FIFA World Cup 2018 Lionel Messi could retire from international football after the World Cup, Says Pablo Zabaleta: अर्जेंटिनाचा क्रोएशियाकडून अनपेक्षित आणि लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यातही संघाचा कर्णधार लायनेल मेसी टिकेचा धनी ठरत आहे. डिएगो मॅराडोनाप्रमाणे आपल्या देशाला विश्वचषक जिंकवून देण्याची ही मेसीकडे असलेली शेवटची संधी आहे असे बोलले जात आहे. मात्र सध्याची स्थिती पाहता एखादा चमत्कारच मेसीचे हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आवश्यक आहे. सध्याची स्थिती पाहता अर्जेंटिना अव्वल १६ फेरीत पोहचण्याआधीच स्पर्धेबाहेर पडेल. संघ अशाप्रकारे स्पर्धेबाहेर फेकला गेल्यास मेसी तडकाफडकी निवृत्ती जाहीर करेल अशी शक्यता मेसीचा माजी सहकारी पाबलो झाब्लेटाने व्यक्त केली आहे. त्याने बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये मेसी आणि अर्जेंटिनाची वर्ल्डकपमधील कामगिरी या विषयावर आपली मते व्यक्त केली.

पाबलो झाब्लेटा हा २०१४ साली विश्वचषक स्पर्धेत उपविजेते ठरलेल्या अर्जेंटिना संघात होता. ‘अर्जेंटिनाला विश्वचषक मिळवून देण्याची मेसीकडे ही शेवटची संधी आहे. ती हुकल्यास मला मेसीसाठी नक्कीच वाईट वाटेल’ असं झाब्लेटा म्हणला. मेरीच्या निवृत्तीबद्दल बोलताना झाब्लेटा पुढे म्हणतो, ‘पुढील वर्ल्डकपपर्यंत मेसी खेळत असेल याची शक्यता कमी वाटते. चार वर्षांनंतर कतारमध्ये वर्ल्डकप होणार आहे. चार वर्षांचा कालावधी हा फार दीर्घ आहे. या स्पर्धेतील मेसीची कामगिरी पाहता चाहत्यांमध्येही त्याच्याबद्दल बरीच नाराजी असल्याचे निरिक्षण झाब्लेटाने नोंदवले. मात्र मेसीसारख्या बड्या खेळाडूकडून अनेकदा चाहत्यांना जरा जास्तच अपेक्षा असतात असं म्हणत झाब्लेटने मेसीची बाजू घेतली.

अर्जेंटिनाच्या कामगिरीबद्दल संताप

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये झाब्लेटने अर्जेंटिना संघावर चांगलीच टिका केली. सध्या देशामध्ये संघाच्या कामगिरीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. संघाकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मागील वर्ल्डकपमध्ये जेतेपदाच्या इतक्या जवळ येऊन संघाने अंतिम सामन्यात कच खालली आणि जेतेपदाने हुलकावणी दिली. त्यानंतरही सलग दोन वेळ संघाचा कोपा अमेरिकन स्पर्धेत पराभव झाला. अर्जेंटिनामधील फुटबॉल चाहते कधीच असा पराभव सहन करणार नाहीत. मी याआधी अर्जेंटिना संघाला इतक्या वाईट प्रकारे खेळताना पाहिलेले नसल्याचे झाब्लेट म्हणाला.

क्लबसाठी खेळतात देशासाठी का नाही?

अर्जेंटिना संघातील अनेक बडे खेळाडू मोठ्या मोठ्या युरोपियन संघांसाठी खेळताना उत्तम खेळ करतात मग देशासाठी खेळतानाच ते इतकी वाईट कामगिरी कशी करु शकतात असा प्रश्नही झाब्लेटने उपस्थित केला. निकोलस ओटामेडी मॅचेस्टर युनायटेडकडून खेळताना एकही चुकीचा पास करत नाही. तर मार्कोस रोजो मॅचेंस्टरच्या अव्वल खेळाडूंपैकी एक असूनही त्याला महत्वाच्या समान्यात बसवले जाते हे खरचं विचित्र आहे असे मत झाब्लेटने व्यक्त केले.

मेसीची कारकीर्द

लायनेल मेसी रविवारी म्हणजेच २४ जून रोजी ३१ वर्षाचा होईल. २००१ सालापासून तो बार्सिलोना संघासाठी फॉरवर्ड पोझिशनला खेळतो. मागील १७ वर्षांत त्याने संघासाठी ३२ जेतेपदांच्या ट्रॉफी पटकावल्या आहेत. सध्याच्या घडीला जागतिक फुटबॉलमध्ये मेसी हा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो.

२००५ मध्ये मेसीला पहिल्यांदा राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी तो पहिल्यांदा वर्ल्डकप (२००६) स्पर्धेत अर्जेंटिना संघातून खेळला. तेव्हा वर्ल्डकप खेळणारा अर्जेंटिनाचा सर्वात तरुण फुटबॉलपटू ठरला होता.

बार्सिलोनाकडून खेळताना त्याने एकूण १३ जेतेपदांवर नाव कोरले आहे. यामध्ये चार चॅम्पियन्स लीग जेतेपदांबरोबरच ला लिगाच्या नऊ जेतेपदांचा समावेश आहे. क्लबकडून इतकी भन्नाट कामगिरी करताना मेसीला अर्जेंटिनासाठी एकही प्रतिष्ठेचं जेतेपद पटकावता आलेलं नाही हे विशेष.

आत्तापर्यंत अर्जेंटिनाने दोनदा वर्ल्डकप जिंकला आहे. मारियो केम्पसच्या नेतृत्वाखाली १९७८ साली आणि १९८६ दियागो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली. या दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या तुलनेने अधिक लोकप्रियता मिळालेल्या मेसीला राष्ट्रीय संघासाठी म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही.

कोपा अमेरिका स्पर्धेतही अर्जेंटिनाला गेल्या पंचवीस वर्षांत चार उपविजेतीपदांवर समाधान मानावे लागले आहे. मेसीच्या नेतृत्वाखाली २००७, २०१५ आणि २०१६ साली संघाला कोपा अमेरिकाच्या उपविजेतेपदापर्यंत मजल मारता आली.

२०१६ मध्ये मेसीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र महिनाभरानंतर आपला निर्णय मागे घेत त्याने २०१८ च्या वर्ल्डकप स्पर्धेत संघाचं नेतृत्व स्वीकारलं.