FIFA World Cup 2018 GER vs KOR : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या एफ गटाच्या सामन्यात गतविजेत्या जर्मनीच्या संघाला स्पर्धेतून बाहेर जावे लागले. बलाढ्य जर्मनीला कोरियाने २-० असे पराभूत करत स्पर्धेचा शेवट गोड केला. संपूर्ण सामन्याच्या नियमित वेळेत दोनही संघाला एकही गोल करता आला नाही. मात्र त्यानंतर देण्यात आलेल्या ६ मिनिटाच्या वेळेत कोरियाने २ गोल करत सामना जिंकला आणि जर्मनीला स्पर्धेबाहेर फेकले. विशेष म्हणजे कोरिया याआधीच स्पर्धेबाहेर फेकली गेली होती. त्यातच गतविजेत्यांनाही पराभूत करून कोरियाने स्पर्धेबाहेर फेकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजचा सामना जिंकणे हा जर्मनीसाठी अत्यावश्यक गोष्ट होती. त्या हेतूने जर्मनीचा संघ मैदानावर उतरला. पण कोरियाच्या संघाच्या बचाव फळीने त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले. त्यामुळे पूर्वार्धात कोरियाने जर्मनीला गोलशून्य बरोबरीत रोखले. उत्तरार्धात जर्मनीने पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. पण सामन्याच्या ९० मिनिटांच्या नियमित वेळेत जर्मनीला गोल करता आला नाही. त्यानंतर सामन्यात ६ मिनिटांचा भरपाई वेळ देण्यात आला. या वेळेत जर्मनी आक्रमण करणार, हे निश्चित होते. पण या आक्रमणाचा जर्मनीवर उलटा परिणाम झाला.

६ मिनिटाच्या अतिरिक्त वेळेत कीम यंग-ग्वानने दुसऱ्या मिनिटाला गोल केला आणि कोरियाला १-० ने आघाडी दिली. जर्मनीने या गोल विरुद्ध VAR मार्फत दाद मागितली, पण जर्मनीचे हे अपील फेटाळून लावण्यात आले. त्यानंतर जर्मनीने सामना जिंकण्याच्या आशा सोडून दिल्या. या दरम्यान कोरियाकडून ह्यूंग मीन याने शेवटच्या मिनिटाला गोल करत जर्मनीच्या जखमेवर मीठ चोळले आणि सामना २-०ने जिंकला.

जर्मनी प्रथमच साखळी फेरीत स्पर्धेबाहेर

कोरियाविरुद्धच्या पराभवामुळे जर्मनीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. स्पर्धेच्या साखळी फेरीतच जर्मनीला गाशा गुंडाळावा लागला. १९३८ साली जर्मनीला पहिल्या फेरीत स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते. पण त्यावेळी स्पर्धा ही गटनिहाय खेळली जात नसे.

Web Title: Fifa world cup 2018 ger vs kor korea beat germany out of tournament
First published on: 27-06-2018 at 21:33 IST