेश्तच्या क्लबमध्ये रोमेलूला बऱ्याच वेळा अतिरिक्त खेळाडू म्हणून केवळ बाकडय़ावर बसावे लागायचे. एके दिवशी तो प्रशिक्षकाला म्हणाला की, ‘‘मी वर्षभरात आपल्या क्लबकडून २५पेक्षा जास्त गोल केले तर..?’’ प्रशिक्षक म्हणाला, ‘‘शक्यच नाही, लाव पैज.’’ त्याने पैज लावली आणि नोव्हेंबपर्यंतच २५ पेक्षा अधिक गोल करून संघाला सामने जिंकून दिले आणि तेव्हापासून तो संघाचा मुख्य आक्रमक म्हणून नावारूपास आला.

dhanjayrisodkar@gmail.com