News Flash

FIFA World Cup 2018 : हे ‘टॉप १०’ सामने चुकवू नका…

यंदाच्या स्पर्धेत काही सामने हे अतिशय रोमांचक होतील, यात वाद नाही. त्यापैकी 'हे' टॉप १० सामने फुटबॉलप्रेमींनी अजिबात चुकवू नयेत.

१४ जूनपासून रंगणार फुटबॉलचा थरार

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा एका दिवसावर आली असताना स्पर्धेच्या विजेतेपदासाठी अनेक प्रबळ दावेदार दिसू लागले आहेत. सर्वच संघ आपल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करताना दिसतील यात शंका नाही. कोणताही खेळाचा निकाल हा अंतिम क्षणापर्यंत ठरत नाही. गतविजेत्या जर्मनीबरोबरच ब्राझील, स्पेन, अर्जेटिना, फ्रान्स, उरुग्वे, बेल्जीयम या क्रमवारीतील पहिल्या १५ स्नघांकडे स्पर्धेत विशेष लक्ष राहणार आहे. गेल्या विश्वचषकापासून ते आतापर्यंत फुटबॉल क्षेत्रात खेळल्या गेलेल्या संघाचा अभ्यास करता यंदाच्या स्पर्धेत काही सामने हे अतिशय रोमांचक होतील, यात वाद नाही. त्यापैकी ‘हे’ टॉप १० सामने फुटबॉलप्रेमींनी अजिबात चुकवू नयेत.

१. रशिया वि. इजिप्त, १९ जून (रात्री ११.३०वा.)

यजमान रशियाला साखळी फेरीचा अडथळा पार करायचा असेल, तर त्यांना इजिप्तचे कडवे आव्हान परतवावे लागेल. २८ वर्षांनंतर इजिप्त विश्वचषक स्पर्धेत खेळणार असला तरी त्यांची तयारी जोरदार आहे आणि रशियाला नमवल्यास त्यांचा बाद फेरीचा मार्ग सुकर होईल, याची त्यांना खात्री आहे.

२. अर्जेटिना वि. नायजेरिया, २६ जून (रात्री ११.३० वा.)

अर्जेंटिना आणि नायजेरिया हि लढत कायमच चुरशीची होते. हे दोन संघ या स्पर्धेतही समोरासमोर येणार आहेत. २०१४ मध्ये ‘फ’ गटात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्यावेळी अर्जेटिनाला (३-२) विजयासाठी नायजेरियाने चांगलेच झुंजवले होते. त्या लढतीत लिओनेल मेस्सी वि. मुसा या चुरशीने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

३. पोर्तुगाल वि. स्पेन, १५ जून (रात्री ११.३० वा.)

‘ब’ गटातील सर्वाधिक उत्कंठा असलेला सामना म्हणून या लढतीकडे पाहिले जात आहे. माजी विजेत्या स्पेनच्या संघात अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. तर ख्रिस्तियानो रोनाल्डो हा हुकमी एक्का पोर्तुगालकडे आहे. त्यामुळे गटात अव्वल स्थान निश्चित करण्यासाठी ही लढत महत्त्वाची ठरणार आहे.

४. मेक्सिको वि. स्वीडन, २७ जून (सायं. ७.३० वा.)

‘फ’ गटातून दुसऱ्या स्थानासाठी ही लढत महत्त्वाची ठरणार आहे. १२ वर्षांनंतर स्वीडन प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. साखळी फेरीचा अडथळा पार करण्याचा त्यांचा निर्धार आहे. मेक्सिकोने २०१४मध्ये उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंतच्या प्रवासात धक्कादायक निकाल नोंदवले होते. त्यामुळे त्यांना कमी लेखणे चुकीचे ठरेल.

५. इजिप्त वि. उरुग्वे, १५ जून (संध्याकाळी ५.३० वा.)

मोहम्मद सलाह विरुद्ध लुई सुआरेझ.. असंच काहीसं वर्णन या सामन्याचं करावं लागेल. जगातले सध्याचे दोन दिग्गज खेळाडू आपलं सर्वस्व पणाला लावून या सामन्यात खेळताना दिसतील. बाद फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघ हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसतील. आजवर हे दोन्ही संघ विश्वचषकात केवळ एकदाच आमनेसामने आले असून या सामन्यात उरुग्वेने २-० असा विजय मिळवला होता.

६. अर्जेन्टिना वि. आईसलँड, १६ जून (संध्याकाळी ६.३० वा.)

लिओनल मेस्सीचा अर्जेन्टिनाचा संघ हा यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असला तरी त्यांच्यासमोरील वाट म्हणावी तितकी सोपी नाही. कारण पहिल्याच सामन्यात त्यांना आईसलँडचे आव्हान असेल. जवळपास साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या आईसलँड या छोट्याश्या देशानं विश्वचषकाचं तिकीट मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. इतकच नाही तर २०१६च्या युरो चषकात त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. त्यामुळे अर्जेंटिना आणि आईसलँडमधला हा सामना नक्कीच रोमांचक होईल, यात काही शंका नाही.

७. जर्मनी वि. मेक्सिको, १७ जून (रात्री ८.३० वा.)

गतविजेत्या जर्मनीसमोर आपल्या सलामीच्या सामन्यातच मेक्सिकोचे कडवे आव्हान असेल. गेल्या अनेक वर्षांपासून मेक्सिकोने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. जर्मनी आणि मेक्सिकोमधील सामना जिंकणाऱ्या संघाला ‘फ’ गटात अव्वल स्थान मिळवण्यासाठी नक्कीच फायदा होईल.

८. पोलंड वि. कोलंबिया, २४ जून (रात्री ११.३० वा.)

फुटबॉलचे तुम्ही ‘डाय हार्ड’ फॅन असाल, तर पोलंड आणि कोलंबिया संघांमधला सामना तुम्ही नक्कीच चुकवणार नाही. पोलंडच्या रॉबर्ट लेवान्डोवस्की आणि कोलंबियाच्या हामेस रॉड्रिगेज या बायर्न म्युनिककडून खेळणाऱ्या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये हा सामना अधिक रंगेल. लेवान्डोवस्कीनं विश्वचषक पात्रता फेरीत सर्वाधिक १६ गोल झळकावले. तर रॉड्रिगेजने कोलंबियासाठी सर्वाधिक सहा गोल केले आहेत.

९. इंग्लंड वि. बेल्जियम, २८ जून (रात्री ११.३० वा.)

इंग्लंड विरुद्ध बेल्जियम हा यंदाच्या विश्वचषकातला साखळी फेरीतील सर्वात मोठा सामना असणार आहे. हॅरी केन, इडन हजार्ड, रहिम स्टर्लिंग, केविन ड्यू ब्रुएना, रोमेलू लुकाकू डेली अली यासारखे दिग्गज खेळाडू आपल्याला या सामन्यात खेळताना दिसतील.

१०. जर्मनी वि. स्वीडन, २३ जून, (रात्री ११.३० वा.)

जर्मनीसमोर विश्वचषकातील आपल्या दुसऱ्या सामन्यात स्वीडनचे आव्हान असणार आहे. कारण स्वीडनने विश्वचषकाच्या पात्रता फेरीत इटलीला हरवण्याचा पराक्रम गाजवला होता. त्या पराभवामुळे इटली यंदाच्या विश्वचषकासाठी अपात्र ठरली. स्वीडनमध्ये बलाढ्य संघांना हरवण्याची ताकद आहे. त्यामुळे जर्मनी विरुद्ध स्वीडनमधला हा सामना तितकाच रोमांचक होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2018 11:47 am

Web Title: fifa world cup 2018 dont miss it top 10 matches
टॅग : Football
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : जगज्जेते यांच्यातूनच?
2 FIFA World Cup 2018 : दहशतवादी हल्ला, हुल्लडबाज प्रेक्षक यांचे विश्वचषकावर सावट
3 FIFA World Cup 2018 : सुवर्णयुगातील नसलो तरी आम्ही एकसंध -केन
Just Now!
X