फुटबॉल हा एक सुंदर खेळ आहे असं म्हटलं जातं, परंतु जेव्हा एखाद्याच्या भावनांचा उद्रेक होतो तेव्हा याच सुंदर खेळाला भयानक रुप येतं. इजिप्त हा एक फुटबॉलवेडा देश आहे. मात्र हाच इजिप्त देश आता आपल्या कठीण काळातून जात आहे, आणि त्याचं कारण ठरलाय तो म्हणजे मोहम्मद सलाह अर्थातच ‘दी इजिप्शियन किंग’. 

मोहम्मद सलाहचा जन्म कैराच्या बाहेर असलेल्या ‘नागरिग’ गावात झाला. २०१० साली इजिप्तच्या अल मोकावलून क्लबकडून सलाहने आपल्या व्यावसायिक फुटबॉल कारकीर्दीला सुरुवात केली. त्याचवेळी त्याने इजिप्तचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिलं. वयाच्या १९ व्या वर्षी मोहम्मद सलाहला इजिप्तकडून खेळण्याची संधी मिळाली. पण याच दरम्यान इजिप्शियन फुटबॉलचा कठिण काळ सुरु झाला. त्यामुळे मोहम्मद सलाहची कारकीर्द सुरु होण्याआधीच संपते की काय असं वाटत होतं.

  • इजिप्त – एक फुटबॉलवेडा देश

जगभरातील फुटबॉलवेड्या देशांमध्ये चाहत्यांचे अनेक ग्रुप आहेत. युरोपमध्ये आपल्याला अधिकृत समर्थक, अल्ट्रास आणि हुलिगन असे तीन गट पाहायला मिळतील. अल्ट्रास आणि हुलिगन ग्रुपचे चाहते हे सामन्यादरम्यान आणि नंतरही उपद्रव माजवतात. इजिप्तमध्येही मोठ्या प्रमाणात अस्ट्रास आहेत. त्यात अलावी क्लबचे अल्ट्रास मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, राजकारणाने इजिप्तमधल्या सुंदर खेळाला कलंकित केले. त्याला कारण ठरले ते अलावी क्लबचे अल्ट्रास. अल्ट्रास ग्रुपच्या अनेक सदस्यांनी राजकीय निदर्शनात सहभाग घेतला होता. इतकंच नाही तर फेब्रुवारी 2012 साली अल मसरी आणि अल अहली संघांमधल्या सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये झालेल्या हाणामारीत 74 जणांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर इजिप्शियन सरकारने दोन वर्ष लीगचे सामने न खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोहम्मद सलाहची कारकीर्द सुरु होण्याआधीच संपते की काय असं वाटत होतं.

  • सलाहच्या कारकीर्दीला कलाटणी

मोहम्मद सलाहच्या कारकीर्दीला कलाटणी मिळाली ती एक मैत्रीपूर्ण सामन्यामुळं. स्वित्झर्लंडच्या बासेल क्लबने इजिप्तच्या 23 वर्षांखालील संघासोबत सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. त्या सामन्यात मोहम्मद सलाह इजिप्त प्रतिनिधित्व करत होता. या सामन्यातली दमदार कामगिरी पाहून बासेल क्लबने सलाहशी करार केला. त्यामुळं केवळ इजिप्तमध्ये खेळणाऱ्या सलाहला युरोपातही खेळण्याची संधी मिळाली. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सलाहने इजिप्तसाठी ग्रुप स्टेजच्या तिन्ही सामन्यांत गोल झळकावले होते. सलाहने बासेल क्लबकडून 47 सामन्यांमध्ये 9 गोल डागले. 2012 साली इंग्लंडच्या चेल्सी क्लबने सलाहला करारबद्ध करुन घेतलं. पण सलाहला चेल्सीकडून खेळण्याची आणि आपला ठसा उमठवण्याची फारशी संधी मिळालीच नाही. दोन मोसमात सलाहनं चेल्सीसाठी केवळ तेराच सामने खेळले. मग सलाहने इटलीच्या फिओरेन्टिना आणि रोमा असा प्रवास केला. 2015 साली सलाहला इटलीच्या ‘सीरी ए’ लीगमधला सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

  • दी इजिप्शियन किंग

22 जून 2017..ही तारिख मोहम्मद सलाह आपल्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. कारण याच दिवशी इंग्लंडच्या लिव्हरपूल संघानं सलाहशी करार केला. मोहम्मद सलाहनंही आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. गेल्या मोसमात लिव्हरपूलला एकही स्पर्धा जिंकता आली नसली तरी मोहम्मद सलाहनं आपल्या दमदार कामगिरीनं सर्वांचीच वाहवा मिळवली. सलाहनं गेल्या मोसमात 52 सामन्यांमध्ये तब्बल 44 गोल झळकावण्याचा पराक्रम गाजवला. तसेच लिव्हरपूलला युएफा चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरीही गाठून दिली. याच कामगिरीसाठी सलाहला गोल्डन बूट आणि पीएफए प्लेयर ऑफ दी ईयर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याचदरम्यान सलाहला लिव्हरपूलच्या चाहत्यांनी ‘दी इजिप्शियन किंग’ अशी उपाधी दिली.

  • राष्ट्रीय हीरो
मोहम्म्द सलाहने लिव्हरपूलसाठी जबरदस्त कामगिरी तर बजावली होतीच. पण आपल्या लढवय्या वृत्तीने देशाचीही मान त्याने उंचावली. 2018 फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीत सलाहने 5 गोल केले. यात कांगोविरुद्धच्या निर्णायक सामन्यात सलाहने अंतिम मिनिटाला पेनल्टी किकवर गोल झळकावून इजिप्तला 1990 नंतर पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाचं तिकीट मिळवून दिलं. या कामिगिरीमुळे सलाह इजिप्तचा राष्ट्रीय हीरो बनला. सलाहला आफ्रिकन प्लेयर ऑफ दी ईयर या पुरस्कारानेही गोरवण्यात आलं. मोहम्मद सलाहनं इजिप्सकडून 57 सामन्यांमध्ये 33 गोल डागले आहेत.
सलाहला दुखापत आणि चाहत्यांना धडकी – युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात सलाहला गंभीर दुखापत झाली. त्यामुळं इजिप्तसह जगभरातल्या त्याच्या चाहत्यांना धडकी भरली होती. सलाहच्या विश्वचषकात खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं होतं. पण जो हार मानेल तो मोहम्मद सलाह कसला?. आठवड्याभरातच मोहम्मद सलाह विश्वचषकात सहभागी होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पण मोहम्मद सलाह विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांनी मुकण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मोहम्मद सलाहने इजिप्तमधल्या फुटबॉलला नवा जन्म दिला आहे. त्यांच्या चाहत्यांना आशेचा किरण दाखवला आहे. आता हाच सलाह फिफा विश्वचषकात किंगमेकर ठरणार का याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.