ब्राझीलसमोर मेक्सिकोचे तगडे आव्हान

सेंट पीटर्सबर्ग : इतिहास आणि मागील विश्वचषकांमधील आकडेवारी ही मेक्सिकोसाठी प्रतिकूल असली तरी पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलला नमवून नवीन इतिहास घडवण्याची ताकद त्यांच्या संघात निश्चित आहे. त्यामुळे बाद फेरीत नेयमारच्या ब्राझीलला मेक्सिकोचे तगडे आव्हान परतवून लावण्यासाठी दमदार खेळ करावा लागेल.

सलग सातव्या विश्वचषकात मेक्सिकोचा संघ बाद फेरीत पोहोचला आहे. मात्र गेल्या सहा विश्वचषकांमध्ये त्यापुढे त्यांना मजल मारता आली नव्हती; परंतु पहिल्याच सामन्यात गतविजेत्या जर्मनीला धूळ चारणाऱ्या मेक्सिकोच्या या संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्यामुळे त्यांना पराभूत करणे ब्राझीलसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. यापूर्वीच्या विश्वचषकांमध्ये बाद फेरीतून पुढे जाण्याची संधी मेक्सिकोच्या हातून अगदी लहानशा फरकांतून निसटल्या आहेत. त्यातदेखील २०१४च्या विश्वचषकात अगदी अखेरच्या क्षणी हॉलंडचा आक्रमक अर्जेन रॉबेनला भरपाई वेळेत पाडल्याबद्दलची वादग्रस्त पेनल्टीची चूक तर त्यांच्या खूपच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे तशी चूक या विश्वचषकात घडू न देण्याचेच आव्हान मेक्सिकोच्या संघापुढे आहे.

विशेषत्वे नेमारच्या बाबतीत तसा चुकीचा- फाऊलचा कोणताही निर्णय पंचांनी घेऊ नये, अशी मेक्सिकोची मागणी आहे. त्यासाठी व्हिडीओ साहाय्यक पंच (व्हीएआर) तंत्रज्ञानाचा पंचांनी योग्य प्रकारे उपयोग करण्याचे आवाहनदेखील मेक्सिकोतर्फे करण्यात आले आहे. जर्मनी आणि दक्षिण कोरियावर मात करूनदेखील स्वीडनकडून पराभूत झाल्याने गटात द्वितीय स्थान मिळालेल्या मेक्सिकोच्या संघाचा आक्रमण आणि बचावदेखील भक्कम आहे. प्रत्येक सामन्यात ते प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरले आहेत.

‘‘आम्ही सामना जिंकण्यासाठीच खेळणार आहोत,’’ असे मेक्सिकोचे प्रशिक्षक ज्युआन कार्लोस ओसोरिओ यांनी म्हटले आहे. तसेच त्यांचा कर्णधार आंद्रेस गुआरडाडो म्हणतो, ‘‘आम्ही विश्वचषकातील हा सामना जिंकून एक नवीन इतिहास रचू इच्छित आहोत. आपणच इतिहास रचणे आणि त्यात योगदान देणे यापेक्षा चांगली स्मृती कोणतीच नसते. पाच वेळच्या विश्वविजेत्याशी झुंजायची संधी विश्वचषकात नेहमीच मिळत नसते. त्यामुळे खेळाडूंना यापेक्षा अजून कोणत्याही वेगळ्या प्रेरणेची गरज नाही.’’

पाच वेळचे विश्वविजेतेपद, नेयमार आणि कोऊटिन्हो यांच्यासारखे नामवंत आक्रमक खेळाडू असूनदेखील ब्राझीलसाठी हा सामना म्हणजे अग्निपरीक्षा ठरणार आहे. मेक्सिकोच्या हिर्विग लोझानोने केलेल्या एका गोलने जर्मनीचे कंबरडे मोडले. ते इतके खचले की बाद फेरीसही पात्र होऊ शकले नसल्याने त्या मेक्सिकोच्या आक्रमणाचा सामना करणे ब्राझीलसमोरील मोठे आव्हान आहे. ब्राझीलचा बचावपटू डॅनीलो आणि डग्लस कोस्टा हे दुखापतीमधून सावरून सोमवारच्या सामन्यात संघात परतण्याची शक्यता असून त्यांच्या अनुभवाचा फायदा ब्राझीलला मिळू शकतो.

उपउपांत्यपूर्व फेरी

सामना क्र.  ५३

ब्राझील वि. मेक्सिको

स्थळ : सेंट पीटर्सबर्ग स्टेडियम

वेळ : सायं. ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी टेन २, सोनी टेन ३, सोनी इएसपीएन

तुम्हाला हे माहीत आहे?

* ब्राझीलने १९५० सालच्या पहिल्या विश्वचषक लढतीत मेक्सिकोला ४-० असे मोठय़ा फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर तीन वेळा पराभूत झाल्यानंतर २०१४ मध्ये मेक्सिकोने ब्राझीलला बरोबरीत रोखले होते. केवळ २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मेक्सिकोने ब्राझीलला झटका दिला होता; परंतु त्याची पुनरावृत्ती विश्वचषकात करणे त्यांना जमलेले नाही.

* विश्वचषकात ब्राझीलचा संघ १४ वेळा बाद फेरीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला असून त्यात पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे.

* दोन्ही संघ विश्वचषकात पाचव्यांदा आमनेसामने येत आहेत. आतापर्यंतच्या एकाही सामन्यात मेक्सिकोला गोल नोंदवता आलेला नाही. मात्र ब्राझीलने मेक्सिकोवर तब्बल ११ गोल केले आहेत.

* मेक्सिकोच्या संघाला बाद फेरीत इक्वेडोरचा अपवाद वगळता अन्य एकाही अमेरिका खंडीय संघाला पराभूत करता आलेले नाही.

संभाव्य संघ

ब्राझील : अ‍ॅलिसन, फॅगनेर, थिआगो सिल्व्हा, फेलिपे लुइस, मिरांडा, कॅसेमिरो, पाओलिन्हो, फर्नान्डीन्हो, फिलिपे कोऊटिन्हो, गॅब्रिएल जीसस आणि नेयमार

मेक्सिको : गुइलेरमो ओचोआ, मिगुल लायुन, ह्युगो अयाला, कार्लोस सॅलसेडो, जीसस गेलाडरे, हेक्टर हेरेरा, जोनाथन डॉस सॅँटॉस, आंद्रेस गुआरडाडो, कार्लोस वेला, जॅविएर हेरनॅँडेझ आणि हिर्विग लोझानो