Fifa World Cup 2018 RUS vs RSA : फिफा विश्वचषक स्पर्धेला १४ जूनपासून सुरुवात झाली. यजमान रशियाने सलामीच्या सामन्यात सौदी अरेबियाला ५-० अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. या सामन्यात रशियाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले. सौदी अरेबिया संघ या सामन्यात थोडासा कमी पडणार याची साऱ्यांनाच कल्पना होती. त्याप्रमाणे रशियाने त्यांना पराभूत केले. पण या सामन्यात अनेक रंजक गोष्टी घडल्या. त्यापैकी टॉप ५ गोष्टी म्हणजे …

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. यजमान संघाचा सर्वात मोठा विजय

रशियाने ५-० असा त्यांचा पराभव केला. मॉस्कोच्या ल्यूजनिकी स्टेडियमवर हा सामना झाला. रशियाने ५ गोलच्या फरकाने हा सामना जिंकला. या बरोबरच यजमान संघाने सलामीच्या सामन्यात एवढ्या मोठ्या फरकाने सामना जिंकण्याची ही १९३४ नंतरची पहिलीच वेळ ठरली. या सामन्यात पहिला गोल ११व्या मिनिटाला झाला. तर त्यांनतर ठराविक अंतरानंतर उर्वरित चार गोल झाले. या विजयामुळे रशियाचा स्पर्धेतील आत्मविश्वास वाढला आहे.

२. क्रमवारीतील सर्वात खालच्या क्रमांकावरील दोन संघांमध्ये सामना

काल झालेला सामना हा अतिशय रोमांचक झाला. पण सौदी अरेबियाच्या दृष्टीने पाहता मात्र हा सामना थोडासा निराशाजनक झाला. या सामन्याच्या माध्यमातून प्रथमच खालच्या क्रमांकावरील दोन संघाच्या सामन्याने स्पर्धेची सुरूवात झाली. या स्पर्धेसाठी जागतिक क्रमवारीत सौदी अरेबियाचे स्थान हे ६७वे आहे, तर रशियाचे स्थान ७०वे आहे. सौदी अरेबियाचा संघ क्रमवारीतील तीन स्थानांनी वर असूनही रशियाने त्यांचा धुव्वा उडवला.

३. ब्राझीलच्या विक्रमाशी बरोबरी

रशियाने काल सौदी अरेबियाला पराभूत करत ब्राझीलच्या विक्रमाशी बरोबरी केली. १९५४ साली ब्राझीलने जिनेव्हा (जर्मनी) येथे झालेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात ५-० असा प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केला होता. त्यांचा सामना मेक्सिकोशी झाला होता. या सामन्यात बाल्ट्झर, दीदी आणि जुलीन्हो यांनी एक एक गोल केला होता, तर पिंगाने २ गोल केले होते.

४. रशियाने एकमेव पराभवाचा वचपा काढला

सौदी अरेबिया आणि रशिया हे दोन संघ आजपर्यंत अनेक संघांशी फुटबॉल सामने खेळले. मात्र विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ प्रथमच आमनेसामने आले होते. या आधी केवळ एका सामन्यात हे दोन संघ आपसात भिडले होते. हा मैत्रीपूर्ण सामना झाला होता. १९९३ साली झालेल्या या सामन्यात सौदी अरेबियाने मायदेशात रशियाला ४-२ असे पराभूत केले होते. त्याचा वचपा काढत रशियाने हा सामना ५-० ने जिंकला.

५ . १६ वर्षानंतर विश्वचषक स्पर्धेत विजय

रशियाने कालच्या विजयाबरोबर विश्वचषक स्पर्धेतील आपला विजयाचा दुष्काळ संपुष्टात आणला. या पूर्वी रशियाने २००२ साली ट्युनिशियाविरुद्ध २-० असा सामना जिंकला होता. त्याबरोबरच २०१७ नंतर रशियाने जिंकलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना ठरला. याआधी २०१७मध्ये दक्षिण कोरियाला रशियाने पराभूत केले होते.

Web Title: Fifa world cup 2018 rus vs rsa 5 interesting facts
First published on: 15-06-2018 at 13:51 IST