नौदलाच्या विकासात तीन बाबी महत्त्वाच्या मानल्या जातात. पहिली बाब म्हणजे पाण्यावर तरंगण्याची (फ्लोटिंग) क्षमता मिळवणे. त्यासाठी सुरुवातीला लाकडी ओंडके, फळ्या, प्राण्यांच्या कातडय़ापासून आणि पोर्सिलीनपासून बनवललेल्या नौका वापरल्या गेल्या. पुढची पायरी म्हणजे नौकेला गती देणे (प्रॉपल्शन). त्यात प्रथम वाऱ्याचा वेग वापरण्यासाठी डोलकाठय़ा आणि शिडे अस्तित्वात आली. नंतर वल्ह्य़ांचा सामूहिक वापर केला गेला. तिसरी बाब म्हणजे नौकेची संहारक क्षमता (फायर पॉवर). सुरुवातीच्या काळात जमिनीवर जी शस्त्रे वापरात होती तिच नाविक युद्धातही वापरली जात. गनपावडरच्या शोधानंतर नौदलातही बंदुका आणि तोफांचा वापर सुरू झाला. या तीन अक्षांवरील प्रगतीनुसार नौदलात प्रामुख्याने सुधारणा होत गेल्या.

सतराव्या शतकात शिप ऑफ द लाइन या प्रकारच्या जहाजांचा विकास झाला. ही घटना गनपावडरच्या शोधानंतरची. शिप ऑफ द लाइनमध्ये तीन ते चार मजले असून त्यावर जहाजाच्या दोन्ही बाजूंनी ओळीने तोफा बसवलेल्या असत. या गन डेकवरून शत्रूच्या जहाजांवर तोफांचा मारा केला जात असे. अशा प्रकारच्या जहाजांचा वापर १८०५ सालच्या ट्राफल्गारच्या युद्धापर्यंत शिगेला पोहोचला होता. या युद्धात व्हाइस अ‍ॅडमिरल होरॅशिओ लॉर्ड नेल्सनच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश नौदलाने केप ट्राफल्गारजवळ फ्रेंच आणि स्पॅनिश एकत्रित नौदलांचा पराभव केला.

१८५० च्या दरम्यान वाफेच्या शक्तीवर चालणाऱ्या जहाजांचा उदय झाला. त्यानंतर १८६० च्या दशकात अमेरिकी गृहयुद्धात लोखंडी आवरण असलेल्या युद्धनौकांचा (आयर्न-क्लॅड) जन्म झाला.

वाफेच्या शक्तीने वल्ही आणि शिडाच्या जहाजांचा वापर मागे पडला आणि नवे युग अवतरले. त्याने वाऱ्याच्या लहरीवर अवलंबून राहणे बंद झाले. नौका गतीमान आणि शक्तीशाली झाल्या. त्यावर अधिक ताकदवान तोफा बसवल्या गेल्या. त्याने नौदलाचे सामथ्र्य आणखी वाढले. नौदलाच्या जोरावर मोठी साम्राज्ये निर्माण झाली.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com