Viral Video : विश्वविख्यात पेले, रोनाल्डो, गॅरिंचा आदी मातब्बर फुटबॉलपटूंचा वारसा लाभलेला संघ म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते. पाच वेळा जगज्जेतेपदावर आपले नाव कोरणारा ब्राझील हा यंदाच्या विश्वचषकाचा दावेदार मानला जात होता. मात्र त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. बलाढय ब्राझीलवर बेल्जियमने २-१ गोल फरकाने मात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्पर्धेनंतर ज्यावेळी ब्राझीलचा संघ मायदेशी परतला, तेव्हा चाहत्यांनी त्यांच्या बसवर अंडी आणि दगडफेक केली, असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला होता. या व्हिडिओनुसार चाहत्यांनी संघाचे खेळाडू ज्या बसमध्ये होते, त्या बसवर दगड आणि अंडी फेकून आपला राग व्यक्त केला आणि बस अडवून धरली. काही काळाने जेव्हा बस जागेवरून पुढे जाऊ लागली, त्यानंतरही चाहत्यांनी दगड आणि अंडी फेकणे सुरूच ठेवले, असे दिसत होते. इतकेच नव्हे तर त्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला, असेही त्या व्हिडिओत दिसत होते. ‘कावोवो स्पोर्ट्स’ या व्हेरीफाईड ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विट करून त्याखाली तशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला होता.

हा पहा तो व्हिडीओ

मात्र या व्हायरल व्हिडीओ मागील सत्य काही औरच असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ युट्युब आणि फेसबुकवर २७ मार्च २०१८ रोजीच अपलोड करण्यात आला होता. त्यावेळी स्पर्धा सुरूदेखील झालेली नव्हती. त्यामुळे ब्राझिल फुटबॉल संघ आणि या व्हिडिओचा काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे. पोर्तुगीज वेबसाईट ‘नोटीसीअस आग्रिकोलास’ यांनी या संबंधी आणखी १ व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यात त्या व्हिडिओची सत्यता समोर येत आहे.

ब्राझीलच्या दक्षिण भागातील पराना येथील हा व्हिडीओ असून ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष लुला यांनी निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी जाहीर केल्याने त्यांच्याविरोधात हा निषेध करण्यात आला आहे. लुला हे त्या बसमध्ये नव्हते. मात्र ही बस त्यांच्या ताफ्यातील असल्याचे समजून रस्त्यावर काही आंदोलक नागिरकानी अंडी आणि दगडफेक केली असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

पोर्तुगीज वेबसाईटने पोस्ट केलेला हा व्हिडीओ

दरम्यान, चाहत्यांनी ब्राझील संघाचे मायदेशी विनम्र पद्धतीने स्वागत केले असल्याचेही एका प्रसिद्ध प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तातून स्पष्ट होत आहे.

मराठीतील सर्व फिफा २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2018 brazil football team viral video is fake
First published on: 16-07-2018 at 04:54 IST