विश्वचषक जिंकायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एखादा खेळाडू नव्हे, तर संपूर्ण संघ फॉर्मात असणे गरजेचे आहे. विजयाचे हे सूत्र उमगलेल्या अर्जेंटिनाने सर्वस्व पणाला लावून साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात नायजेरिया विरुद्ध २-१ असा विजय मिळवला. मात्र आता यापुढील वाटचाल आणखी खडतर असणार आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या फ्रान्स संघाशी त्यांची शनिवारी गाठ पडणार असून, या सामन्यात विजय मिळवून दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी अर्जेटिनाचा संघ सज्ज झालेला आहे. फुटबॉलचे निस्सीम चाहते असलेल्यांना यानिमित्ताने एक वेगळीच पर्वणी अनुभवायला मिळणार हे निश्चित.

विश्वातील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीकडून चाहत्यांच्या अनेक अपेक्षा आहेत. नायजेरियाविरुद्ध त्याने यंदाच्या विश्वचषकातील वैयक्तिक पहिला गोल करून सूर गवसल्याचेही संकेत दिले आहेत. क्रोएशियाकडून ०-३ असा पराभव पत्करल्यावर या संघाला खडबडून जाग आली. आक्रमणात प्रामुख्याने मेसीवरच अवलंबून असलेल्या अर्जेटिनाला गोन्झालो हिगुएन आणि सर्जिओ अग्युरो यांच्याकडूनही अपेक्षा आहेत. तसेच मागील लढतीत चमकलेला मार्कोस रोजोवरही चाहत्यांचे लक्ष आहे. प्रशिक्षक जॉर्ज सॅम्पोली यांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने ते संघाला कसे हाताळतात हे पाहणे रंजक ठरेल.

१९९८च्या विजेत्या फ्रान्स संघाची मुख्य मदार त्यांचे आक्रमणपटू पॉल पोग्बा, अँटोइन ग्रीझमन, ओलिव्हर जिरुड यांच्यावर आहे. फ्रान्सच्या बचावफळीने सुरेख कामगिरी करताना आतापर्यंत फक्त एकच गोल समोरच्या संघाला नोंदवू दिला आहे; पण तीन साखळी सामन्यांत त्यांना अवघे तीनच गोल करता आले आहेत. त्यामुळे पोग्बा आणि ग्रीझमन यांच्या अव्वल खेळाचे दर्शन अजून चाहत्यांना झालेले नाही. एकूणच या लढतीत ज्या संघाचे आक्रमक सरस खेळ करतील तोच संघ उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के करेल.

तुम्हाला हे माहीत आहे?

  • विश्वचषकाच्या बाद फेरीतील सामन्यांत तब्बल ६६६ मिनिटे खेळूनही मेसीने एकही गोल केलेला नाही.
  • आतापर्यंत पात्र ठरलेल्या १३ विश्वचषकांपैकी १२ वेळा बाद फेरी गाठण्यात अर्जेटिना यशस्वी झाली आहे. फक्त २००२च्या विश्वचषकात त्यांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते.
  • दक्षिण अमेरिकन संघाविरुद्ध मागील ७५७ मिनिटांमध्ये फ्रान्सने एकही गोल होऊ दिलेला नाही. विशेष म्हणजे अर्जेटिनानेच १९७८च्या विश्वचषकात त्यांच्याविरुद्ध शेवटचा गोल नोंदवला होता.
  • अर्जेटिना-फ्रान्स आतापर्यंत दोनदा विश्वचषकात एकमेकांसमोर आले असून, (१९३०, १९७८) दोन्ही सामन्यांत अर्जेटिनाने बाजी मारली आहे. तसेच या दोन्ही वेळेस अर्जेटिनाने अंतिम फेरी गाठली होती.