वर्ल्डकपमधील सर्वात फेव्हरेट संघ असलेल्या ब्राझीलचा पराभव झाला आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या बलाढय ब्राझीलवर बेल्जियमने २-१ गोल फरकाने मात केली. आत उपांत्यफेरीत बेल्जियमचा सामना फ्रान्स विरुद्ध होणार आहे. २०१४ फुटबॉल वर्ल्डकपमधील पराभवाच्या कटू आठवणी पुसून उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या इराद्याने ब्राझीलचा संघ मैदानावर उतरला होता. पण बेल्जियमच्या दमदार कामगिरीसमोर ब्राझीलचा निभाव लागू शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या सत्रातच बेल्जियमच्या संघाने २-० अशी आघाडी घेतली होती. दोन गोल झाल्यानंतर ब्राझीलने जोरदार आक्रमण केले. ब्राझीलचे खेळाडू वारंवार बेल्जियमच्या गोल क्षेत्रात धडक देत होते. पण बेल्जियमच्या भक्कम बचावफळीने त्यांचे गोल करण्याचे सर्व प्रयत्न उधळून लावले. बेल्जियमने हा सामना जिंकला असला तरी चेंडूवर ५७ टक्के नियंत्रण ब्राझीलचे होते.

उपांत्यफेरी गाठण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या ब्राझीलच्या संघाला सुरुवातीलाच धक्का बसला. सामन्याच्या १३ व्या मिनिटाला ब्राझीलच्या फर्नांडीनोने स्वयंगोल केल्यामुळे बेल्जियमला १-० अशी आघाडी मिळाली. सेंट कम्पनीच्या कॉर्नर किकवरील चेंडू हेडरद्वारे गोलपोस्ट पासून दूर ढकलण्याच्या प्रयत्नात चेंडू फर्नांडीनोच्या खांद्याला लागून गोलपोस्टमध्ये जाऊन विसावला आणि बेल्जियमच्या खात्यात पहिल्या गोलची नोंद झाली. त्यानंतर ३१ मिनिटाला डी ब्रुयेनाने शानदार मैदानी गोल करत बेल्जियमला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर ब्राझीलने आक्रमणावर भर दिला पण त्यांना गोल करण्यात यश येत नव्हते. अखेर ७६ व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या रेनाटो ऑगस्टोने हेडरद्वारे शानदार गोल करत आघाडी कमी केली. त्यानंतर ब्राझीलने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. बेल्जियमला स्पर्धेतील डार्क हॉर्स म्हटले जात असून आज ब्राझीलवरील विजयातून त्यांनी हे सिद्ध करुन दाखवले. मागच्या वर्ल्डकपमध्ये उपांत्यफेरीत जर्मनीने ब्राझीलचा ७-१ असा दारुण पराभव केला होता. त्या कटू आठवणी पुसून ब्राझीलच्या खेळाडूंना देशवासियांना विजयाची भेट द्यायची होती. पण आता हे स्वप्न भंगले आहे.

मराठीतील सर्व फिफा २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2018 brazil vs belgium
First published on: 06-07-2018 at 23:57 IST