|| प्रा. डॉ. अभिजीत वणिरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युरोपातील एक दर्जेदार व नावारूपाला आलेला संघ म्हणजे स्वीडन. येथील वातावरण फुटबॉलला अतिशय पोषक असून, नोंदणीकृत दोन लाख ४० हजार खेळाडू फुटबॉल खेळतात. त्यापकी एक लाख ८४ हजार पुरुष व ५६ हजार महिला खेळाडू आहेत. स्वीडनमध्ये जवळपास ३२०० क्लबचे ८५०० संघ असून ७९०० फुटबॉलची मदाने आहेत. माल्मोसारखा प्रसिद्ध क्लब हा स्वीडनचाच.

आत्तापर्यंत १२ वेळा हा संघ विश्वचषकात सहभागी झालेला असून एकूण ५० सामने खेळलेला आहे. विश्वचषकात हा संघ एक वेळा उपविजयी, दोन वेळा तृतीय व एक वेळा चतुर्थ आलेला आहे, तर या संघाने दोन वेळा उपांत्यपूर्व फेरीपर्यंत प्रवेश केलेला आहे. मात्र अद्याप स्वीडनला विश्वचषकाच्या विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. प्राथमिक फेरीतून उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल झाल्यानंतर स्वीडन संघाला अनेकांनी योगायोगाने व नशिबाने बाद फेरीत प्रवेश केलेला संघ म्हणून हिणवले. पण विश्वचषक स्पध्रेत स्थान मिळवणे, हीच मुळात एक कठीण गोष्ट असून त्यासाठी किती कठीण परीक्षांना सामोरे जावे लागते, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. चालू विश्वचषक स्पध्रेत एकूण ३२ संघ सहभागी झाले, त्यापकी रशिया हा यजमान देश असल्याने त्यांना स्पध्रेत सरळ प्रवेश मिळाला. पात्रता फेरीत २१० देश सहभागी झाले होते. या २१० देशांची उत्तर-मध्य अमेरिका व कॅरेबियन गट, अशिया गट, अफ्रिका गट, युरोप गट, ओशोनिया गट व दक्षिण अमेरिका गट या सहा विभागांत विभागणी केली गेली. सहा विभागांच्या पात्रता फेरीतील स्पर्धा १२ मार्च, २०१५ ते १५ नोव्हेंबर, २०१७ या कालावधीत पार पडल्या. यामध्ये एकूण ८७२ सामने झाले. यावेळच्या स्पध्रेचे वैशिष्टय़ म्हणजे विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच ‘फिफा’कडे नोंदणी झालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे २१० संघांनी पात्रता फेरीत सहभाग नोंदवला. म्यानमारसारखा संघ मागील विश्वचषक पात्रता स्पध्रेतील गरवर्तनाबद्दल घातलेल्या बंदीनंतर प्रथमच या स्पध्रेच्या पात्रता फेरीत सहभागी झाला होता. स्वीडनचा संघ युनियन ऑफ युरोपीयन फुटबॉल असोसिएशन (यूईएफए) या गटातून पात्र ठरला. पात्रता फेरीत या संघाने १२ सामने खेळले. यापकी सात सामने त्यांनी जिंकले. दोन सामने बरोबरीत सोडवले, तर तीन सामन्यांत ते पराभूत झाले. या गटात त्यांना माजी विश्वचषक विजेते हॉलंड, इटली, फ्रान्स या संघांबरोबर खेळावे लागले. यापकी त्यांनी फ्रान्सला दोन वेळा व इटलीला एक वेळा पराभूत केले. इतक्या कठीण परिस्थितीतून हा संघ विश्वचषक स्पध्रेला पात्र ठरलेला आहे. त्यामुळे उर्वरित विश्वचषक स्पध्रेत या संघाला कमी लेखण्याची चूक कोणीही करणार नाही.

शनिवारी उपांत्यपूर्व फेरीमध्ये स्वीडनचा सामना बलाढय़ इंग्लंडबरोबर होत आहे. या स्पध्रेत स्वीडनने दक्षिण कोरियाला १ गोलने, मेक्सिकोला ३ गोलने तर स्विर्झलडला १ गोलने पराभूत केले, तर पेरूबरोबर बरोबरी करून जर्मनीविरुद्ध मात्र या संघाला २-१ गोलने पराभूत व्हावे लागले. संघ कितीही चांगला असला तरी तो दिवस हा त्या संघाचा असणे आवश्यक असते. नशिबाची साथ नसेल तर स्पेनची रशिया विरुद्ध जी अवस्था झाली, तशी होऊ शकते. या स्पध्रेत मात्र स्वीडनला पुरेपूर नशिबाची साथ मिळालेली आहे. मेक्सिकोवरील विजयामुळे या संघाचा उत्साह द्विगुणित झालेला आहे. त्यांना चांगल्या प्रकारे विजयाची लय प्राप्त झालेली आहे.

स्वीडन संघाचा आज उपांत्यपूर्व फेरीतील सामना इंग्लंडशी होणार आहे. विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्यानंतर इंग्लंडने पहिल्या दोन सामन्यांमध्ये सफाईदारपणे विजय मिळवला. प्राथमिक फेरीतील अखेरच्या सामन्यात मात्र त्यांना बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला. उपउपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडने कोलंबियावर महत्प्रयासाने विजय मिळवला, पण तोही पेनल्टी शूटआऊटवर. म्हणूनच असे म्हणता येईल की, इंग्लंडच्या हॅरी केन, मार्कस रशफोर्ड व रहिम स्टर्लिग यांचे आक्रमण जर स्वीडनच्या बचावफळीने थोपवले तर हा संघसुद्धा विजय प्राप्त करू शकतो. मात्र स्वीडनच्या मार्कस् बर्ग व ओला टॉयव्होनेन यांना आक्रमक खेळ करून मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करावे लागेल. स्वित्र्झलडविरुद्धच्या सामन्यात स्वीडनचे हे खेळाडू दिशाहीन फटके मारताना दिसून आले. याची पुनरावृत्ती टाळणे, स्वीडनच्या हिताचे आहे. या सामन्यात दोन्ही संघांना दुखापतीची समस्या भेडसावणार आहे. स्वीडनचे अल्बिन एक्डल, जिमी डरमाज व सॅबास्टीन लार्सन हे खेळाडू तर इंग्लंडचे कायले वॉलकर, अ‍ॅश्ले यंग, बॅमिडेज अल्ली व जेमी वार्डे हे खेळाडू जखमी असल्याने सामना खेळू शकणार नाहीत. दोन्ही संघ विजेतेपदाच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहेत. त्यामुळे जिंकण्याच्या दृष्टीनेच खेळ करतील. त्यामुळे या सामन्यातसुद्धा एक चांगला मुकाबला पाहायला मिळेल, हीच अपेक्षा!

abhijitvanire@yahoo.com

मराठीतील सर्व फिफा २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2018
First published on: 07-07-2018 at 02:24 IST