23 January 2021

News Flash

त्रिशुळ, आकाश आणि बराक-८ क्षेपणास्त्रे

यातील त्रिशुळ या क्षेपणास्त्राचा पल्ला हवेत ९ किमी इतका आहे.

भारताने १९८३ साली सुरू केलेल्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत (इंटिग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) विकसित केली जाणारी त्रिशुळ आणि आकाश ही अन्य क्षेपणास्त्रे आहेत. ती जमिनीवरून हवेत मारा करणारी (सरफेस टू एअर- सॅम) या प्रकारातील  विमानवेधी  क्षेपणास्त्रे आहेत. मात्र त्यांचाही विकास पूर्ण क्षमतेने झालेला नाही.

यातील त्रिशुळ या क्षेपणास्त्राचा पल्ला हवेत ९ किमी इतका आहे. त्याचा युद्धनौकांवरून शत्रूची कमी उंचीवरील क्षेपणास्त्रे पाडण्यासाठीही उपयोग करण्याची योजना होती. मात्र त्रिशुळ त्याची उद्दिष्टे पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे हे क्षेपणास्त्र विकासानंतर उत्पादन आणि सैन्यात तैनात करणे हे पुढील टप्पे गाठू शकले नाही. अखेर नौदलाने इस्रायलकडून बराक-१ ही क्षेपणास्त्रे विकत घेतली.

आकाशात चमकणाऱ्या विजेला हिब्रू भाषेत  बराक म्हणतात. त्यावरून बराक क्षेपणास्त्रांचे नाव ठेवले आहे. बराक-८ हे भारत आणि इस्रायल यांच्याकडून संयुक्तपणे विकसित केले जाणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.  ते शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन किंवा क्षेपणास्त्रे पाडण्यास सक्षम आहे. बराक-८ हवेत अधिकतम १६ किमी उंचीवर आणि १०० किमी लांबीवरील लक्ष्यांवर मारा करू शकते. भारतीय नौदलाने कोलकाता वर्गातील युद्धनौकांवर बराक-८ तैनात केले आहे.

आकाश जमिनीवरून हवेत अधिकतम १८ किमी उंचीवर आणि २५ ते ३० किमी लांबीवर  मारा करू शकणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. ते भारतीय लष्कर आणि हवाईदलात तैनात करण्यात आले आहे. त्याची रडार यंत्रणा एकाच वेळी शत्रूची अनेक विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन किंवा क्षेपणास्त्रे शोधून नष्ट करू शकते. मात्र या क्षेपणास्त्राच्या परिणामकारतेबाबतही शंका उपस्थित झाल्या होत्या. काही चाचण्यांत ते अपेक्षित उंची गाठू शकले नव्हते.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2018 1:24 am

Web Title: barak 8
Next Stories
1 नाग (प्रॉस्पिना) क्षेपणास्त्र
2 गाथा शस्त्रांची : अग्नि क्षेपणास्त्र
3 गाथा शस्त्रांची : पृथ्वी क्षेपणास्त्र
Just Now!
X