चार दिवसांनंतर रशियात होणाऱ्या विश्वचषकाचे सामने ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींचा ज्वर शिगेला पोहोचला असून तिकिटखरेदीसाठी मोठी चढाओढ सुरू आहे. त्यात भारतीय फुटबॉलशौकिनांनी आतापर्यंत तब्बल १७,९६२ तिकिटे खरेदी करून भारतातही फुटबॉलची लोकप्रियता कमालीची उंचावत असल्याचे दाखवून दिले आहे. जगभरातील ज्या देशांमधील फुटबॉलप्रेमींनी तिकिटे खरेदी केली आहेत, अशा आघाडीच्या २० देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॉस्कोमध्ये १४ जूनपासून प्रारंभ होत असलेल्या फिफा विश्वचषकात भारतीय संघ पात्र ठरलेला नसतानादेखील भारतीय फुटबॉलप्रेमींनी दाखवलेला हा उत्साह नक्कीच विशेष आहे. ‘फिफा’ने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय संघाचे जागतिक क्रमवारीतील स्थान ९७वे आहे. तरीदेखील भारतीय रसिकांच्या उत्साहात तसूभरही उणीव आलेली नाही. प्रत्येक फुटबॉलशौकिनाचे आपापले आवडते संघ असून, त्यानुसार तिकिटखरेदीतही भारतीयांनी वैविध्य जपले असल्याचे दिसून येत आहे.

तीन देशांची दीड लाख तिकिटे

अमेरिका, चीन आणि भारत हे तीन महाकाय देश फुटबॉल विश्वचषकाच्या या महासंग्रामातून बाहेर आहेत, तरी या तीन देशांमधील फुटबॉलप्रेमींनी खरेदी केलेल्या तिकिटांची संख्या एक लाख ४४ हजार ५५६ वर पोहोचली आहे. म्हणजे आपापले देश स्पर्धेत नसताना जवळपास दीड लाखांच्या आसपास तिकिटे खरेदी करणाऱ्या या तीन देशांचे संघ जर विश्वचषकात असते तर हा तिकिटखरेदीचा आकडा काही पटींमध्ये वाढला असता, असादेखील अंदाज वर्तवला जात आहे.

प्रारंभी भारताची आघाडी

गतवर्षी जेव्हा विश्वचषक तिकिटविक्रीस प्रारंभ झाला त्या वेळी विश्वचषकाचे केंद्र असलेल्या इंग्लंडपेक्षाही अधिक तिकिटे खरेदी करून भारत पहिल्या १०मध्ये पोहोचला होता, तर यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात अखेरची तिकिटविक्री झाली त्या वेळी भारतीयांनी एका दिवसात तब्बल १९०५ तिकिटांची खरेदी केली होती.

मराठीतील सर्व फिफा २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2018 fifa world cup
First published on: 11-06-2018 at 01:28 IST